व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“स्वर्गातून येणारी खरी भाकर”

“स्वर्गातून येणारी खरी भाकर”

अध्याय ५४

“स्वर्गातून येणारी खरी भाकर”

आदल्या दिवशी खरोखर बऱ्‍याच घडामोडी झाल्या. येशूने अद्‌भूतरित्या हजारोंना जेवू घातले व मग त्याला राजा करण्याच्या लोकांच्या प्रयत्नातून तो निसटून गेला. त्या रात्री तो गालील समुद्रावर चालला; वादळामुळे उसळलेल्या पाण्यावरून चालताना बुडू लागलेल्या पेत्राला त्याने वाचवले; व लाटांना शांत करून आपल्या शिष्यांना नौकाभंगापासून वाचवले.

आता, गालील समुद्राच्या ईशान्येला येशूने अद्‌भूतरित्या जेवू घातलेल्या लोकांना तो कफर्णहूमाजवळ सापडतो व ते त्याला विचारतात, “गुरुजी, आपण येथे कधी आलात?” त्यांना रागावत येशू म्हणतो की, आणखी एक मोफत जेवण मिळावे या आशेने ते त्याला शोधत आलेले आहेत. नाश पावणाऱ्‍या अन्‍नासाठी नव्हे तर अनंत जीवनासाठी टिकणाऱ्‍या अन्‍नासाठी त्यांनी श्रम घ्यावे असे तो त्यांना आवर्जून सांगतो. यामुळे लोक विचारतातः “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे?”

येशू सर्वात महत्त्वाच्या अशा फक्‍त एकाच कामाचा उल्लेख करतो. तो म्हणतोः “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्‍वास ठेवावा.”

परंतु, त्याने अनेक चमत्कार केलेले असले तरी लोक येशूवर विश्‍वास ठेवत नाही. त्याने सर्व अद्‌भुत गोष्टी केल्यावर देखील ते म्हणतातः “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्‍वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्‍ना खाल्ला. असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांस स्वर्गातून भाकर खायला दिली.’”

चिन्ह दाखवण्याच्या त्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून अद्‌भुत अन्‍नाचा मूल स्रोत स्पष्ट करताना तो म्हणतोः “मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”

लोक म्हणतातः “प्रभुजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या.”

येशू खुलासा करतोः “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्‍वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल. आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे; आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”

तेव्हा, “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याबद्दल कुरकुर करू लागतात. त्यांना त्याच्यामध्ये, मानवी पालकांपासून जन्मलेल्या मुलापेक्षा अधिक काहीही दिसत नसल्यामुळे नासरेथमधील लोकांप्रमाणेच, आक्षेप घेत ते म्हणतातः “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?”

तेव्हा येशू म्हणतोः “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, ‘ते सर्व यहोवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.”

पुढे येशू पुन्हा सांगतोः “मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्‍ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्‍या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.” होय, देवाने पाठवलेल्या येशूवर विश्‍वास ठेवल्याने लोकांना सार्वकालिक जीवन मिळू शकते. कोणताही मान्‍ना वा कसलीही भाकर ते देऊ शकत नाही!

लोकांना कफर्णहूमजवळ येशू सापडल्यावर थोड्याच वेळाने स्वर्गातून येणाऱ्‍या भाकरीबद्दल चर्चा सुरु झाली. परंतु, पुढे येशू कफर्णहूमातील सभास्थानात शिकवत असताना ती चर्चा शिगेला पोहंचते. योहान ६:२५-५१, ५९; स्तोत्रसंहिता ७८:२४; यशया ५४:१३; मत्तय १३:५५-५७.

▪ स्वर्गातून येणाऱ्‍या भाकरीच्या चर्चेपूर्वी कोणत्या घटना घडल्या?

▪ येशूने नुकत्याच केलेल्या गोष्टी पाहता, चिन्ह मागण्याची विनंती का अयोग्य आहे?

▪ येशूने, तो स्वर्गातून आलेली खरी भाकर आहे हा जो दावा केला त्याविषयी यहूदी का कुरकुरतात?

▪ स्वर्गातून येणाऱ्‍या भाकरीबद्दलची चर्चा कोठे झाली?