व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हरवलेल्या मुलाची गोष्ट

हरवलेल्या मुलाची गोष्ट

अध्याय ८६

हरवलेल्या मुलाची गोष्ट

हरवलेली मेंढी व हरवलेले नाणे परत मिळवण्याबद्दल परुशांना नुकतेच दाखले देऊन झाल्यावर आता येशू आणखी एक दाखला देतो. हा, एक प्रेमळ पिता व त्याने त्याच्या दोन मुलांना दिलेल्या वागणुकीबद्दलचा दाखला आहे. या दोन्ही मुलांमध्ये गंभीर दोष आहेत.

प्रथम, या दाखल्यातील मुख्य पात्र असलेला धाकटा मुलगा पहा. याच्या वडिलांनी जराही मागे-पुढे न करता त्याला दिलेला त्याच्या वाट्याचा वारसा तो घेतो. मग तो घर सोडून जातो व अतिशय अनैतिक जीवन जगतो. पण येशू पुढे सांगत असलेली गोष्ट ऐका, आणि त्यातील पात्रे कोणाला चित्रित करतात हे तुम्हाला ठरवता येते का ते पहा.

येशू सुरवात करतोः “कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणालाः ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ तेव्हा [बापाने] आपल्या मिळकतीची त्यांच्यामध्ये वाटणी केली.” आता हा धाकटा मुलगा, त्याला मिळालेल्या मिळकतीचे काय करतो?

येशू खुलासा करतोः “मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.” वास्तविक, तो आपला पैसा वेश्‍यांबरोबर राहण्यात खर्च करतो. मग, येशू पुढे सांगतो त्याप्रमाणे बिकट दिवस येतातः

“त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग, तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे.”

नियमशास्त्रानुसार डुकर हा प्राणी अशुद्ध असल्याने ते वळण्याची पाळी येथे किती अपमानास्पद होते! परंतु, डुकरांना दिलेले अन्‍न मिळावे अशी इच्छा होण्याइतक्या भुकेच्या डोंबाचे, त्या मुलाला सर्वात जास्त वाईट वाटत होते. येशू म्हणतो, या भयंकर आपत्तीमुळे ‘तो शुद्धीवर आला.’

ती गोष्ट पुढे सांगताना येशू म्हणतोः “तो [मुलगा स्वतःला] म्हणालाः ‘माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्‍यांस भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेनः ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्‍याप्रमाणे मला ठेवा.’ मग तो उठून आपल्या बापाकडे गेला.’

येथे विचार करण्यासारखी गोष्ट आहेः त्याने घर सोडले तेव्हा त्याचा बाप त्याच्यावर रागावला व ओरडला असता तर आपण काय करावे, याबद्दल तो मुलगा इतका निश्‍चित राहिला नसता. आपल्या बापाला तोंड द्यावे लागू नये म्हणून, मायदेशी परतून इतरत्र काम शोधण्याचा प्रयत्न करण्याचे त्याने ठरवले असते. पण असा कोठलाही विचार त्याच्या मनात नव्हता. त्याला घरी जायचे होते!

येशूच्या दाखल्यातील बाप, आपल्या प्रेमळ व दयाळू यहोवा देवाला चित्रित करतो हे स्पष्ट आहे, आणि तो हरवलेला उधळ्या पुत्र, पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या लोकांना चित्रित करतो, हे कदाचित तुम्ही ओळखलेच असेल. येशू ज्यांच्यासोबत बोलत आहे त्या परुशांनी मागे, अशाच लोकांबरोबर जेवल्याबद्दल येशूवर टिका केली आहे. पण मोठा मुलगा कोणाला चित्रित करतो?

हरवलेला मुलगा सापडतो तेव्हा

येशूच्या दाखल्यातील हरवलेला किंवा उधळ्या पुत्र आपल्या बापाच्या घरी परतल्यावर त्याचे स्वागत कसे केले जाते? येशू त्याचे कसे वर्णन करतो ते ऐकाः

“तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला; आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.” आपल्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला यथायोग्य चित्रित करणारा हा केवढा दयाळू व प्रेमळ बाप आहे!

बहुधा त्या बापाने आपल्या मुलाच्या अनैतिक जीवनाबद्दल ऐकले होते. परंतु तपशीलवार खुलाशाची वाट न पाहता तो त्याचे घरी स्वागत करतो. येशूचा देखील असाच मनमोकळा कल आहे. दाखल्यामध्ये उधळ्या मुलाने चित्रित केलेल्या पापी व जकातदार लोकांना भेटण्यात तो पुढाकार घेतो.

तो परत येत असताना, त्याचा दुःखी व उतरलेला चेहरा पाहून आपल्या मुलाच्या पश्‍चातापाची कल्पना, येशूच्या दाखल्यातील चाणाक्ष वडिलाला आली आहे यात शंका नाही. पण त्या वडिलाच्या प्रेमळ पुढाकारामुळे आपल्या पापांची कबुली देणे त्या मुलाला सोपे जाते. येशू सांगतोः “मुलगा त्याला म्हणालाः ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्‍याप्रमाणे मला ठेवा.’ (न्यू.व.)

तरी, मुलाच्या तोंडून हे शब्द अजून निघताहेत, तोच त्याचे वडील नोकरांना आज्ञा देत कामाला लागतातः “लवकर उत्तम झगा आणून ह्‍याला घाला, ह्‍याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. आणि पुष्ट वासरु आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे . . . हरवला होता, तो सापडला आहे.” मग ते “आनंदोत्सव” करू लागतात.

दरम्यान त्या माणसाचा “वडील मुलगा शेतात होता.” उरलेली गोष्ट ऐकून तो कोणाला चित्रित करतो ते तुम्हाला ओळखता येते का ते पहा. मोठ्या मुलाबद्दल येशू म्हणतोः “तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्‍यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारलेः ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितलेः ‘तुमचा भाऊ आला आहे, आणि तो तुमच्या वडीलांना सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरु कापले आहे.’ तेव्हा तो रागावला व आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने आपल्या बापाला उत्तर दिलेः ‘पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले.’”

पापी लोकांना दाखवलेली दया व त्यांच्याकडे दिलेले लक्ष यांजबद्दल त्या मोठ्या मुलाप्रमाणे कोण टिका करत आहे? शास्त्री व परुशीच नाहीत का? येशू पापी लोकांशी मनमोकळेपणाने वागतो म्हणून त्यांनी येशूवर केलेल्या टिकेमुळे हा दाखला दिलेला असल्याने मोठ्या मुलाने चित्रित केलेले तेच हे आहेत हे उघड आहे.

त्या माणसाने आपल्या मुलाला केलेल्या विनंतीद्वारे येशू आपल्या गोष्टीचा समारोप करतोः “बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला हाता तो जिवंत झाला आहे; हरवला होता तो सापडला आहे.”

अशा तऱ्‍हेने, मोठा मुलगा नंतर काय करतो हे न सांगता येशू आपली गोष्ट संपवतो. कालांतराने, येशूच्या मृत्यु व पुनरुत्थानानंतर, खरोखरच, “याजकवर्गातील पुष्कळ लोकांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.” तेव्हा येशू येथे ज्यांच्याशी बोलत आहे त्या “मोठ्या मुलाच्या” वर्गातील काही लोकांचा त्यात समावेश असावा हे स्पष्ट आहे.

पण आधुनिक काळात ती दोन मुले कोणाला चित्रित करतात? हे लोक, यहोवा देवाशी नाते प्रस्थापित करण्यास आधार असावा इतकी त्याच्या हेतूंची माहिती झालेले असले पाहिजेत. मोठा मुलगा, “लहान कळपा”तील काही लोकांना किंवा “स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांच्या समाजाला” चित्रित करतो. त्यांनी मोठ्या मुलासारखाच पवित्रा घेतला. पृथ्वीवर राहणाऱ्‍या वर्गाचे “इतर मेंढरां”चे स्वागत करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपल्याऐवजी त्या वर्गालाच सर्व प्रसिद्धी मिळत आहे असे त्यांना वाटले.

उलटपक्षी, या जगाची सुखे उपभोगण्यासाठी देवाला सोडून जाणाऱ्‍या त्याच्या लोकांना, उधळ्या पुत्राने चित्रित केले आहे. परंतु काही काळाने पश्‍चातापाने हे परततात व पुन्हा देवाचे क्रियाशील सेवक बनतात. क्षमेची आपली गरज ओळखून पित्याकडे येणाऱ्‍यांच्या बाबतीत पिता खरोखर किती प्रेमळ व दयाळू आहे! लूक १५:११-३२; लेवीय ११:७, ८; प्रे. कृत्ये ६:७; लूक १२:३२; इब्रीकर १२:२३; योहान १०:१६.

▪ येशू ही गोष्ट किंवा दाखला कोणाला सांगतो व का?

▪ गोष्टीचे प्रमुख पात्र कोण आहे व त्याला काय होते?

▪ पिता व धाकटा मुलगा, येशूच्या काळातील कोणाला चित्रित करतात?

▪ त्याच्या दाखल्यातील दयाळू पित्याचे उदाहरण येशू कसे अनुसरतो?

▪ भावासाठी करण्यात आलेल्या स्वागताकडे, मोठा भाऊ कोणत्या दृष्टीने बघतो व परुशी, मोठ्या भावासारखे कसे वागतात?

▪ येशूचा दाखला आपल्या काळात कसा लागू होतो?