इफिसकर ३:१-२१

  • पवित्र रहस्यात विदेश्‍यांचाही समावेश (१-१३)

    • विदेशी, ख्रिस्ताचे सहवारस ()

    • देवाचा सर्वकाळाचा संकल्प (११)

  • इफिसकरांना समजबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना (१४-२१)

 त्यामुळे, मी पौल जो ख्रिस्त येशूसाठी आणि तुम्हा विदेश्‍यांसाठी कैदेत आहे . . . २  तुमच्यासाठी देवाच्या अपार कृपेचा कारभार जो माझ्यावर सोपवण्यात आला होता, त्याविषयी तुम्ही नक्कीच ऐकले असेल; ३  म्हणजे, मला एक पवित्र रहस्य प्रकट करण्यात आले, आणि त्याविषयी मी याआधी थोडक्यात लिहिलेदेखील होते. ४  त्यामुळे तुम्ही हे वाचाल, तेव्हा ख्रिस्ताच्या पवित्र रहस्याविषयी माझ्या ज्ञानाची तुम्हाला कल्पना येईल. ५  पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे रहस्य मानवांना कळवण्यात आले नव्हते, जसे ते आज देवाच्या आत्म्याद्वारे पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करण्यात आले आहे. ६  ते असे, की विदेशी लोकांनीही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात यावे आणि आनंदाच्या संदेशाद्वारे सहवारस व एकाच शरीरातील अवयव, तसेच, आमच्यासोबत अभिवचनाचे भागीदार व्हावे. ७  देवाने मला त्याच्या सामर्थ्याच्या कार्याद्वारे, त्याच्या अपार कृपेचे मोफत कृपादान दिल्यामुळे मी या पवित्र रहस्याचा सेवक बनलो. ८  मी जो पवित्र जनांपैकी सर्वात लहानापेक्षा लहान आहे, त्या माझ्यावर ही अपार कृपा करण्यात आली. यासाठी, की मी ख्रिस्ताकडून मिळणाऱ्‍या अमाप आशीर्वादांबद्दलचा आनंदाचा संदेश विदेश्‍यांना सांगावा; ९  आणि सर्व गोष्टी निर्माण करणाऱ्‍या देवाने जे पवित्र रहस्य अनेक काळांपासून लपवून ठेवले आहे, ते प्रकट करण्याची व्यवस्था कशा प्रकारे पार पाडण्यात आली, हे सर्वांना समजावून सांगावे. १०  हे यासाठी की, आता मंडळीद्वारे स्वर्गातील शासनांना व अधिकारांना, विविध मार्गांनी प्रकट होणारी देवाची बुद्धी कळवण्यात यावी. ११  देवाने ख्रिस्ताच्या, अर्थात आपल्या प्रभू येशूच्या संबंधाने केलेल्या त्याच्या सर्वकाळाच्या संकल्पानुसार हे आहे. १२  ख्रिस्ताद्वारेच आपण मोकळेपणाने बोलू शकतो आणि त्याच्यावरील आपल्या विश्‍वासामुळेच आपण धैर्याने देवासमोर जाऊ शकतो. १३  म्हणूनच, तुमच्यासाठी मला जी संकटे सोसावी लागत आहेत, त्यांमुळे खचून जाऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो; कारण ही संकटे तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १४  याच कारणामुळे मी त्या पित्यासमोर गुडघे टेकतो, १५  ज्याच्याकडून स्वर्गात व पृथ्वीवर प्रत्येक कुटुंबाला नाव मिळाले आहे. १६  मी प्रार्थना करतो, की त्याच्या विपुल गौरवाद्वारे त्याने तुम्हाला असे वरदान द्यावे, की तुमचा आतला मनुष्य त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने दिवसेंदिवस शक्‍तिशाली होत जावा; १७  आणि तुमच्या विश्‍वासाद्वारे, प्रेमाने भरलेल्या तुमच्या अंतःकरणात ख्रिस्ताने राहावे. तसेच, तुम्ही विश्‍वासाच्या पायावर मुळावलेले व स्थिरावलेले असे असावे, १८  यासाठी की तुम्ही सर्व पवित्र जनांसोबत सत्याची रुंदी, लांबी, उंची व खोली पूर्णपणे समजून घेण्यासाठी सर्व प्रकारे समर्थ व्हावे; १९  आणि ख्रिस्ताचे प्रेम, जे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ते तुम्ही जाणून घ्यावे, यासाठी की देवाकडून मिळणाऱ्‍या पूर्णतेने तुम्ही भरून जावे. २०  आता, जो देव आपल्यामध्ये कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याद्वारे, आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो, २१  त्या देवाला मंडळीद्वारे आणि ख्रिस्त येशूद्वारे युगानुयुग सदासर्वकाळ गौरव मिळत राहो. आमेन.

तळटीपा