इब्री लोकांना १:१-१४

  • देव त्याच्या पुत्राद्वारे बोलतो (१-४)

  • पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ (५-१४)

 देव प्राचीन काळात आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बऱ्‍याच वेळा, वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. २  पण, आता या काळाच्या अखेरीस तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे; त्या पुत्राला त्याने सर्व गोष्टींचा वारस ठरवले आहे आणि त्याच्याचद्वारे त्याने जगाच्या व्यवस्था* अस्तित्वात आणल्या. ३  तो देवाच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या स्वभावाचे हुबेहूब प्रतिरूप आहे. तो त्याच्या सामर्थ्याच्या वचनाने सर्व गोष्टी टिकवून ठेवतो. आपल्याला आपल्या पापांपासून शुद्ध केल्यानंतर, तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या उजव्या हाताला जाऊन बसला. ४  अशा रीतीने, तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ बनला आहे, कारण त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम असे नाव त्याला मिळाले आहे. ५  उदाहरणार्थ, कोणत्याही देवदूताबद्दल देवाने कधी तरी असे म्हटले होते का: “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे”? तसेच: “मी त्याचा पिता बनेन, आणि तो माझा पुत्र बनेल”? ६  पण, जेव्हा तो आपल्या ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो: “सर्व देवदूतांनी त्याला नमन करावे.” ७  तसेच, देवदूतांबद्दल तो असे म्हणतो: “तो आपल्या देवदूतांना शक्‍तिशाली आत्मे* बनवतो, आणि त्याच्या सेवकांना* अग्नीची ज्वाला बनवतो.” ८  पण पुत्राबद्दल तो असे म्हणतो: “देव सदासर्वकाळ तुझे राजासन आहे आणि तुझा राजदंड हा नीतीचा* राजदंड आहे. ९  तू नीतिमत्त्व प्रिय मानले आणि अनीतीचा द्वेष केला. म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षाही, आनंदरूपी तेलाने तुझा अभिषेक केला.” १०  आणि: “हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातांची कृती आहे. ११  ती नाहीशी होतील, पण तू सदासर्वकाळ राहशील; एखाद्या कापडाप्रमाणे ती सर्व जीर्ण होतील, १२  आणि एखाद्या झग्याप्रमाणे, एखाद्या कापडाप्रमाणे तू त्यांना गुंडाळशील आणि ती बदलून जातील. पण, तू मात्र तोच आहेस आणि तुझ्या आयुष्याची वर्षे कधीच संपणार नाहीत.” १३  पण कोणत्याही देवदूताबद्दल त्याने कधी तरी असे म्हटले का: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखालचे आसन करेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”? १४  ते सर्व पवित्र सेवेसाठी,* अर्थात ज्यांना तारणाचा वारसा मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले आत्मे* नाहीत का?

तळटीपा

किंवा “काळ.” शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, न्यूमा. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जनसेवकांना.”
किंवा “न्यायाचा.”
किंवा “जनसेवेसाठी.”
ग्रीक, न्यूमा. शब्दार्थसूची पाहा.