या पुस्तकाचा विज्ञानाशी मेळ आहे का?
या पुस्तकाचा विज्ञानाशी मेळ आहे का?
धर्माने विज्ञानाला नेहमीच मित्र मानलेले नाही. गत शतकांत काही धर्मवेत्त्यांनी वैज्ञानिक शोधांचा विरोध केला, कारण आपण केलेला बायबलचा उलगडा या शोधांच्या प्रगतिशील पावलांखाली तुडविला जाईल अशी त्यांना भीती होती. पण विज्ञान खरोखरच बायबलचा शत्रू आहे का?
बायबलच्या लेखकांनी आपल्या काळातील प्रचलित वैज्ञानिक दृष्टिकोन पत्करले असते तर त्यातून नक्कीच एक भयंकर वैज्ञानिक तफावतींनी भरलेले पुस्तक निर्माण झाले असते. तथापि, त्या लेखकांनी अशाप्रकारच्या अवैज्ञानिक गैरसमजुतींचा पुरस्कार केला नाही. उलटपक्षी, त्यांनी अशी अनेक विधाने केलीत जी वैज्ञानिकदृष्ट्या तर अचूक आहेतच, पण त्यांच्या काळात ती विधाने सर्वमान्य मतांच्या अगदी विरोधात होती हे विशेष.
पृथ्वीचा आकार काय?
मनुष्याला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची हजारो वर्षांपासून उत्कंठा लागून होती. पुरातन काळात सर्वसामान्य मत असे होते की पृथ्वी ही सपाट आहे. उदाहरणार्थ, बाबेलच्या लोकांचा असा समज होता की विश्व हे एका पेटीसारखे किंवा खोलीसारखे आहे आणि पृथ्वी म्हणजे त्याची तळजमीन. भारतातील वैदिक पुरोहितांच्या कल्पनेनुसार, पृथ्वी ही सपाट असून तिच्या केवळ एकाच बाजूवर मनुष्यवस्ती आहे. आशियातील एका आदिवासी जमातीने पृथ्वीचे एखाद्या मोठ्या तबकासारखे कल्पनाचित्र रेखाटले होते.
परंतु, सा.यु.पू. सहाव्या शतकातच, पायथॅगोरस नावाच्या ग्रीक तत्त्ववेत्त्याने, ज्याअर्थी चंद्र आणि सूर्य गोलाकार आहेत त्याअर्थी पृथ्वी देखील गोल असावी असा सिद्धान्त मांडला होता. ॲरिस्टॉटलने (सा.यु.पू. चौथे शतक) देखील नंतर हे मान्य केले व त्याने स्पष्टीकरणही दिले की चंद्रग्रहणामुळे पृथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली वक्राकार असते.
तथापि, (केवळ वरच्या बाजूला मनुष्यवस्ती असलेली) सपाट पृथ्वीची कल्पना पूर्णपणे नाहीशी झाली नाही. गोलाकार पृथ्वीचे तर्कसंगत फलित—अर्थात, प्रतिध्रुवस्थांची संकल्पना मान्य करणे काहीजणांना जड जात होते. a सा.यु. चौथ्या शतकातील ख्रिस्ती आत्मसमर्थक, लाक्तानतियस याने तर मुळात या कल्पनेचीच थट्टा केली. त्याचा युक्तिवाद: “माणसांची पावले त्यांच्या डोक्यांवर असतात? . . . शेतातले पीक आणि वृक्षे देखील खालच्या दिशेने वाढतात? पाऊस, बर्फ आणि गारा यांचा वरच्या दिशेने वर्षाव होतो, हे मानण्याइतके कोणी निर्बुद्ध असेल का?”२
प्रतिध्रुवस्थांच्या संकल्पनेमुळे काही धर्मवेत्ते पेचात पडले. काही सिद्धान्तांनुसार प्रतिध्रुवस्थांवर राहणारे लोक असले तरीही, सामान्य माणसांशी त्यांचा कोणताही संबंध असणे शक्य नाही कारण एकतर त्यांच्यामधला समुद्र अत्यंत विस्तीर्ण असल्यामुळे तो पार करणे अशक्य होते किंवा दुसरे कारण म्हणजे विषुववृत्ताच्या भोवती एक अगम्य उष्ण कटिबंध होता. पण मग प्रतिध्रुवस्थावर राहणारे हे लोक आले कोठून असतील? बुचकळ्यात पडल्यामुळे, प्रतिध्रुवस्थावर राहणारे लोकच असू शकत नाहीत, किंबहुना लाक्तानतियस याच्या युक्तिवादाप्रमाणे पृथ्वी ही मुळीच गोलाकार असू
शकत नाही असा निष्कर्ष काढणे काही धर्मवेत्त्यांना अधिक सोयीस्कर वाटले!अशा परिस्थितीतही, गोलाकार पृथ्वीची संकल्पना कायम राहिली आणि कालांतराने तिला व्यापक प्रमाणावर मान्यता मिळाली. एवढेच की, स्वतः अंतराळात जाऊन, प्रत्यक्ष पाहणीतून पृथ्वी गोलाकार आहे याची खात्री करणे केवळ २० व्या शतकात अवकाश युगाचा उदय झाल्यानंतरच शक्य झाले. b
या वादात बायबलने कोणती भूमिका घेतली होती? सा.यु.पू. आठव्या शतकातच यशया नावाच्या इब्री संदेष्ट्याने उल्लेखनीय सहजतेने विदित केले: “हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर [“भूमंडळावर,” NW] आरूढ झाला आहे.” (तिरपे वळण आमचे.) विशेष म्हणजे, पृथ्वी ही सपाट आहे असे सर्वमान्य मत असताना, शिवाय ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी पृथ्वी कदाचित गोलाकार असावी असा सिद्धान्त मांडण्याच्या कितीतरी शतकांपूर्वी, आणि पृथ्वी ही गोलाकार आहे हे अंतराळातून मनुष्याने प्रत्यक्ष पाहण्याच्या हजारो वर्षांपूर्वीच यशयाने वरीलप्रमाणे म्हटले होते. (यशया ४०:२२) याठिकाणी ‘भूमंडळ’ असे भाषांतरित केलेल्या कुघ या इब्री शब्दाचे “गोल” असेही भाषांतर करता येईल.३ इतर भाषांतरांत “पृथ्वीचा गोल” (डुए व्हर्शन) आणि “गोल पृथ्वी” असेही भाषांतर करण्यात आलेले आहे.—मॉफट. c
बायबल लेखक यशया याने पृथ्वीविषयीच्या सर्वसामान्य गैरसमजुती टाळल्या. उलटपक्षी, त्याने असे विधान नमूद केले की जे वैज्ञानिक शोधांच्या प्रगतिशील पावलांखाली तुडवले गेले नाही.
पृथ्वी कशाच्या आधारावर उभी आहे?
प्राचीन काळी, मनुष्याला विश्वरचनेसंबंधी इतर प्रश्न देखील सतावत होते: पृथ्वी कशावर टेकलेली आहे? सूर्य, चंद्र आणि तारकांना कशाचा आधार आहे? आयझॅक न्यूटन यांनी सिद्धान्तरूपात मांडलेल्या आणि १६८७ साली प्रकाशित झालेल्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविषयी त्यांना तिळमात्रही कल्पना नव्हती. खज्योती या, वास्तविकतः रिक्त अंतराळात अधांतरी लोंबकळत आहेत ही कल्पनाच मुळात त्यांच्यासाठी विचित्र होती. यामुळेच त्यांच्या स्पष्टीकरणांत पुष्कळदा पृथ्वी आणि इतर खज्योती मूर्त वस्तूंवर किंवा पदार्थांवर आधारलेल्या आहेत या अर्थाचे संकेत असायचे.
एखाद्या द्वीपावर राहणाऱ्या लोकांनी कदाचित मांडला असावा असा एक जुना सिद्धान्त याचे उदाहरण म्हणून घेता येईल. या सिद्धान्तानुसार पृथ्वीच्या सभोवताली पाणी असून ती या पाण्यावर तरंगते. हिंदू धर्मियांनी रेखाटलेल्या कल्पनाचित्रानुसार पृथ्वीचे एकावर एक असे अनेक पाये आहेत. ती चार हत्तींवर टेकलेली असून हे हत्ती एका महाकाय कासवावर उभे आहेत, ते कासव एका विशाल सर्पावर उभे आहे आणि विळखा घातलेला हा सर्प विश्वव्यापी महासागरावर तरंगतो आहे. सा.यु.पू. पाचव्या शतकातील एक ग्रीक तत्त्ववेत्ता एम्पीडोक्लीस याचे असे म्हणणे होते की पृथ्वी ही एका चक्रवातावर टेकलेली असून या चक्रवातामुळेच खज्योतींची हालचाल होत असते.
सर्वात प्रभावशाली मते ॲरिस्टॉटल याची होती. त्याच्या सिद्धान्तानुसार पृथ्वी ही गोलाकार असली तरीसुद्धा ती रिक्त अंतराळात अधांतरी लोंबकळूच शकत नाही असे त्याचे ठाम मत होते. अवकाशावर (इंग्रजी) या आपल्या शोधनिबंधात, पृथ्वी पाण्यावरती टेकलेली आहे या विचाराचे खंडन करीत तो म्हणाला: “अधांतरी राहणे हे पाण्याच्या आणि पृथ्वीच्याही स्वभावाविरुद्ध आहे: त्यांना टेकण्याकरता काहीतरी असलेच पाहिजे.”४ तर मग, पृथ्वी कशावर “टेकलेली आहे?” ॲरिस्टॉटलच्या शिकवणुकीनुसार सूर्य, चंद्र आणि तारका या जड, पारदर्शक गोलांना जोडलेल्या आहेत. एक गोल दुसऱ्या गोलाच्या आत राहतो आणि पृथ्वी—ही मध्यभागी—स्थिरावलेली आहे. हे गोल एकमेकांत फिरतात तसतशा त्यांच्यावर असणाऱ्या खज्योती—सूर्य, चंद्र आणि ग्रह—आकाशात फिरतात.
ॲरिस्टॉटलचे स्पष्टीकरण काहीसे तर्कसंगत भासले. कारण या खज्योती कशावरही पक्क्या जोडलेल्या नसल्यास त्या उभ्या राहतील तरी कशा? अनेकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या ॲरिस्टॉटलची मते जवळजवळ २,००० वर्षांपर्यंत सत्य मानण्यात आली. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यानुसार, १६ व्या आणि १७ व्या शतकांत तर त्याच्या शिकवणुकींना चर्चच्या नजरेत चक्क “धार्मिक सिद्धान्तांचा बहुमान प्राप्त होता.”५
दुर्बिणीचा शोध लागल्यावर, खगोलशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटलच्या सिद्धान्ताविरुद्ध आक्षेप घेऊ लागले. तरीसुद्धा त्यांना d६
समाधानकारक उत्तर मिळाले नाही; मग सर आयझॅक न्यूटनने खुलासा केला की ग्रह रिक्त अंतराळात अधांतरी लोंबकळत असतात आणि एक अदृश्य शक्ती—अर्थात गुरुत्त्वाकर्षण त्यांना त्यांच्या कक्षेच्या मर्यादेत ठेवते. यावर विश्वास ठेवणे जणू अशक्यच होते; न्यूटनच्या काही सहकाऱ्यांना हे मानणे फारच जड गेले की अंतराळ म्हणजे कोणताही पदार्थ नसलेली एक पोकळी आहे.या प्रश्नावर बायबलचे काय म्हणणे आहे? जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी, बायबलने अतिशय स्पष्टपणे विदित केले की पृथ्वी “निराधार” टांगली आहे. (ईयोब २६:७) येथे वापरलेल्या “निराधार” या अर्थाच्या (बेलिमाह) या मूळ इब्री शब्दाचा अक्षरशः “कशाही विना” असा अर्थ होतो.७काँटेम्पररी इंग्लिश व्हर्शन यात “रिक्त अवकाशावर” ही संज्ञा उपयोगात आणली आहे.
त्याकाळी बहुतांश लोकांच्या मनातले पृथ्वीचे चित्र, “रिक्त अवकाशावर” टांगलेला ग्रह असे अजिबातच नव्हते. आपल्या काळातील सर्वमान्य मतांच्या दोन पावले पुढे जाऊन बायबल लेखकाने विदित केलेले विधान वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे.
बायबल आणि वैद्यकीय शास्त्र —यांच्यात मेळ आहे का?
आधुनिक वैद्यकीय शास्त्राने रोगांचा प्रादुर्भाव कसा होतो व तो कसा टाळावा याविषयी बऱ्याच प्रमाणावर आपले डोळे उघडले आहेत. १९ व्या शतकातील वैद्यकीय प्रगतीमुळे अँन्टीसेप्सिसची, म्हणजेच रोगांच्या फैलावावर आळा घालण्याकरता स्वच्छतेचे अवलंबन करण्याची वैद्यकीय पद्धत प्रचारात आली. याचा परिणाम नाटकीय होता. संसर्गजन्य रोगांत आणि अकाली मृत्यूंच्या प्रमाणात विलक्षण घट झाली.
जुन्याकाळातील वैद्यांना मात्र रोग कसा पसरतो याविषयी संपूर्ण समज नव्हती आणि रोगांवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आरोग्यरक्षण किती महत्त्वाचे आहे हेही त्यांना उमगलेले नव्हते. साहजिकच, त्यांच्या पुष्कळशा वैद्यकीय पद्धती आधुनिक प्रमाणांनुसार अक्षरशः रानटी वाटतात.
उपलब्ध असलेले सर्वात जुने वैद्यकीय लिखाण म्हणजे सा.यु.पू. १५५० च्या जवळपासच्या कालखंडातील एबर्स पपायरस नावाचा मिसरी लोकांच्या वैद्यकीय ज्ञानाचा संग्रहग्रंथ. ‘तुम्हाला मगरीने चावा घेतलेला असो की पायाच्या अंगठ्याचे नख दुखत असो,’ या गुंडाळीत अशाप्रकारच्या कितीतरी दुखण्यांवर जवळजवळ ७०० उपाय सुचविण्यात आलेले आहेत.८दी इंटरनॅशनल बायबल स्टँडर्ड एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “या वैदूंचे वैद्यकीय ज्ञान निव्वळ अनुभवावर आधारलेले, पुष्कळ अंशी जादूटोण्याशी संबंधित, आणि पूर्णपणे अवैज्ञानिक होते.”९ बरेच उपाय निरुपयोगी होते, पण काही तर अतिशय धोकेदायकही होते. जखमेवरील उपचाराकरता माणसाची विष्ठा इतर पदार्थांसोबत मिसळून हे मिश्रण जखमेवर लावावे असे एका ठिकाणी सुचवलेले होते.१०
मिसरी वैद्यकीय उपायांचे हे लिखाण थोड्याफार फरकाने, बायबलची पहिली पाच पुस्तके लिहिल्या जाण्याच्या काळातच करण्यात आले; या पाच पुस्तकांत मोशेचे नियमशास्त्र देखील समाविष्ट होते. सा.यु.पू. १५९३ साली जन्मलेला मोशे, मिसर देशात लहानाचा मोठा झाला. (निर्गम २:१-१०) फारोच्या घराण्याचा सदस्य असल्याकारणाने त्याला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले.” (प्रेषितांची कृत्ये ७:२२) तो मिसर देशातील “वैद्यांस” ओळखत होता. (उत्पत्ति ५०:१-३) मोशेच्या लिखाणांवर त्यांच्या निरुपयोगी, धोकेदायक वैद्यकीय पद्धतींची पडछाया उमटली का?
नाही. उलट, मोशेच्या नियमशास्त्रातील काही आरोग्यविषयक नियम त्या काळाच्या मानाने कितीतरी पुढारलेले होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, लष्करी छावण्यांसंबंधी एका नियमानुसार छावणीपासून दूर जाऊन खड्ड्यात मल झाकून टाकणे आवश्यक होते. (अनुवाद २३:१३) हा एक अत्यंत पुढारलेला प्रतिबंधक उपाय होता. यामुळे पाणी निर्जंतुक राहण्यास मदत होत असे; शिवाय माशांमुळे होणाऱ्या शिग्लॉसिस नावाच्या रोगापासून, तसेच अतिशय गलिच्छ परिस्थिती असलेल्या देशांत आज देखील लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या अतिसाराच्या इतर रोगांपासूनही यामुळे बचाव होत असे.
मोशेच्या नियमशास्त्रात आणखी बरेचसे आरोग्यविषयक नियम होते ज्यांमुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्यापासून इस्राएल सुरक्षित राहिले. एखाद्याला संसर्गजन्य रोग असल्यास किंवा त्याला असा रोग असण्याची शक्यता असल्यास त्याला इतरांपासून दूर ठेवण्यात येत असे. (लेवीय १३:१-५) आपोआप (कदाचित रोगाने) मेलेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वस्त्रे किंवा पात्रे पुन्हा वापरण्याआधी धुऊन तरी घ्यावी लागत किंवा नष्ट तरी करावी लागत. (लेवी ११:२७, २८, ३२, ३३) मृतदेहास स्पर्श करणाऱ्याला अशुद्ध समजले जात असे आणि त्याला स्वतःला शुद्ध करण्यासाठी काही सोपस्कार करावे लागत, ज्यात कपडे धुऊन अंघोळ करणे समाविष्ट होते. सात दिवसांच्या अशुद्धतेच्या काळात त्याला इतरांना स्पर्श करण्याची मनाई होती.—गणना १९:१-१३.
या आरोग्य संहितेतून अशा सुज्ञानाचे दर्शन घडते, की जे त्याकाळातील जवळपासच्या राष्ट्रांच्या वैद्यांजवळ मुळी नव्हतेच. रोग कोणकोणत्या मार्गांनी पसरतात याविषयी वैद्यकीय शास्त्राला माहिती मिळण्याच्या हजारो वर्षांपूर्वीच, रोगापासून बचावण्यासाठी वाजवी प्रतिबंधक उपाय बायबलमध्ये सुचवण्यात आले होते. यामुळे, मोशेने त्याच्या काळातील लोक साधारण ७० ते ८० वर्षे जगतात असे जे म्हटले त्यात काही नवल नाही. e—स्तोत्र ९०:१०.
वरती उल्लेखलेली बायबलमधील विधाने वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहेत हे कदाचित तुम्ही मान्य कराल. तथापि, बायबलमध्ये अशीही काही विधाने आहेत जी वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित करता येण्यासारखी नाहीत. यामुळे बायबलचे विज्ञानाशी वाकडे आहे हे सिद्ध होते का?
अप्रामाण्य मान्य करणे
अप्रामाण्य असणारे एखादे विधान खोटे असेलच असे नाही. पुरेसा पुरावा शोधून काढण्याची तसेच उपलब्ध माहितीचा अचूकपणे खुलासा करण्याची मनुष्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे, वैज्ञानिक पुराव्यावरही मर्यादा घातल्या जातात. तथापि, काही सत्य गोष्टी अप्रामाण्य असतात कारण त्यांच्याविषयी एकतर कोणताही पुरावा जतन करण्यात आलेला नसतो, तो पुरावा अस्पष्ट असतो किंवा अद्यापही गवसलेला नसतो किंवा मग कोणत्याही निर्विवाद निष्कर्षावर येण्यासाठी वैज्ञानिक क्षमता आणि प्रावीण्य कमी पडते. ज्या विशिष्ट बायबल विधानांचा स्वतंत्र मानवी पुरावा उपलब्ध नाही, अशा विधानांच्या बाबतीतही हेच खरे असावे का?
उदाहरणार्थ, बायबल एका अशा अदृश्य प्रदेशाचा उल्लेख करते ज्यात आत्मिक व्यक्ती राहतात, तथापि हे वैज्ञानिकदृष्ट्या खरे असल्याचे—किंवा खोटेही असल्याचे—प्रमाणित करता येणे शक्य नाही. तसेच, बायबलमध्ये नोंदलेल्या चमत्कारिक घटनांविषयी हेच खरे आहे. नोहाच्या काळात जागतिक जलप्रलय झाला होता हे प्रमाणित करण्यासाठी, काही लोकांचे समाधान होण्याइतपत पुरेशा प्रमाणात सुस्पष्ट भौगोलिक पुरावा उपलब्ध नाही. (उत्पत्ति, अध्याय ७) त्याअर्थी जलप्रलय झालाच नव्हता असा निष्कर्ष आपण काढावा का? बदलत्या काळासोबत आणि परिवर्तनांसोबत ऐतिहासिक घटना अस्पष्ट होण्याची शक्यता असते. तशाच प्रकारे, हजारो वर्षांत झालेल्या भौगोलिक उलाढालींमुळे जलप्रलयाचाही पुष्कळसा पुरावा नष्ट झाला असण्याची शक्यता नाही का?
उपलब्ध मानवी पुराव्याच्या आधारावर बायबलमधील काही विधाने प्रमाणित करता येत नाहीत किंवा त्यांचे खंडनही करता येत नाही हे कबूल आहे. पण यात आश्चर्य ते काय? बायबल हे विज्ञानाचे पाठ्यपुस्तक नव्हे. तथापि, ते नक्कीच सत्याला धरून असलेले पुस्तक आहे. बायबलचे लेखक किती सत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक होते याविषयीचा सबळ पुरावा आपण याआधीच विचारात घेतला आहे. वैज्ञानिक बाबी हाताळताना त्यांचे शब्द अचूक आहेत आणि त्यांच्यावर कालांतराने फोल ठरलेल्या पुरातन “वैज्ञानिक” सिद्धान्तांचा अजिबातच प्रभाव नाही. शेवटी काय, विज्ञान बायबलचा शत्रू नाही. बायबलचे काय म्हणणे आहे ते मोकळ्या मनाने पडताळून पाहणे यथायोग्यच आहे.
[तळटीपा]
a “प्रतिध्रुवस्थ . . . म्हणजे पृथ्वीच्या गोलावर एकमेकांच्या बरोबर विरुद्ध बाजूंस असणारी दोन ठिकाणे. त्यांच्यामधून जाणारी एक सरळ रेषा पृथ्वीच्या मध्यातून जाईल. प्रतिध्रुवस्थ या शब्दाचा ग्रीक भाषेत पायाला लागून पाय असा अर्थ होतो. प्रतिध्रुवस्थांवर उभ्या असणाऱ्या दोन जणांमधले सर्वात कमी अंतर त्यांच्या तळपायांमधले असेल.”१—द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया.
b शास्त्रशुद्ध भाषेत बोलायचे झाल्यास, पृथ्वी एक लघु-अक्षीय गोलाभ आहे; ती ध्रुवांजवळ किंचित चापट आहे.
c शिवाय, कोणत्याही कोनातून पाहिल्यास केवळ गोलाकार वस्तूच वर्तुळाकार दिसते. मात्र एक सपाट तबकडी अधिकांश वेळा वर्तुळाकार नव्हे, तर एखाद्या लंबवर्तुळासारखी दिसेल.
d न्यूटनच्या काळातील एका प्रचलित दृष्टिकोनानुसार, विश्वात एक द्रव—जणू एक वैश्विक “सूप” भरलेला असून—या द्रवातील भोवऱ्यांमुळे ग्रह फिरत असतात.
e अनेक युरोपियन देशांत आणि संयुक्त संस्थानांत, १९०० साली अपेक्षित आयुर्मर्यादा ५० पेक्षा कमी होती. त्यानंतर तिच्यात लक्षणीय वाढ झाली आहे; रोगप्रतिबंधाच्या दिशेने झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळेच केवळ नव्हे तर पूर्वीपेक्षा चांगल्या आरोग्य आणि जीवन परिस्थितींचाही यात महत्त्वाचा वाटा आहे.
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
अप्रामाण्य असणारे एखादे विधान खोटे असेलच असे नाही
[१८ पानांवरील चित्र]
पृथ्वी गोलाकार आहे हे मनुष्याने अंतराळातून पाहण्याच्या हजारो वर्षांपूर्वी बायबलने ‘पृथ्वीच्या नभोमंडळाचा’ उल्लेख केला होता
[२० पानांवरील चित्र]
सर आयझॅक न्यूटन यांनी खुलासा केला की गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह आपापल्या कक्षेच्या मर्यादेत राहतात