व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जिवंत भाषा “बोलणारे” पुस्तक

जिवंत भाषा “बोलणारे” पुस्तक

जिवंत भाषा “बोलणारे” पुस्तक

एखादे पुस्तक ज्या भाषेत लिहिण्यात आले असेल ती भाषाच नामशेष झाल्यास साहजिकच ते पुस्तकही मृतवतच होते. बायबल ज्या प्राचीन भाषांत लिहिण्यात आले होते त्या प्राचीन भाषा आज फारच कमी लोक वाचू शकतात. तरीसुद्धा बायबल जिवंत आहे. ते टिकून राहिले कारण ते मानवजातीच्या जिवंत भाषा “बोलायला शिकले” आहे. ज्या भाषांतरकारांनी त्यास इतर भाषांत बोलायला “शिकवले,” त्यांना कधी कधी तर अगदी अभेद्य भासणाऱ्‍या अडचणींना तोंड द्यावे लागले.

बायबलचे भाषांतर करणे—अर्थात त्याच्या १,१०० पेक्षा अधिक अध्यायांचे आणि ३१,००० पेक्षा अधिक वचनांचे भाषांतर करणे—हे काही साधे काम नाही. तथापि, गत शतकांत कर्तव्यनिष्ठ भाषांतरकारांनी हे आव्हान सोत्साह स्वीकारले. यांपैकी कित्येकजण तर हाती घेतलेले हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संकटे सोसण्यास, किंबहुना मरण्यासही तयार होते. बायबल मनुष्याच्या निरनिराळ्या भाषांमध्ये कशाप्रकारे भाषांतरित करण्यात आले याविषयीचा पूर्वेतिहास अनन्यसाधारण चिकाटी आणि कौशल्य यांचे दर्शन घडवतो. त्या लक्षवेधक अहवालाचा हा लहानसा भाग विचारात घ्या.

भाषांतरकारांसमोरील आव्हाने

ज्या भाषेची लिपीच नाही त्याचे भाषांतर तरी कसे करायचे? कित्येक बायबल भाषांतरकारांना अशाच प्रकारच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ, सा.यु. चौथ्या शतकातील युल्फलास याने, त्याकाळच्या प्रचलित परंतु लेखी स्वरूपात नसलेल्या—गॉथिक भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचे काम हाती घेतले. त्याने २७ वर्णांच्या गॉथिक वर्णमालेचा शोध लावण्याद्वारे या आव्हानावर मात केली; ही वर्णमाला प्रामुख्याने ग्रीक आणि लॅटिन वर्णमालांवर आधारित होती. सा.यु. ३८१ सालाच्या आधी त्याने गॉथिक भाषेत जवळजवळ सबंध बायबलचे भाषांतर पूर्ण केले.

नवव्या शतकात, सिरिल (मूळ नाव कॉन्स्टंटाइन) आणि मिथोडिअस नावांच्या दोन ग्रीक भाषिक भावंडांना स्लॅव्हिक भाषिकांसाठी बायबलचे भाषांतर करण्याची मनीषा होती; ते दोघेही अतिशय प्रज्ञावंत अभ्यासक आणि भाषाविषारद होते. पण आजच्या स्लॅव्हिक भाषांची पूर्वज—स्लॅव्होनिक—या भाषेची मुळात लिपीच नव्हती. यामुळे या दोघा भावांनी बायबलचे भाषांतर तयार करता यावे म्हणून एक वर्णमाला निर्माण केली. अशारितीने बायबलला आता स्लॅव्हिक प्रदेशांतील आणखी कितीतरी लोकांशी “बोलणे” शक्य झाले.

सोळाव्या शतकात, विल्यम टिन्डेल यांनी बायबलचे मूळ भाषांतून इंग्रजीत भाषांतर करायला घेतले खरे, पण यामुळे त्यांच्यावर चर्च आणि सरकार या दोहोंकडून भयंकर विरोध ओढवला. ऑक्सफर्ड येथे शिक्षण झालेल्या टिन्डेल यांना असे एक भाषांतर काढायचे होते की जे “नांगर चालवणाऱ्‍या मुलाला” देखील सहज समजू शकेल. पण हे उद्दिष्ट साध्य करता यावे म्हणून त्यांना जर्मनीला पलायन करावे लागले आणि येथे १५२६ साली त्यांचा इंग्रजीतील “नवा करार” प्रकाशित झाला. या भाषांतराच्या काही प्रती इंग्लंडमध्ये लपवून आणण्यात आल्या तेव्हा अधिकारी इतके काही संतापले की त्यांनी जाहीररित्या या प्रती जाळण्याचे सुरू केले. नंतर टिन्डेल यांना विश्‍वासघात करून अधिकाऱ्‍यांच्या हाती सोपवण्यात आले. गळा दाबून ठार केल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्यात आला; मरणाआधी त्यांनी मोठ्याने हे उद्‌गार काढले: “प्रभू, इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड!”

बायबलचे भाषांतर अखंड सुरू राहिले; भाषांतरकारांना या कामापासून परावृत्त करता येणे जणू अशक्यच होते. १८०० सालापर्यंत, बायबलचे निदान काही भाग तरी, तब्बल ६८ भाषांत “बोलायला शिकले” होते. यानंतर, बायबल संस्था,—विशेषतः १८०४ साली स्थापण्यात आलेली ब्रिटिश ॲण्ड फॉरेन बायबल सोसायटी यासारख्या संस्था उदयास येऊ लागल्या आणि—बायबलने पाहता पाहता आणखी कितीतरी नव्या भाषा “शिकून घेतल्या.” शेकडो तरुण, मिशनरी म्हणून कार्य करण्याच्या, आणि यांपैकी जास्तीतजास्त तरुण विशेषतः बायबलचे भाषांतर करण्याच्या उद्देशाने परदेशांत जाण्यासाठी स्वेच्छेने पुढे आले.

आफ्रिकेतील भाषा शिकणे

आफ्रिकेत १८०० साली, केवळ दहाबारा लिपिबद्ध भाषा होत्या. इतर शेकडो ध्वनीरूप भाषा बोलल्या जात होत्या पण कोणीतरी या भाषांसाठी लेखन पद्धती शोधून काढेपर्यंत नाईलाज होता. मिशनऱ्‍यांनी येऊन या भाषा आत्मसात केल्या, आणि तेसुद्धा, कोणत्याही प्रास्ताविक साहाय्यपुस्तकांच्या किंवा शब्दकोषांच्या मदतीशिवाय. यानंतर त्यांनी मोठ्या परिश्रमाने या भाषांना लिपिबद्ध केले आणि मग या लिपीचे वाचन कसे करायचे हे लोकांना शिकवले. हे सगळे फक्‍त एवढ्यासाठी, की एक न एक दिवशी या लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबल वाचता यावे.

यांपैकी एक मिशनरी होता रॉबर्ट मॉफट नावाचा स्कॉटिश सज्जन. वयाच्या २५ व्या वर्षी, १८२१ साली, मॉफटने दाक्षिणात्य आफ्रिकेच्या त्स्वाना भाषिकांसाठी एक मिशन स्थापन केले. त्यांची अलिखित भाषा शिकून घेण्यासाठी तो त्या लोकांसोबत मिसळत असे, कधी कधी तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात राहता यावे म्हणून तो खेडोपाड्यांत जात असे. त्याने नंतर लिहिले, “ते लोक अत्यंत सहृदय होते, पण त्यांच्या भाषेत बोलताना मी केलेल्या चुकांवर मात्र चांगलेच हास्यकल्लोळ उठायचे. शिवाय, गंमत अशी की बाकीच्यांसमोर मी केलेल्या चुकीची तंतोतंत नक्कल करून, सर्वांनी पोटभर हसून घेईपर्यंत त्यांतला एकही जण माझ्याकडून चुकलेल्या शब्दाची किंवा वाक्याची दुरुस्ती करायला कधीच तयार होत नसे.” मॉफट मात्र त्यांना पुरून उरला आणि शेवटी त्याने या भाषेवर प्रभुत्व मिळवून ती लिपिबद्धही केली.

त्स्वाना लोकांच्या सहवासात आठ वर्षे काम केल्यानंतर १८२९ साली, मॉफटने लूककृत शुभवर्तमानाचे भाषांतर पूर्ण केले. ते मुद्रित करवून घेण्यासाठी त्याने जवळजवळ ९०० किलोमीटर बैलगाडीने प्रवास करून समुद्रकिनारा गाठला आणि मग तेथून केप टाऊनला जाण्याकरता तो जहाजावर चढला. तेथे पोहंचल्यावर राज्यपालांनी त्याला सरकारी मुद्रणालयात मुद्रण करण्याची परवानगी दिली खरी पण टाईपसेटिंगपासून प्रत्यक्ष मुद्रणापर्यंत सर्वकाही स्वतः मॉफटलाच करावे लागले; शेवटी हे शुभवर्तमान १८३० साली प्रकाशित झाले. आता कुठे, त्स्वाना भाषिकांना पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या भाषेत बायबलचा एक भाग वाचणे शक्य झाले होते. १८५७ साली, मॉफटने त्स्वाना भाषेत सबंध बायबलचे भाषांतर पूर्ण केले.

लूककृत शुभवर्तमान पहिल्यांदा हातात आले तेव्हा त्स्वाना लोकांच्या प्रतिक्रियेचे मॉफटने नंतर वर्णन केले. तो सांगतो: “लूककृत शुभवर्तमानाच्या त्या प्रती मिळवण्यासाठी अक्षरशः शेकडो मैल पार करून आलेल्या लोकांना मी पाहिलेय. . . . आपल्याला मिळालेल्या या शुभवर्तमानाचे काही भाग छातीशी कवटाळून, कृतज्ञतेनं ढसाढसा रडताना पाहिलेय, इतकं की मला शेवटी कित्येकांना म्हणावं लागलं, ‘इतकं रडलात तर तुमची पुस्तकं ओली होऊन खराब व्हायची.’”

मॉफट सारख्याच समर्पित भाषांतरकारांमुळेच, अनेक आफ्रिकी लोकांना—ज्यांपैकी कित्येकांना तर एक लिपिबद्ध भाषेची कधी गरजच भासली नव्हती—अशांना लेखनाद्वारे दळणवळण करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तथापि, या भाषांतरकारांच्या मते, ते आफ्रिकेच्या लोकांना एक आणखीन मौल्यवान वरदान देत होते—त्यांच्या स्वतःच्या भाषेतले बायबल. आज, संपूर्णतः किंवा अंशतः बायबल ६०० पेक्षा अधिक आफ्रिकन भाषांत “बोलते.”

अशियातील भाषा शिकणे

जगाच्या पाठीवर एकीकडे आफ्रिकेतील भाषांतरकार तेथल्या ध्वनीरूप भाषांना लेखी स्वरूप देण्यासाठी धडपडत होते, तर दुसरीकडे, इतर भाषांतरकारांसमोर एक निराळीच समस्या उभी ठाकली—आधीपासूनच क्लिष्ट लिपी असणाऱ्‍या भाषांत भाषांतर करणे. आशियातील भाषांत बायबलचे भाषांतर करणाऱ्‍यांना नेमक्या याच आव्हानाला सामोरे जावे लागले.

१९ व्या शतकाच्या सुरवातीला, विल्यम कॅरी आणि जॉशुआ मार्शमॅन यांनी भारतात जाऊन तेथील अनेक लिपिबद्ध भाषांवर प्रभुत्व मिळवले. विल्यम वॉर्ड या मुद्रकाची मदत घेऊन त्यांनी जवळजवळ ४० भाषांत बायबलच्या निदान काही भागांची भाषांतरे केली. विल्यम कॅरी यांच्याविषयी लेखक जे. हर्बर्ट केन सांगतात: “त्यांनी [बंगाली भाषेची] एक सहजसुंदर, अग्रांथिक शैली निर्माण केली; आणि या शैलीने जुन्या पारंपरिक भाषेची जागा घेऊन तिला आधुनिक वाचकांच्या नजरेत आणखी स्पष्ट आणि आकर्षक बनविले.”

संयुक्‍त संस्थानांत जन्म होऊन तेथेच लहानाचा मोठा झालेला ॲडनायरम जड्‌सन बर्माला गेला आणि १८१७ साली त्याने बर्मी भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचे काम हाती घेतले. बायबलचे भाषांतर करण्याइतपत एखाद्या पौर्वात्य भाषेवर प्रभुत्व मिळवणे किती कठीण आहे याचे त्याने वर्णन केले: ‘जगाच्या दुसऱ्‍या टोकाला राहणाऱ्‍या लोकांची भाषा शिकायची म्हणजे सगळंच वेगळं पडतं, त्यांची विचारसरणी आपल्यापेक्षा वेगळी, भावना व्यक्‍त करण्याची त्यांची पद्धत आपल्याला अगदी अनोळखी, आणि अक्षरं, शब्द असे की आपल्या माहितीतल्या कोणत्याच भाषेशी त्यांचे तिळमात्रही साम्य नसते; मदतीला शब्दकोष नाही की अनुवाद करणारा दुभाषिक नाही, शिवाय एखाद्या स्थानिक शिक्षकाची मदत घेतो म्हटलं, तर त्या भाषेचे निदान थोडेबहुत तरी ज्ञान असणे अनिवार्य—सारे करता करता नाकी नऊ येतात!’

तरीसुद्धा जड्‌सनला तर जवळजवळ १८ वर्षे अशीच ढोरमेहनत करावी लागली. बर्मी भाषेत बायबलचा शेवटचा भाग १८३५ साली मुद्रित करण्यात आला. पण बर्मा येथील त्याचे वास्तव्य त्याला महागात पडले. भाषांतराचे काम करीत असताना त्याच्यावर हेरगिरीचा आरोप लावण्यात आला आणि त्यामुळे त्याला जवळजवळ दोन वर्षे एका डासांनी भरलेल्या तुरुंगात घालवावी लागली. तुरुंगातून सुटका झाल्यावर काही काळातच त्याची बायको आणि लहानगी मुलगी या दोघीही तापामुळे दगावल्या.

२५-वर्षीय रॉबर्ट मॉरिसन १८०७ साली चीनमध्ये आला आणि त्याने लिपिबद्ध भाषांपैकी सर्वात क्लिष्ट अशा चीनी भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचे अत्यंत कठीण काम हाती घेतले. चीनी भाषेचा अभ्यास सुरू करून केवळ दोनच वर्षे झाली असल्यामुळे त्याला या भाषेचे अगदी जेमतेमच ज्ञान होते. शिवाय, चीनचा वेगळेपणा कायम टिकवू पाहणाऱ्‍या चीनी कायद्याशीही मॉरिसनला संघर्ष पत्करावा लागला. परदेशी लोकांना चीनी भाषा शिकवण्याची चीनी लोकांना सक्‍त मनाई होती आणि असे करणाऱ्‍यांसाठी देहान्ताची शिक्षा होती. कोणा परदेशी माणसाने चीनी भाषेत बायबलचे भाषांतर करणे हा देहान्त दंड अपराध होता.

मॉरिसनने निर्भयपणे परंतु तरीही सावधगिरीने चीनी भाषेचा आपला अभ्यास सुरूच ठेवला, आणि त्याने फारच कमी काळात ही भाषा आत्मसात केली. दोन वर्षांच्या आत तो ईस्ट इंडिया कंपनीत भाषांतरकार म्हणून रुजू झाला. दिवसा तो कंपनीत काम करीत असे, पण उरलेल्या वेळात त्याने कोणाच्याही नकळत बायबलच्या भाषांतराचे कामही सुरूच ठेवले, अर्थात असे करताना त्याच्या डोक्यावर पकडले जाण्याची टांगती तलवार सतत होती. १८१४ साली, म्हणजेच तो चीनला आल्याच्या सात वर्षांनंतर, त्याने भाषांतर केलेली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने मुद्रणासाठी तयार होती. पाच वर्षांनंतर, विल्यम मिल्न्‌ याच्या मदतीने त्याने इब्री शास्त्रवचनेही पूर्ण केली.

ही एक फार मोठी साध्यता होती—कारण जगातल्या इतर कोणत्याही भाषेच्या तुलनेत, अधिक लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्‍या एका भाषेत आता बायबल ‘बोलू’ शकत होते. कार्यकुशल भाषांतरकारांच्या प्रयत्नांमुळे याच्या पाठोपाठ इतर आशियाई भाषांतही भाषांतर शक्य झाले. आज बायबलचे काही भाग आशियातील ५०० पेक्षा अधिक भाषांत उपलब्ध आहेत.

टिन्डेल, मॉफट, जड्‌सन आणि मॉरिसन यांच्यासारख्या माणसांनी, ज्यांची त्यांना ओळखसुद्धा नव्हती आणि ज्यांच्याजवळ धड एक लिपिबद्ध भाषाही नव्हती अशा लोकांसाठी एका पुस्तकाचे भाषांतर करण्याकरता वर्षानुवर्षे—काहींनी तर जीव धोक्यात घालून—एवढी धडपड का केली असावी बरे? नावलौकिक किंवा आर्थिक लाभ व्हावा याकरता निश्‍चितच नाही. बायबल हे देवाचे वचन आहे आणि त्याअर्थी बायबलने लोकांशी—आणि तेही सर्व लोकांशी—त्यांच्या स्वतःच्या भाषेत—‘बोलले’ पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते.

तुमच्या मते बायबल हे देवाचे वचन असो वा नसो, तुम्ही कदाचित याजशी सहमत व्हाल की त्या कर्तव्यपरायण भाषांतरकारांनी दाखवलेली आत्मत्यागी प्रवृत्ती आजच्या जगात अभावानेच आढळते. एवढा आत्मत्याग जागृत करू शकणारे पुस्तक परीक्षण करण्याजोगे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

[१२ पानांवरील चार्ट]

(For fully formatted text, see publication)

१८०० सालापासून बायबलचे भाग ज्या भाषांत मुद्रित झाले त्यांची संख्या

६८ १०७ १७१ २६९ ३६७ ५२२ ७२९ ९७१ १,१९९ १,७६२ २,१२३

१८०० १९०० १९९५

[१० पानांवरील चित्र]

टिन्डेल, बायबलचे भाषांतर करताना

[११ पानांवरील चित्र]

रॉबर्ट मॉफट

[१२ पानांवरील चित्र]

ॲडनायरम जड्‌सन

[१३ पानांवरील चित्र]

रॉबर्ट मॉरिसन