व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शैक्षणिक कार्यक्रम

शैक्षणिक कार्यक्रम

बायबलच्या शैक्षणिक कार्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांची ख्याती सर्वदूर आहे.

बायबलच्या शैक्षणिक कार्याला यहोवाचे साक्षीदार फार महत्त्व देतात त्यामुळे काही लोक असा विचार करतात, की यहोवाच्या साक्षीदारांना लौकिक शिक्षणामध्ये इतकी आस्था नाही. परंतु खरे तर तसे नाही. दुसऱ्‍यांना शिकवण्याकरता, एखाद्या शिक्षकाला पहिल्यांदा स्वतः शिकावे लागते आणि त्याकरता योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. यास्तव, लौकिक शालेय शिक्षणाचा सदुपयोग करण्यासोबतच, यहोवाच्या साक्षीदारांनी पुष्कळ वर्षांपासून वॉच टावर सोसायटीद्वारे चालवण्यात येणाऱ्‍या विविध शैक्षणिक कार्यक्रमांचा आणि प्रशालांचा लाभ घेतला आहे. मानसिकरीत्या, नैतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या सुधारणा करण्यासाठी या गोष्टींमुळे साक्षीदारांना तसेच इतरांना मदत मिळाली आहे.

उदाहरणार्थ, साक्षीदारांनी अनेक देशांत—योग्य शालेय शिक्षणाची फारशी संधी न मिळालेल्या आणि त्यामुळे लिहिता-वाचता न येणाऱ्‍या लोकांना कसे शिकवावे—या खास आव्हानाला तोंड दिले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वॉच टावर सोसायटीने साक्षरता कार्यक्रमाची योजना आखली आहे.

उदाहरणार्थ, नायजेरियामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी १९४९ पासून साक्षरता वर्ग चालवले आहेत. यामुळे १९६१ पर्यंत नायजेरियातील हजारो लोक वाचण्यास शिकले आणि उपलब्ध अहवाल दाखवतात, की याशिवाय १९६२ आणि १९९४ या वर्षांदरम्यान या वर्गांत एकूण २५,५९९ लोकांना वाचण्यास आणि लिहिण्यास शिकवण्यात आले. अलीकडील सर्वेक्षणातून दिसून आले, की नायजेरियात ९० टक्क्यांपेक्षा अधिक साक्षीदार साक्षर आहेत, परंतु उर्वरित लोकसंख्येमध्ये साक्षरतेचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मेक्सिकोमध्ये वॉच टावर सोसायटीने १९४६ पासून साक्षरता वर्ग चालवले आहेत. सन १९९४ या वर्षादरम्यान ६,५०० पेक्षा अधिक लोकांना वाचण्यास आणि लिहिण्यास शिकवण्यात आले. १९४६ आणि १९९४ या वर्षांमध्ये १,२७,००० पेक्षा अधिक लोकांना साक्षर करण्यासाठी त्यांना साहाय्य करण्यात आले. इतर अनेक देशांतही साक्षरता वर्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, उदाहरणार्थ, कॅमेरून, झांबिया, बोलिव्हिया, आणि होंडुराज.

अशाप्रकारचे साक्षरता कार्यक्रम राबवण्यात आलेल्या देशांत शैक्षणिक अधिकाऱ्‍यांचीही या कार्यास मान्यता मिळाली आहे. उदाहरणार्थ, मेक्सिकोमधील एका नगर-सेवकाने लिहिले: “आपल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि लोकांच्या लाभास्तव निरक्षर लोकांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाण्याच्या आपल्या महान प्रगमनशील कार्याबद्दल राज्य सरकाराच्या वतीने मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. . . . आपल्या शैक्षणिक कार्यास यश लाभो हीच शुभेच्छा.”

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला

ईश्‍वरशासित प्रशालेतील विद्यार्थ्यांना जाहीर वाचनाचे आणि वक्‍तृत्वाचे प्रशिक्षण प्राप्त होते

बायबलच्या शैक्षणिक कार्याला यहोवाचे साक्षीदार फार महत्त्व देतात त्यामुळे इतरांना बायबल शिकवणींविषयी सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेत सुधारणा करण्याचा ते प्रयत्न करतात. अशाप्रकारची मदत देण्याकरता, जगभरातील ७५,००० पेक्षा अधिक मंडळ्यांत दर आठवडी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला नावाची सभा असते. यात नाव नोंदवणारे सर्वजण, मग ते साक्षीदार असोत अथवा नसोत आळीपाळीने प्रेक्षकांसमोर आधीच निवडलेल्या विषयावर संक्षिप्त प्रस्तुती सादर करतात. यानंतर जाहीर वाचन आणि वक्‍तृत्वाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रशिक्षकांद्वारे त्यांना शेरा देण्यात येतो, मग त्या विद्यार्थ्यांचे वय कितीही असो. अगदी लहान मुले देखील वाचायला शिकली, की लगेच ती या प्रशालेत दाखल होऊन प्रशिक्षण प्राप्त करू शकतात; यामुळे त्यांना त्यांच्या लौकिक शालेय शिक्षणासहित इतर क्षेत्रांतही निश्‍चित लाभ होऊ शकतो. साक्षीदार असलेले विद्यार्थी त्यांचे विचार अतिशय चांगल्याप्रकारे व्यक्‍त करतात, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्‍त केले आहे.

त्यांच्या मंडळ्यांमध्ये वाचन करण्याकरता प्रेमळ उत्तेजन देण्यात येते, त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला प्रोत्साहन देण्यात येते, की कौटुंबिक ग्रंथालय तयार करून त्यामध्ये निरनिराळ्या विषयांवर भरपूर साहित्य उपलब्ध करावे

याशिवाय, यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक मंडळीला असे उत्तेजन देण्यात येते, की राज्य सभागृहामध्ये किंवा सभेच्या ठिकाणी एक ग्रंथालय असावे आणि त्यामध्ये बायबल अभ्यासाकरता आवश्‍यक साहित्य, शब्दकोश आणि इतर संदर्भ साहित्य असावेत. हे ग्रंथालय राज्य सभागृहात उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांकरता खुले असते. साक्षीदारांना मंडळीद्वारे वाचन करण्याकरता प्रेमळ उत्तेजन देण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला प्रोत्साहन देण्यात येते, की कौटुंबिक ग्रंथालय तयार करून त्यामध्ये लहानग्यांकरता आणि मोठ्यांकरता उपयोगी पडेल असे निरनिराळ्या विषयांचे भरपूर साहित्य उपलब्ध करावे.

इतर प्रशाला

स्त्री-पुरुष मिशनऱ्‍यांना तसेच स्थानिक मंडळ्यांमध्ये सेवाकार्याची जबाबदारी असलेल्या पुरुषांना प्रशिक्षण देण्याकरता वॉच टावर सोसायटी अनेक प्रशाला चालवते. यहोवाचे साक्षीदार शिक्षणाला अतिशय महत्त्व देतात, या गोष्टीचा हा आणखी एक पुरावा आहे.