या पुस्तकात काय आहे
या पुस्तकात काय आहे
ग्रंथालयात पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्याला तेथे ठेवलेली असंख्य पुस्तके पाहून कदाचित बावचळल्यागत होईल. पण, ही पुस्तके कशा पद्धतीने रचलेली आहेत याविषयी थोडीबहुत माहिती मिळाल्यावर लवकरच त्याला कोणतेही पुस्तक शोधून काढणे फारसे कठीण जात नाही. तशाच प्रकारे, बायबलमध्ये वेगवेगळे विषय कशा पद्धतीने रचले आहेत हे समजून घेतल्यास त्यातून काही शोधून काढणे तुम्हाला सोपे जाईल.
“बायबल” हा शब्द बिब्लिया या ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “पपायरसच्या गुंडाळ्या” किंवा “पुस्तके” असा होतो.१ बायबल खरे तर एक संग्रहच आहे—जणू एक ग्रंथालय—ज्यात ६६ वेगवेगळी पुस्तके आहेत आणि या पुस्तकांचे लिखाण, सा.यु.पू. १५१३ पासून जवळजवळ सा.यु. ९८ पर्यंत म्हणजे सुमारे १,६०० वर्षे चालले.
पहिल्या ३९ पुस्तकांना म्हणजेच बायबलच्या तीन चतुर्थांश भागाला इब्री शास्त्रवचने या नावाने ओळखतात, कारण ही पुस्तके बहुतकरून याच भाषेत लिहिण्यात आली होती. या पुस्तकांचे साधारण तीन गटांत विभाजन करता येईल: (१) ऐतिहासिक, उत्पत्ती ते एस्तेर, १७ पुस्तके; (२) काव्यात्मक, ईयोब ते गीतरत्ने, ५ पुस्तके; आणि (३) भविष्यसूचक, यशया ते मलाखी, १७ पुस्तके. इब्री शास्त्रवचनांत पृथ्वी आणि मानवजात यांविषयीचा आरंभीचा इतिहास, शिवाय, इस्राएल या प्राचीन राष्ट्राचा जन्म झाला तेव्हापासून सा.यु.पू. पाचव्या शतकापर्यंतचा इतिहासही अंतर्भूत आहे.
उरलेल्या २७ पुस्तकांना ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने म्हणतात कारण ही पुस्तके ग्रीकमध्ये, म्हणजे त्या काळातील आंतरराष्ट्रीय भाषेत लिहिण्यात आली होती. त्यांची रचना प्रामुख्याने त्यांतील विषयांप्रमाणे करण्यात आली आहे: (१) ५ ऐतिहासिक पुस्तके—चार शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये, (२) २१ पत्रे, आणि (३) प्रकटीकरण. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा रोख प्रामुख्याने येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांच्या सा.यु. पहिल्या शतकातील शिकवणुकींवर व कार्यांवर होता.