व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हरवलेल्याचा शोध घेणे

हरवलेल्याचा शोध घेणे

अध्याय ८५

हरवलेल्याचा शोध घेणे

नम्रतेने देवाची सेवा करणाऱ्‍यांना शोधण्यासाठी व गोळा करण्यासाठी येशू उत्सुक आहे. या कारणास्तव कुप्रसिद्ध पाप्यांसकट सर्वांना शोधत तो प्रत्येकाशी देवाच्या राज्याबद्दल बोलतो. असे लोक आता त्याचे बोलणे ऐकण्यासाठी त्याच्याकडे येतात.

हे पाहून, ज्यांना ते अयोग्य समजतात, अशा लोकांशी संगत ठेवल्याबद्दल, परुशी व शास्त्री येशूवर टिका करतात. ते कुरकुर करतातः “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” हे त्यांच्या प्रतिष्ठेला मुळीच मानवत नाही! परुशी व शास्त्री, सामान्य लोकांना, आपल्या पायखालच्या चिखलासारखे वागवतात. अशा लोकांबद्दल त्यांना वाटणारी तुच्छता दाखवण्यासाठी ते इब्री भाषेतील ʽअम्‌ह․ʼआʹरेटस्‌ म्हणजे “धरतीचे [मातीचे] लोक” हा शब्द वापरतात.

उलटपक्षी, येशू प्रत्येकाला सन्मानाने, दयेने व कनवाळूपणे वागवतो. त्यामुळे सराईत अपराधी असल्याची ख्याती असलेल्या लोकांसकट हे साधेसुधे लोक त्याचे बोलणे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यांना अयोग्य वाटत असलेल्या लोकांसाठी येशू घेत असलेल्या कष्टाबद्दल, परुशांनी केलेल्या टिकेचे काय?

एका दाखल्याने येशू त्यांच्या आक्षेपाला उत्तर देतो. तो परुशांच्या स्वतःच्या दृष्टीकोणातून बोलतो. जणू ते नीतीमान असून देवाच्या मेंढवाड्यात सुरक्षित आहेत. पण तिरस्करणीय ʽअम्‌ह․ʼआʹरेटस्‌ चुकीच्या मार्गाने गेलेले असून हरवलेल्या दशेत आहेत. ऐका, तो विचारतोः

“तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो; आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्‍यांस एकत्र बोलावून त्यांना म्हणतोः ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’”

मग, खुलासा करत येशू, आपली गोष्ट वास्तवतेला लागू करतो. तो म्हणतोः “त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतीमानांबद्दल होणाऱ्‍या आनंदापेक्षा, पश्‍चाताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो.”

परुशी स्वतःला नीतीमान समजतात व म्हणून त्यांना पश्‍चातापाची गरज नाही असे मानतात. दोन-एक वर्षापूर्वी जकातदार व पापी लोकांसोबत जेवल्याबद्दल त्यांच्यातील काहींनी टिका केली असता त्याने त्यांना सांगितले होतेः “नीतीमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे.” आपली पश्‍चातापाची गरज न समजणाऱ्‍या ढोंगी परुशांमुळे स्वर्गात आनंद होत नाही. पण तो खऱ्‍या पश्‍चाताप-दग्ध पापी लोकांमुळे होतो.

हरवलेल्या पापी लोकांच्या सापडण्यामुळे मोठा आनंद होतो हा मुद्दा अधिक ठसवण्यासाठी येशू आणखी एक दाखला देतो. तो म्हणतोः “अशी कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुप्याची दहा नाणी असता त्यातून एक हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहात नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणतेः ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’”

मग, येशू हा दाखला मागीलप्रमाणेच लागू करतो. तो म्हणतोः “त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो.”

हरवलेल्या पापी लोकांना मूळ पदावर आणल्याबद्दल देवाच्या दूतांना असलेली ही प्रेमळ आस्था किती असामान्य आहे! त्यातही विशेष म्हणजे हे साधे, तिरस्कृत ʽअम्‌ह․ʼआʹरेटस्‌ पुढे देवाच्या स्वर्गीय राज्यातील सभासदात्वाला पात्र ठरतात. परिणामी, स्वर्गात स्वतः देवदूतांपेक्षा वरचे स्थान ते गाठतात. पण मत्सर वा उपेक्षित वाटण्याऐवजी, ते देवदूत नम्रपणे जाणतात की, या पापी माणसांनी, त्यांना सहानुभूतिपूर्ण व दयाळू स्वर्गीय राजे व याजक म्हणून काम करण्यासाठी सज्ज करणाऱ्‍या, जीवनातील प्रसंगांना तोंड दिले आहे व त्यावर मातही केली आहे. लूक १५:१-१०; मत्तय ९:१३; १ करिंथकर ६:२, ३; प्रकटीकरण २०:६.

▪ येशू, पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या लोकांशी सहवास का करतो व त्यामुळे परुशांकडून त्याच्यावर काय टिका होते?

▪ परुशी सर्वसाधारण लोकांकडे कशा दृष्टीने पाहतात?

▪ येशू कोणते दाखले देतो व त्यांपासून आपल्याला काय शिकता येते?

▪ देवदूतांचा आनंद का असामान्य आहे?