व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे पुस्तक टिकले कसे?

हे पुस्तक टिकले कसे?

हे पुस्तक टिकले कसे?

प्राचीन लिखाणांना—अग्नी, आर्द्रता, बुरशी यांसारख्या नैसर्गिक शत्रूंची भीती होती. बायबलला हे धोके नव्हते असे नाही. काळाच्या विध्वंसकारी परिणामांपासून बचावून ते जगातले सर्वाधिक सहजपणे उपलब्ध पुस्तक बनले तरी कसे, याविषयीचा अहवाल प्राचीन लिखाणांपैकी अत्यंत उल्लेखनीय असा आहे. या पूर्वेतिहासाविषयी केवळ वरकरणी दखल घेणे पुरेसे ठरणार नाही.

बायबलच्या लेखकांनी शिळांवर किंवा मातीच्या चिरस्थायी पट्ट्यांवर कोरीव लेखन केले नाही. उपलब्ध पुराव्यावरून असे दिसते की त्यांनी आपले शब्द नाशवंत वस्तूंवर अर्थात, पपायरस (याच नावाच्या इजिप्शियन वनस्पतीपासून बनवलेले) आणि चर्मपत्रे (ही प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवलेली असत) यांवर लिहून ठेवले होते.

त्या मूळ लिखाणांचे काय झाले? ती कदाचित प्राचीन इस्राएलात फार पूर्वीच कुजून नाश पावली असावीत. ऑस्कर पॉरेट हे विद्वान खुलासा करून सांगतात: “[पपायरस आणि चामडे] या दोन्ही लेखन साधनांना आर्द्रता, बुरशी आणि निरनिराळे कीटक यांचा तितकाच मोठा धोका असतो. खुल्या हवेत किंवा दमट वातावरण असलेल्या ठिकाणी ठेवल्यास कागद किंवा मजबूत चामडेही किती सहज खराब होते याचा तर आपल्यालाही रोजचा अनुभव आहे.”

जर मूळ लिखाणे अस्तित्वात राहिलेली नाहीत, तर मग बायबल लेखकांचे शब्द आपल्या काळापर्यंत कसे काय टिकून राहिले?

अतिसावध नकलनीसांकरवी जतन

मूळ लिखाण झाल्यावर काही काळातच हस्तलिखित प्रतिकृती तयार करण्यात येऊ लागल्या. शास्त्रवचनांची नक्कल करून प्रतिकृती तयार करणे हा प्राचीन इस्राएलात एक पेशाच बनला. (एज्रा ७:६; स्तोत्र ४५:१) तथापि, या प्रतिकृती तयार करण्यासाठी देखील नाशवंत वस्तूंचाच उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे कालांतराने या प्रतिकृतींच्या ऐवजी इतर हस्तलिखित प्रतिकृती तयार करणे भाग पडले. मूळ लिखाणे नामशेष झाल्यानंतर, याच प्रतीकृतींच्या आधारावर पुढील हस्तलिखिते तयार करण्यात आली. प्रतिकृतींची नक्कल करण्याचे हे काम कितीतरी शतकांपर्यंत चालले. त्या शतकांदरम्यान नकलनीसांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे बायबलमधील मूळ मजकुरात आमूलाग्र बदल झाला का? पुराव्यानुसार असे घडले नाही.

हे पेशेवाईक नकलनीस अत्यंत कर्तव्यनिष्ठ होते. आपण नक्कल करीत असलेल्या शब्दांबद्दल त्यांच्या मनात परम आदर होता. तसेच ते अतिसावध होते. “नकलनीस” हा शब्द, सोफर या इब्री शब्दाचे भाषांतरित रूप असून या इब्री शब्दाचा गणना आणि नोंदणीशी संबंध आहे. नकलनीसांच्या कामातील अचूकपणाचे उदाहरण म्हणून मॅसोरिटीस यांचेच पाहा. a त्यांच्याविषयी थॉमस हार्टवेल हॉर्न हे विद्वान पुढील विवेचन मांडतात: “सबंध पेन्टेट्यूकमधील [बायबलमधील पहिली पाच पुस्तके] मधोमध आढळणारे अक्षर कोणते, प्रत्येक पुस्तकात मधोमध आढळणारा शब्द कोणता, शिवाय, अवघ्या इब्री शास्त्रवचनांत [इब्री] वर्णमालेतील प्रत्येक वर्ण एकूण किती वेळा आढळतो हेही त्यांना अवगत होते.”

अशाप्रकारे, कार्यकुशल नकलनीस वेगवेगळ्या मार्गांनी तपासणी करून आपल्या लेखनाच्या अचूकतेची खात्री करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा उपयोग करीत असत. बायबलच्या मूळ भागातून एकही वर्ण आपल्या हातून निसटू नये म्हणून ते नक्कल करून लिहिलेले केवळ शब्दच नव्हे, तर वर्ण देखील मोजण्याची खबरदारी घेत असत. या किचकट कामासाठी किती कष्ट करावे लागायचे ते पाहा: उपलब्ध माहितीनुसार त्यांना इब्री शास्त्रवचनांतील एकूण ८,१५,१४० पृथ्थक वर्ण मोजावे लागत! अशी परिश्रमपूर्वक खबरदारी घेतल्यामुळे लिखाणाची अचूकता फार मोठ्या प्रमाणावर कायम राहात असे.

तथापि, हे नकलनीस काही दोषहीन नव्हते. शतकानुशतके बायबलच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या असल्या तरीसुद्धा त्यातील मूळ मजकूर विश्‍वासार्ह रूपात कायम टिकून राहिला आहे, याचा काही पुरावा आहे का?

विश्‍वास ठेवण्याकरता भक्कम आधार

सांप्रत काळापर्यंत बायबल अचूकपणे पोचते करण्यात आले आहे हे मानण्याकरता ठोस कारण आहे. उपलब्ध पुराव्यात सध्या अस्तित्वात असलेल्या हस्तलिखित प्रतींचा समावेश आहे—इब्री शास्त्रवचनांच्या संपूर्ण अथवा काही भागांची अंदाजे ६,००० आणि ग्रीक भाषेतील ख्रिस्ती शास्त्रवचनांची सुमारे ५,००० हस्तलिखिते. यांत एक १९४७ साली गवसलेले इब्री शास्त्रवचनांचे हस्तलिखित असून या शास्त्रवचनांची नक्कल करण्याचे काम किती अचूक होते याचे ते एक ज्वलंत उदाहरण आहे. तेव्हापासून या हस्तलिखितास “अर्वाचीन काळातील हस्तलिखितांचा सर्वश्रेष्ठ शोध” म्हणण्यात आले आहे.

त्या वर्षाच्या सुरवातीला, अरेबियातील एका भटक्या जमातीच्या मेंढपाळ मुलाला मृत समुद्रापाशी एक गुहा सापडली. त्या गुहेत त्याला मातीची काही रांजणे सापडली ज्यांपैकी पुष्कळशी रिकामीच होती. पण त्यांपैकी एक असे होते की ज्याचे तोंड पक्के बंद केलेले होते. या रांजणात त्याला तागाच्या कापडात नीट गुंडाळून ठेवलेली एक चर्मपत्राची गुंडाळी सापडली जिच्यात बायबलमधील यशयाचे संपूर्ण पुस्तक होते. या जतन करून ठेवलेल्या पण जीर्ण झालेल्या गुंडाळीवर काही ठिकाणी डागडुजी केल्याच्या खुणा होत्या. आपण हातांत धरलेली ही ऐतिहासिक गुंडाळी पुढे साऱ्‍या जगाचे लक्ष वेधेल याची त्या मेंढपाळ मुलाला किंचितही कल्पना नव्हती.

नेमक्या याच हस्तलिखितात एवढे खास असे काय होते? १९४७ साली उपलब्ध असणाऱ्‍या सगळ्या इब्री हस्तलिखितांपैकी सर्वात जुनी, सुमारे सा.यु. दहाव्या शतकाच्या कालखंडापासूनची होती. पण ही गुंडाळी मात्र सा.यु.पू. b दुसऱ्‍या शतकातील, म्हणजे—हजार वर्षांपेक्षाही पूर्वीची होती. c ही गुंडाळी, पुष्कळ नंतर तयार केलेल्या हस्तलिखितांशी कितपत जुळेल हे जाणून घेण्याची विद्वानांना खूपच उत्सुकता होती.

एका अभ्यासांतर्गत, विद्वानांनी मृत समुद्र गुंडाळीतील यशया पुस्तकाच्या ५३ व्या अध्यायाची, त्याच्या हजार वर्षांनंतर तयार करण्यात आलेल्या मॅसोरेटिक लिखाणाशी तुलना केली. बायबलवर एक सामान्य प्रस्तावना, (इंग्रजी) हे शीर्षक असलेल्या पुस्तकात सदर अभ्यासाच्या निष्कर्षाचे वर्णन केलेले आहे: “यशयाच्या ५३ व्या अध्यायातील एकूण १६६ शब्दांपैकी केवळ सतरा अक्षरे आक्षेपार्ह आहेत. त्यातही दहा अक्षरांत फक्‍त शुद्धलेखनाच्या चुका असून त्यांच्यामुळे मजकुराच्या अर्थामध्ये फरक पडत नाही. आणखी चार अक्षरांवर, उभयान्वयी अव्यये वापरणे किंवा न वापरणे यांसारख्या लेखनशैलीतल्या केवळ बारीकसारीक बदलांमुळे फरक पडला आहे. उरलेल्या तीन अक्षरांपासून तयार झालेला ‘प्रकाश’ हा एक जास्तीचा शब्द ११ व्या वचनात घालण्यात आला आहे, पण त्यामुळे मजकुराच्या अर्थावर फारसा परिणाम होत नाही. . . . अशाप्रकारे, हजार वर्षांच्या दरम्यान आपल्यापर्यंत येता येता एकूण १६६ शब्दांच्या या एका अध्यायात, आक्षेप घेता येईल असा केवळ एकच शब्द (तीन अक्षरांचा) सापडतो—आणि या शब्दामुळे सदर उताऱ्‍याच्या अर्थामध्ये कोणताच खास बदल होत नाही.”

याच गुंडाळ्यांतील मजकुराचे विश्‍लेषण करीत वर्षानुवर्षे त्यांवर अभ्यास करणारे प्राध्यापक मिलर बरोझ यांनी देखील काहीसा असाच निष्कर्ष काढला: “यशया पुस्तकाची गुंडाळी आणि मॅसोरेटिक लिखाणे . . . यांतील पुष्कळशा फरकांना प्रतिकृती तयार करताना झालेल्या चुका म्हणता येईल. यांच्या व्यतिरिक्‍त, एकंदरीत पाहता या गुंडाळ्यांची मध्ययुगीन हस्तलिखितांतील मजकुराशी उल्लेखनीय एकवाक्यता आढळते. एवढ्या जुन्या हस्तलिखिताशी असणारी ही एकवाक्यता पारंपरिक लिखाणांच्या सर्वसाधारण अचूकतेची खात्रीदायक ग्वाही देते.”

अशीच “खात्रीदायक ग्वाही” ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या प्रतिकृती तयार करण्याविषयीही देता येईल. उदाहरणार्थ, १९ व्या शतकात सा.यु. चौथ्या शतकाच्या कालखंडातील एक चर्मपत्र हस्तलिखित, अर्थात कोडेक्स सायनायटिकस गवसल्यामुळे त्याच्या कितीतरी शतकांनंतर तयार करण्यात आलेली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची हस्तलिखिते अचूक आहेत याविषयी खात्री पटू शकली. ईजिप्तच्या फय्यूम प्रांतात गवसलेला योहानाच्या शुभवर्तमानाचा पपायरसचा तुकडा, सा.यु. दुसऱ्‍या शतकाच्या पूर्वार्धातला म्हणजेच मूळ लिखाण होऊन ५० वर्षे देखील लोटली नव्हती तेव्हाच्या कालखंडातला आहे. त्याचे कोरड्या वाळूत शतकानुशतके जतन झाले होते. त्यातील मूळ मजकूर, त्याच्यापेक्षा कितीतरी काळानंतर गवसलेल्या हस्तलिखितांतील मजकुराच्या सुसंगतेत आहे.

तर अशारितीने पुराव्यावरून खात्री पटते की या नकलनीसांचे काम खरोखरच अत्यंत अचूक होते. तरीसुद्धा, त्यांच्या हातूनही चुका या घडल्याच. एकही हस्तलिखित पूर्णपणे दोषहीन नाही—यशयाची मृत समुद्र गुंडाळी देखील यात आलीच. तरीसुद्धा, विद्वानांनी मूळ लिखाणाशी असलेल्या अशाप्रकारच्या विसंगतींचा शोध लावून त्यांमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत.

नकलनीसांच्या चुकांची दुरुस्ती

शंभर लोकांना एका लांबलचक दस्तऐवजाची हस्तलिखित प्रत तयार करण्यास सांगण्यात आले आहे असे गृहीत धरा. यांतील निदान काही नकलनीस तरी चुका करतील, हे तर ठरलेलेच आहे. तथापि, त्या सर्वांच्या हातून सारख्याच चुका घडणार नाहीत. या सर्व १०० प्रतिकृती घेऊन त्यांची अगदी बारकाईने तुलना केल्यास, तुम्हाला या सर्व चुकांचे पृथक्करण करून मूळ दस्तऐवजातील नेमका मजकूर काय होता हे ठरवता येईल, जरी तुम्ही कधीच तो प्रत्यक्ष पाहिलेला नसला तरीसुद्धा.

तशाच प्रकारे, बायबलच्या प्रतिकृती तयार करणाऱ्‍या सर्व नकलनीसांनी देखील सारख्याच चुका केल्या नाहीत. तुलनात्मक मीमांसेकरता आजच्या तारखेला उपलब्ध असलेल्या अक्षरशः हजारो बायबल हस्तलिखितांच्या आधारावर, मूळग्रंथाच्या विद्वानांना चुकांचे पृथक्करण करणे, मूळ मजकूर काय तो ठरवणे आणि आवश्‍यक दुरुस्त्यांची नोंद घेणे शक्य झाले आहे. अशा सखोल अभ्यासामुळे, मूळग्रंथाच्या विद्वानांना मूळ भाषांच्या मूळप्रती तयार करण्यात यश आले आहे. इब्री व ग्रीक मूळप्रतींच्या या सुधारित आवृत्तींमध्ये असेच शब्द ठेवण्यात आले आहेत की जे मूळ शब्द असण्याविषयी सर्वसामान्यपणे एकमत आहे, तसेच, वेगळ्या तळटिपा किंवा पर्यायी मजकूर असल्यास त्यांना देखील पुष्कळ ठिकाणी सूचीबद्ध करण्यात आले आहे. बायबलचे भाषांतरकार आज बायबलचे आधुनिक भाषांत भाषांतर करताना, मूळग्रंथ विद्वानांनी तयार केलेल्या याच सुधारित आवृत्तींचा उपयोग करतात.

म्हणूनच, तुम्ही बायबलचे एखादे आधुनिक भाषांतर वाचायला घेता तेव्हा इब्री आणि ग्रीक भाषेतील त्याची आधारभूत लिखाणे मूळ बायबल लेखकांनी वापरलेल्या शब्दांचे अत्यंत विश्‍वासूपणे दर्शन घडवतात असे मानण्यास ठोस कारण आहे. d हजारो वर्षांपर्यंत हाताने प्रतिकृती तयार करण्यात येत असताना बायबल कसे टिकून राहिले याविषयीचा अहवाल खरोखरच अनन्यसाधारण आहे. याच कारणाने, ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाचे अनुभवी व्यवस्थापक सर फ्रेड्रिक केन्यन म्हणू शकले: “बायबलच्या मूळग्रंथातील मजकूर खात्रीलायक आहे हे छातीठोकपणे म्हटल्यास ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही . . . असे जगातल्या आणखी कोणत्याच प्राचीन पुस्तकाविषयी म्हणता यायचे नाही.”१०

[तळटीपा]

a मॅसोरिटीस (अर्थात, “संप्रदायाचे विद्वान”) हे सा. यु. सहाव्या आणि दहाव्या शतकांदरम्यानच्या काळातले इब्री शास्त्रवचनांचे नकलनीस होते. त्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांना मॅसोरेटिक लिखाणे म्हणतात.

b सा.यु.पू. याचा अर्थ “सामान्य युग पूर्व” असा होतो. सा.यु. म्हणजे “सामान्य युग;” यास सहसा इ. स. अर्थात इसवी सन म्हणतात व त्याचा अर्थ “प्रभूच्या वर्षात” असा होतो.

c इम्मानवेल तोव यांनी लिहिलेल्या इब्री बायबलवर मूळग्रंथविषयक टीका (इंग्रजी) यात पुढील विधान आढळते: “कार्बन १४ पद्धतीने 1QIsaa [यशयाची मृत समुद्र गुंडाळी] हिचा कालखंड आता सायुपू २०२ आणि १०७ (पुराभिलेखविद्येनुसार काढलेली तिथी: १२५-१०० सायुपू) यादरम्यान असल्याचे ठरवण्यात आले आहे . . . उल्लेखित पुराभिलेखविद्येच्या कालमापन पद्धतीत अलीकडील वर्षांत सुधारणा करण्यात आलेली आहे; या पद्धतीच्या साहाय्याने अक्षरांचा आकार आणि मांडणीची, तारखा असलेली नाणी तसेच खोदीव लेख यांसारख्या बाह्‍य पुराव्यांशी तुलना करून निश्‍चित कालमापन करता येते; ही पद्धती तुलनात्मकपणे विश्‍वासार्ह ठरली आहे.”

d अर्थात, मूळ इब्री आणि ग्रीक लिखाणांशी जडून राहण्याच्या बाबतीत प्रत्येक भाषांतरकार कमीजास्त प्रमाणात एकतर कडक किंवा निष्काळजी राहिला असावा ही शक्यता नाकारता येणार नाही.

[८ पानांवरील चित्र]

कार्यकुशल नकलनीसांनी बायबल पुस्तकाचे जतन केले

[९ पानांवरील चित्र]

यशयाची मृत समुद्र गुंडाळी (प्रतिरूप दाखवण्यात आले आहे) हजार वर्षांनंतर तयार करण्यात आलेल्या मॅसोरेटिक लिखाणाशी तंतोतंत जुळते