व्हिडिओ पाहण्यासाठी

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!

जीवनात कधी न कधी तुम्ही हा प्रश्‍न विचारलाच असेल, की ‘शेवटी जगात इतकी दुःखे का आहेत?’ युद्धे, गरिबी, विपत्ती, गुन्हेगारी, अन्याय, रोगराई व मृत्यू यांसारख्या दुःखद समस्यांनी हजारो वर्षांपासून मानवजातीला पछाडले आहे. मागच्या शंभर वर्षांत तर या समस्यांनी कहर केला आहे. शेवटी, या सर्वाचा कधी अंत होणार का?

या प्रश्‍नाचे अतिशय सांत्वनदायक उत्तर म्हणजे, हो, या सर्वाचा अंत होणार आणि तो सुद्धा फार लवकर! देवाचे वचन, बायबल सांगते, “दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” किती काळापर्यंत? नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:१०, ११, २९.

देवाने दुष्ट लोकांचा व दुःखद परिस्थितीचा अंत केल्यावर ही पृथ्वी एखाद्या रम्य बागेसारखी होईल. लोकांना परिपूर्ण आरोग्य लाभेल आणि ते सर्वकाळ आनंदाने जगतील. देवाच्या वचनात भाकीत केले आहे: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.

त्या नव्या जगातील आशीर्वादांचा उपभोग घेण्यासाठी, मृत जनांनाही पुन्हा जिवंत केले जाईल: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

दुःखद परिस्थिती अस्तित्वात का आली?

देवाने मानवजातीकरता इतके अद्‌भूत भविष्य राखून ठेवले आहे हे लक्षात घेता असा प्रश्‍न उद्‌भवतो की, त्याने ही दुःखद परिस्थिती अस्तित्वात का येऊ दिली? आणि इतका काळ ती का राहू दिली?

देवाने आदाम व हव्वा यांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना परिपूर्ण शरीर व मन दिले होते. त्याने त्यांना एका सुंदर बागेत ठेवले आणि ज्यामुळे त्यांना समाधान लाभेल असे काम त्यांच्यावर सोपवले. बायबल सांगते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:३१) जर आदाम व हव्वा देवाच्या आज्ञेत राहिले असते तर त्यांच्या पोटी जन्मणारी मुले परिपूर्ण असती; आणि हळूहळू सबंध पृथ्वीच त्या बागेसारखी झाली असती व लोक शांतीने व आनंदाने या पृथ्वीवर सर्वकाळ नांदले असते.

आदाम व हव्वा यांना निर्माण करताना देवाने त्यांना इच्छास्वातंत्र्य दिले होते. स्वतःहून विचार करता येत नाही अशा रोबोटसारखे त्यांनी असावे अशी देवाची इच्छा नव्हती. पण आनंदी राहण्याकरता त्यांनी या इच्छास्वातंत्र्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे आवश्‍यक होते, अर्थात देवाच्या नियमांचे पालन करण्यासाठी. देव मनुष्याला म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) इच्छास्वातंत्र्याचा दुरुपयोग करणे अनर्थकारी ठरले असते कारण मनुष्याला देवाच्या मार्गदर्शनाशिवाय यशस्वी होता येईल अशाप्रकारे निर्माणच करण्यात आले नव्हते. बायबल म्हणते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्या पहिल्या पालकांनी ठरवले की देवाच्या मार्गदर्शनाशिवायही आपण यशस्वी होऊ शकतो. पण देवाच्या प्रभुत्वाकडे त्यांनी पाठ फिरवली तेव्हा देवाने त्यांची परिपूर्ण अवस्था कायम ठेवली नाही. त्यामुळे ते अधोगतीच्या मार्गाला लागले, आणि शेवटी म्हातारे होऊन मेले. आपण त्यांच्याचपासून उत्पन्‍न झाल्यामुळे ती अपरिपूर्णता आणि मृत्यू आपल्याला उपजतच त्यांच्याकडून मिळाला आहे.—रोमकर ५:१२.

सार्वभौमत्वाचा मुख्य प्रश्‍न

देवाने तेव्हाच आदाम व हव्वा यांचा नाश का केला नाही, व दुसरे मानवी जोडपे निर्माण करून नव्याने सुरुवात का केली नाही? कारण देवाच्या सार्वभौमत्वाला अर्थात सबंध विश्‍वावर आधिपत्य गाजवण्याच्या त्याच्या अधिकाराला ललकारण्यात आले होते. आधिपत्य गाजवण्याचा कोणाला अधिकार आहे आणि कोणाचे आधिपत्य यथान्याय आहे? हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. दुसऱ्‍या शब्दांत, देवाने मानवांवर आधिपत्य न गाजवल्यास ते अधिक सुखी होतील का? हा वाद मिटवण्याकरता, देवाने मानवांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले आणि देवापासून स्वतंत्र होऊन यशस्वी होऊ पाहण्याकरता त्यांना पुरेसा वेळ दिला. असे करण्याद्वारे, देव कायमचे हे सिद्ध करणार होता की मनुष्याकरता काय हिताचे आहे, देवाच्या आधिपत्याचा स्वीकार करणे, की स्वतंत्रपणे जगणे? यासाठी पुरेसा काळ देणे आवश्‍यक होते, जेणेकरून मानवाला देवाच्या मार्गदर्शनाशिवाय सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, व धार्मिक व्यवस्थांचा प्रयोग करून पाहता येऊ शकेल.

या सर्वाचा काय परिणाम झाला आहे? हजारो वर्षांचा मानव इतिहास दाखवतो की मानवाचे दुःख वाढतच गेले आहे. मागच्या शतकात मानवजातीने इतिहासातल्या सर्वात दुःखद घटना अनुभवल्या. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान लाखो लोकांची कत्तल करण्यात आली. युद्धांत एक कोटी पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. गुन्हेगारी व हिंसाचाराने आज समाजाला पोखरून टाकले आहे. मादक पदार्थांचे व्यसन सबंध जगात एखाद्या साथीसारखे पसरले आहे. लैंगिक संबंधांतून संक्रमित होणारे रोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. दर वर्षी लाखो लोक उपासमारीने व रोगराईने मरताहेत. कौटुंबिक जीवन व नैतिक मूल्ये रसातळाला गेली आहेत. आणि या सर्व समस्यांवर कोणत्याही मानवी शासनाजवळ उपाय नाहीत. म्हातारपण, आजार व मृत्यू या समस्यांवर कोणतेही सरकार मात करू शकलेले नाही.

बायबलमध्ये आपल्या काळाविषयी भाकीत करण्यात आले होते, अगदी तशीच मानवांची स्थिती आज झाली आहे. देवाच्या वचनात सध्याच्या काळाला या व्यवस्थीकरणाचा ‘शेवटला काळ’ म्हटले आहे. या काळात “कठीण दिवस” येतील असे त्यात भाकीत केले होते. बायबलमध्ये अचूकपणे सांगितल्यानुसार, ‘दुष्ट व भोंदू माणसे दुष्टपणात अधिक सरसावले आहेत.’—२ तीमथ्य ३:१-५, १३.

दुःखांचा अंत लवकरच होईल

सर्व पुरावे दाखवतात की, देवापासून स्वतंत्र होऊन कारभार चालवण्याच्या मानवाच्या दुःखदायक प्रयोगाचा काळ लवकरच संपुष्टात येईल. देवाच्या आधिपत्याकडे पाठ फिरवून, मानव कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत हे अगदी स्पष्ट झाले आहे. केवळ देवाचे आधिपत्यच आपल्याला शांती, आनंद, परिपूर्ण आरोग्य व सार्वकालिक जीवन देऊ शकते. दुष्टाई व दुःखद परिस्थितीला अस्तित्वात राहू देण्याचा यहोवाने ठरवलेला काळ आता संपत आला आहे. लवकरच देव मानवांचा कारभार आपल्या हाती घेऊन या सबंध अयशस्वी व्यवस्थेचाच नाश करेल.

बायबलमध्ये ही भविष्यवाणी आहे: “त्या राजांच्या [सध्या अस्तित्वात असलेली मानवी सरकारे] अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; . . . ते या सर्व राज्यांचे [सध्याच्या सरकारांचे] चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) यहोवाच्या स्वर्गीय राज्याच्या माध्यमाने त्याचे सार्वभौमत्त्व, अर्थात आधिपत्य गाजवण्याचा त्याचा अधिकार सिद्ध केला जाणे हीच बायबलची प्रमुख शिकवणूक आहे. येशूने ‘शेवटल्या काळाच्या’ चिन्हांपैकी एक मुख्य चिन्ह भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

शेवट होईल तेव्हा कोण बचावतील? बायबल याचे उत्तर देते: “सरळ जनच देशात वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) सरळ जन, म्हणजे असे लोक की जे यहोवा देवाची इच्छा जाणून घेतात आणि त्यानुसार वागतात. येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, ‘जग . . . नाहीसे होत आहे; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.’—१ योहान २:१७.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.