त्यांनी खूप काही मिळवलं
लाखो ख्रिस्ती लोकांनी नाताळ पाळायचा नाही असं ठरवलंय. त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांना कसं वाटतं? या सणाच्या वेळी इतर जण जे करतात, ते आपल्याला करता येत नाही याचं त्यांना वाईट वाटतं का? किंवा त्यांच्या मुलांना तसं वाटतं का? जगभरातले यहोवाचे साक्षीदार याबद्दल काय म्हणतात याकडे लक्ष द्या.
येशू ख्रिस्ताची आठवण करणं: “यहोवाची साक्षीदार बनण्याआधी मी फक्त नाताळाच्या किंवा ईस्टरच्या दिवशीच चर्चला जायचे. पण तेव्हासुद्धा मी काही येशू ख्रिस्ताचा विचार करायचे नाही. आता मी नाताळ साजरा करत नाही, पण आठवड्यातून दोनदा मी ख्रिस्ती सभांना जाते आणि येशूबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय हे इतरांनाही शिकवते.”—ईव, ऑस्ट्रेलिया.
देण्याचा आनंद अनुभवणं: “गिफ्ट मिळणार हे माहीत नसताना जेव्हा ते मिळतं, तेव्हा खूप मस्त वाटतं. मला असे अचानक मिळालेले गिफ्ट खूप आवडतात! मलाही दुसऱ्यांसाठी ग्रिटींग कार्ड आणि पेंटिंग बनवायला आवडतं. कारण यामुळे त्यांना तर आनंद होतोच, पण मलाही होतो.”—रूबेन, उत्तर आयर्लंड.
गरजू लोकांना मदत करणं: “आम्ही आजारी लोकांसाठी जेवण बनवून नेतो. आम्हाला असं करायला आवडतं. त्यांना बरं वाटावं म्हणून कधीकधी आम्ही त्यांच्यासाठी फुलं, केक किंवा छोटीशी भेटवस्तू नेतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे वर्षभरातून केव्हाही करता येतं.”—एमिली, ऑस्ट्रेलिया.
कुटंबासोबत एकत्र येणं: “आमचं सगळं कुटुंब जेव्हा-जेव्हा एकत्र येतं, तेव्हा मुलांना त्यांच्या काका-काकूंना, मामा-मामींना, आजी-आजोबांना, तसंच आपल्या इतर भावंडांनाही भेटायला मिळतं आणि त्या वेळी खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. अमुक सणाच्या वेळी एकमेकांच्या घरी गेलंच पाहिजे असं नसल्यामुळे, आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही आमच्या नातेवाइकांच्या घरी जातो. आणि तेव्हा त्यांनाही हे माहीत असतं की आम्ही फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे आलोय.”—वेंडी, केमन बेटं.
शांती: “नाताळाच्या वेळी लोक इतके व्यस्त असतात, की शांतीबद्दल विचार करायला फार कमी लोकांकडे वेळ असतो. पण मला बायबलमधून शिकायला मिळालंय, की देवाने मानवांसाठी भविष्यात भरपूर चांगले आशीर्वाद ठेवले आहेत. आणि यामुळे खरंतर मला मनाची शांती मिळालीए. मला आता कळलंय की माझ्या मुलांचं चांगलं भवितव्य असेल.”—सॅंड्रा, स्पेन.