व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे पुस्तक तुमच्यासाठी आहे का?

हे पुस्तक तुमच्यासाठी आहे का?

हे पुस्तक तुमच्यासाठी आहे का?

“पुष्कळ पुस्तके लिहिण्याला काही अंत नाही,” हे होते ३,००० वर्षांपूर्वीचे शलमोनाचे शब्द. (उपदेशक १२:१२, पं.र.भा.) तो निष्कर्ष आजही तितकाच खरा आहे. दर्जेदार श्रेष्ठ ग्रंथांच्या जोडीला, दरवर्षी हजारो इतर नवी पुस्तकेही बाजारात येतात. इतकी पुस्तके उपलब्ध असताना, तुम्ही बायबल का वाचावे?

अनेक लोक एकतर मनोरंजनासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी, किंवा कदाचित दोन्ही उद्देशांसाठी वाचन करतात. बायबलच्या वाचनाविषयी देखील हेच म्हणता येईल. त्याच्या वाचनाने प्रगल्भता तर येतेच पण ते मनोरंजकही ठरू शकते. पण बायबल वाचण्याचे फायदे एवढ्यावरच संपत नाहीत. हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचे अतुलनीय भांडार आहे.—उपदेशक १२:९, १०.

आपला भूतकाळ, आपले वर्तमान आणि आपले भविष्य यांसंबंधी मनुष्याला वर्षांनुवर्षे बुचकळ्यात पाडणाऱ्‍या प्रश्‍नांची बायबलमध्ये उत्तरे सापडतात. अनेकजण विचार करतात: आपण कोठून आलो? जीवनाचा उद्देश काय असावा? जीवनात निर्भेळ आनंदाचा उपभोग घेण्यासाठी काय करावे? पृथ्वीवर जीवसृष्टी कायम अस्तित्वात राहील का? भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलेले आहे?

प्रस्तुत केलेल्या सबंध पुराव्याचा एकंदरीत रोख याकडे आहे की बायबल हे अचूक आणि विश्‍वसनीय आहे. त्यातील उपयुक्‍त मार्गदर्शनाचे पालन केल्याने आज आपल्याला अर्थपूर्ण आणि आनंदपूर्ण जीवन कसे जगता येईल हे आपण आधीच विचारात घेतले आहे. वर्तमान काळातील प्रश्‍नांवर ज्याअर्थी त्यात समाधानकारक उत्तरे सापडतात, त्याअर्थी त्यातील भूतकाळाविषयीची उत्तरे आणि भविष्याविषयीच्या भविष्यवाण्या निश्‍चितच काळजीपूर्वक लक्ष देण्याजोग्या आहेत.

पुरेपूर लाभ कसा मिळवावा

अनेक जण बायबलचे वाचन सुरू तर करतात पण त्यातील काही भाग समजायला कठीण आहेत असे दिसताच ते आपले वाचन थांबवतात. तुम्हालाही असाच अनुभव आला असल्यास, पुढील काही सूचना तुम्हाला कदाचित सहायक ठरतील.

काहीजण सुरवातीला येशूच्या जीवनाचे शुभवर्तमान वृत्तान्त वाचतात; यांत अभिलिखित केलेल्या येशूच्या सुविज्ञ शिकवणुकी, उदाहरणार्थ डोंगरावरील प्रवचनातल्या शिकवणुकी मनुष्यस्वभावाविषयी सूक्ष्म जाणिवेचे दर्शन घडवतात आणि आपल्या जीवनात कोठे सुधारणा कराव्यात याविषयीही मार्गदर्शन करतात.—पाहा मत्तय अध्याय ५ ते ७.

सबंध बायबल वाचून काढण्याव्यतिरिक्‍त, विषयवार पद्धतीने अभ्यास करणेही अतिशय माहितीप्रद ठरू शकते. यात एखाद्या खास विषयावर बायबलचे काय म्हणणे आहे याचे विश्‍लेषण करणे सम्मिलीत आहे. जीव, स्वर्ग, पृथ्वी, जीवन आणि मृत्यू, याशिवाय देवाचे राज्य—ते काय आहे आणि त्याद्वारे काय साध्य होईल यांसारख्या विषयांवर बायबलचे खरोखर काय म्हणणे आहे हे जाणून तुम्हाला आश्‍चर्य होईल. a यहोवाच्या साक्षीदारांचा एक विषयवार बायबल अभ्यासाचा विनामूल्य कार्यक्रम आहे. पृष्ठ २ वर सूचिबद्ध केलेल्यांपैकी योग्य पत्त्यावर पत्र लिहून तुम्ही प्रकाशकांना याविषयी माहिती देण्याची विनंती करू शकता.

पुराव्याचे परीक्षण केल्यावर अनेकजण या निष्कर्षावर आले आहेत की बायबल हे देवाकडून आहे, ज्याची शास्त्रवचनांत “यहोवा” या नावाने ओळख करून दिलेली आहे. (स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.) बायबल हे देवाकडून आहे याविषयी कदाचित तुम्हाला खात्री नसेल. पण, स्वतः त्याचे परीक्षण करून पाहण्यात काय हरकत आहे? आम्हाला खात्री आहे की बायबलविषयी शिकून, मनन करून, त्यातील कालनिरपेक्ष बुद्धीच्या उपयुक्‍ततेचा कदाचित स्वतः अनुभव घेतल्यावर तुम्हीही म्हणाल की बायबल हे पुस्तक खरोखर सर्व लोकांसाठी आणि मुख्य म्हणजे—तुमच्यासाठी आहे.

[तळटीप]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक बायबलचा विषयवार अभ्यास करण्यासाठी अनेकांना सहायक ठरले आहे.