व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वाधीन केले व खिळण्यासाठी नेले जाते

स्वाधीन केले व खिळण्यासाठी नेले जाते

अध्याय १२४

स्वाधीन केले व खिळण्यासाठी नेले जाते

छळलेल्या येशूच्या शांत सभ्यतेने प्रेरित होऊन पिलात पुन्हा त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मुख्य याजक अधिकच संतापतात. आपल्या दुष्ट ध्येयामध्ये कशाचीही आडकाठी येऊ न देण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे ते परत ओरडू लागतातः “ह्‍याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा!”

यावर पिलात म्हणतोः “तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा.” (त्यांच्या आधीच्या दाव्याच्या उलट, पुरेशा गंभीर धार्मिक गुन्ह्‌यांसाठी गुन्हेगारांना देहान्त शासन देण्याचा अधिकार यहूद्यांना असावा.) यानंतर कमीत-कमी पाचव्यांदा, “मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही.” असे म्हणून येशू निरपराध असल्याचे पिलात जाहीर करतो.

त्यांच्या राजकीय आरोपांनी काहीच साध्य होत नाही असे पाहून, यहूदी पुन्हा, काही तासांपूर्वी न्यायसभेपुढील येशूच्या चौकशीच्या वेळी केलेला, दुर्भाषणाचा धार्मिक आरोप करतात. ते म्हणतातः “आम्हाला नियमशास्त्र आहे, आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्‍याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”

हा आरोप पिलाताला नवा आहे आणि त्यामुळे तो अधिकच घाबरतो. त्याच्या पत्नीचे स्वप्न आणि येशूच्या व्यक्‍तिमत्वाचे विलक्षण सामर्थ्य सूचित करतात त्याप्रमाणे येशू सर्वसामान्य माणूस नव्हे हे आता त्याच्या ध्यानात येते. पण “देवाचा पुत्र”? येशू गालीलातील आहे हे पिलाताला ठाऊक आहे. तरीही, तो पूर्वी हयात असणे, कदाचित शक्य असेल का? त्याला वाड्यात परत नेऊन पिलात विचारतोः “तू कोठला आहेस?”

येशू गप्प राहतो. या आधी, तो राजा असल्याचे आणि त्याचे राज्य या जगाचे नसल्याचे त्याने पिलाताला सांगितले होते. आता अधिक खुलाशाने काहीही उपयुक्‍त साध्य होणार नाही. उत्तर देण्याच्या नकाराने पिलाताचा अभिमान मात्र दुखावला आहे आणि म्हणून तो येशूवर चिडून म्हणतोः “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय?”

यावर आदराने येशू म्हणतोः “आपणाला वरुन अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता.” भूतलावरील व्यवहारांची व्यवस्था पाहण्याच्या, मानवी शासकांना देवाने दिलेल्या अधिकाराचा उल्लेख येथे येशू करीत आहे. तो पुढे म्हणतोः “म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले आहे त्याचे पाप अधिक आहे.” खरोखर, येशूला दिलेल्या अन्यायी वागणुकीबद्दल पिलातापेक्षा, प्रमुख याजक कयफा, त्याचे साथीदार आणि यहूदा इस्कर्योत हे सर्व अधिक जबाबदार आहेत.

येशूची अधिकच छाप पडल्याने व येशूची उत्पत्ती ईश्‍वरी असेल म्हणून घाबरुन पिलात त्याला सोडण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागतो. यहूदी मात्र पिलाताला कोंडीत पकडतात. “आपण ह्‍याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो,” अशी कपटाने धमकी देत ते आपल्या राजकीय आरोपाचा पुनरुच्चार करतात.

त्याचा ध्वनितार्थ भयानक असला तरी पिलात येशूला पुन्हा एकदा बाहेर आणतो. तो पुन्हा आर्जव करतोः “पहा, तुमचा राजा!”

“त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!”

“मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” पिलात निराशेने विचारतो.

रोमी अधिकाराखाली यहूदी जळफळत आहेत. खरेतर, रोमी वर्चस्वाचा ते तिरस्कार करतात! तरीही, ढोंगीपणाने मुख्य याजक म्हणतातः “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.”

आपले राजकीय स्थान व लौकिक गमावण्याच्या भीतीने शेवटी यहुद्यांच्या निर्दय मागणीपुढे पिलात हात टेकतो. तो येशूला त्यांच्या स्वाधीन करतो. शिपाई येशूच्या अंगावरचा जांभळा झगा काढून घेतात आणि त्याला त्याचे स्वतःचे कपडे घालतात. वधस्तंभावर खिळण्यासाठी येशूला नेले जाते तेव्हा त्याला स्वतःचा वधस्तंभ वाहून नेण्यास भाग पाडले जाते.

आतापर्यंत शुक्रवार, निसान १४ ची सकाळ आहे; कदाचित मध्यान्हाचीही वेळ जवळ आली आहे. येशू गुरुवार पहाटेपासून जागा आहे आणि त्याने एकामागून एक यातनामय प्रसंग सहन केले आहेत. तेव्हा, वधस्तंभाच्या भाराखाली तो कोसळतो हे समजण्यासारखे आहे. यासाठीच, आफ्रिकेतील कुरेने येथील शिमोन नावाच्या जवळून जाणाऱ्‍या माणसाला येशूकरता तो वधस्तंभ नेण्यासाठी वेठीला धरले जाते. ते जात असताना, स्त्रियांसह अनेक लोक दुःखाने स्वतःला बडवून घेत, येशूसाठी शोक करीत, त्यांच्या मागोमाग जातात.

त्या स्त्रियांकडे वळून येशू म्हणतोः “अहो, यरुशलेमाच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका. तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की, वांझ, न प्रसवलेली उदरे व न पाजिलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. . . . ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?”

येशूची उपस्थिती आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या शेष लोकांच्या अस्तित्वामुळे, ज्यामध्ये अजून जीवनाचा ओलावा आहे अशा यहूदी राष्ट्राच्या झाडाचा उल्लेख येशू करीत आहे. पण या राष्ट्रातून ते काढून घेतले जातील तेव्हा आत्मिक दृष्ट्या मेलेले झाड, होय, एक वाळलेली राष्ट्रीय संघटना उरेल. देवाकडून देहदंड देणारे, या नात्याने रोमी सैन्य येऊन यहूदी राष्ट्राला उध्वस्त करतील तेव्हा रडण्यासाठी कशी भयंकर कारणे असतील! योहान १९:६-१७; १८:३१; लूक २३:२४-३१; मत्तय २७:३१, ३२; मार्क १५:२०, २१.

▪ धार्मिक नेते त्यांच्या राजकीय आरोपांना अपयश आल्यावर येशूविरुद्ध कोणता आरोप करतात?

▪ पिलात अधिकच का घाबरतो?

▪ येशूच्या बाबतीत घडलेल्या गोष्टींबद्दलच्या महापापाचा दोष कोणावर येतो?

▪ शेवटी, येशूला मृत्युदंड देण्यासाठी पिलाताने त्याला त्यांच्या स्वाधीन करावे हे याजक कसे घडवून आणतात?

▪ रडणाऱ्‍या स्त्रियांना येशू काय सांगतो आणि “ओलावा” असलेल्या व नंतर ‘वाळणाऱ्‍या’ झाडाचा त्याने जो उल्लेख केला त्याचा काय अर्थ आहे?