व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हवासा वाटणारा असामान्य मानवी शासनकर्ता

हवासा वाटणारा असामान्य मानवी शासनकर्ता

अध्याय ५३

हवासा वाटणारा असामान्य मानवी शासनकर्ता

येशूने हजारोंना अद्‌भुतरित्या जेवू घातल्यावर लोक आश्‍चर्यचकित होतात. ते म्हणतातः “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.” मोशेपेक्षा मोठा संदेष्टा तो येशूच असला पाहिजे. इतकेच नव्हे, तर तो हवासा असणारा शासक होईल असा निर्णय ते करतात. त्यामुळेच ते त्याला पकडून राजा करण्याची योजना करतात.

परंतु लोकांच्या योजनेची येशूला कल्पना आहे. त्यांच्या निवडीची बळजबरी होण्याचे टाळण्यासाठी तो चटकन कामाला लागतो. तो जमावाला निरोप देतो व नावेत चढून कफर्णहूमाकडे जाण्यासाठी आपल्या शिष्यांना भाग पाडतो. मग, प्रार्थना करण्यासाठी तो डोंगरावर निघून जातो. त्या रात्री येशू तेथे एकटाच असतो.

उजाडण्यापूर्वी थोड्या आधी उंचावरील आपल्या जागेवरून येशू समुद्राकडे पाहतो. जोराच्या वाऱ्‍याने लाटा उसळत असलेल्या त्याला दिसतात. वल्हांडणाचा सण जवळ आला आहे त्यामुळे आकाशात पौर्णिमेच्या लागास आलेला चंद्र दिसत आहे. त्या चंद्राच्या प्रकाशात त्याच्या शिष्यांची नाव लाटांच्या विरुद्ध पुढे जाण्यास धडपडत असलेली येशूला दिसते. ती माणसे सर्व बळ एकवटून नाव वल्हवीत आहेत.

हे पाहून येशू डोंगरावरून उतरतो व लाटांवरून नावेकडे चालू लागतो. येशू नावेपर्यंत पोहोंचला तोवर ती तीन वा चार कि. मी. गेलेली आहे. परंतु जणू जवळून पुढे जात असल्याप्रमाणे तो चालत राहतो. त्याला पाहून शिष्य ओरडतात: “हे भूत आहे!”

येशू शांतपणे त्यांना म्हणतो, “मी आहे, भिऊ नका.”

पण पेत्र म्हणतोः “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”

येशू उत्तरतो, “ये!”

तेव्हा नावेतून उतरून पेत्र पाण्यावरुन येशूकडे चालू लागतो. पण वादळ पाहून पेत्राला भीती वाटते. बुडू लागून तो ओरडतो, “प्रभुजी, मला वाचवा.”

येशू लगेच हात पुढे करून त्याला धरतो व म्हणतोः “अरे अल्पविश्‍वासी, तू संशय का धरलास?”

पेत्र व येशू नावेत परतल्यावर वारा थांबतो व शिष्य आश्‍चर्यचकित होतात. पण त्यांना आश्‍चर्य वाटण्याचे कारण काय? काही तासांपूर्वीच केवळ पाच भाकऱ्‍या व दोन लहान मासळ्यांनी हजारोंना जेवू घालण्याच्या येशूने केलेल्या चमत्काराचे मर्म जाणून, “भाकऱ्‍यांचा अर्थ” (न्यू.व.) त्यांना उमगला असता तर मग तो पाण्यावर चालू शकल्याचे व वाऱ्‍याला रोखू शकल्याचे त्यांना इतके नवल वाटले नसते. परंतु आता मात्र शिष्य येशूच्या पाया पडतात व म्हणतात, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा.”

थोड्याच वेळात, कफर्णहूमापासून जवळ असलेल्या गनेसरेताला ते पोहंचतात. हे एक सुंदर व सुपीक मैदान आहे. तेथे ते नाव बांधून ठेवतात. पण ते किनाऱ्‍यावर उतरल्यावर लोक येशूला ओळखतात व आसपासच्या प्रदेशातील आजारी लोकांच्या शोधात जातात. त्यांना आणल्यावर ते केवळ येशूच्या अंगरख्याच्या गोंड्यांना स्पर्श करतात व पूर्णपणे बरे होतात.

दरम्यान, हजारो लोकांना जेवू घातल्याचे पाहिलेल्या जमावाला समजते की, येशू निघून गेला आहे. तेव्हा ते तिबिर्याहून आलेल्या लहान नावांमध्ये बसून येशूला शोधण्यासाठी कफर्णहूमाला जातात. तो सापडतो तेव्हा ते त्याला विचारतातः “गुरुजी, आपण येथे कधी आलात?” यावर येशू त्यांना कसा रागावतो ते आपण लवकरच पाहू. योहान ६:१४-२५; मत्तय १४:२२-३६; मार्क ६:४५-५६.

▪ येशूने अद्‌भूतरित्या हजारोंना जेवू घातल्यावर ते लोक येशूला काय करू इच्छितात?

▪ येशू एकटाच ज्या डोंगरावर गेला आहे तेथून त्याला काय दिसते व मग तो काय करतो?

▪ या गोष्टींनी शिष्यांना आश्‍चर्य का वाटू नये?

▪ ते किनाऱ्‍याला पोहंचल्यावर काय होते?