इब्री लोकांना १२:१-२९
१२ तर मग, आपण साक्षीदारांच्या इतक्या मोठ्या ढगाने वेढलेले असल्यामुळे, आपण प्रत्येक ओझे आणि सहज अडकवणारे पाप काढून टाकू या आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या;
२ आणि आपल्या विश्वासाचा मुख्य प्रतिनिधी असलेल्या व आपला विश्वास परिपूर्ण करणाऱ्या येशूवर आपण आपली नजर केंद्रित करू या. कारण, जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ* सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.
३ खरेच, ज्याने पापी लोकांचे इतके अपमानास्पद बोलणे सहन केले त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या, म्हणजे तुम्ही थकून जाऊन हार मानणार नाही; त्याच्याविरोधात बोलून त्या लोकांनी स्वतःवरच दोष ओढवून घेतला.
४ पापाशी संघर्ष करताना तुमचे रक्त सांडेपर्यंत तुम्हाला कधीही प्रतिकार करावा लागला नाही.
५ आणि देवाने तुम्हाला आपली मुले या नात्याने दिलेला हा सल्ला तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात: “माझ्या मुला, यहोवाने* दिलेली शिक्षा तुच्छ लेखू नकोस, किंवा त्याने तुझी चूक सुधारल्यास खचून जाऊ नकोस;
६ कारण, यहोवा* ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो; खरेतर, ज्या कोणाला तो आपला मुलगा म्हणून स्वीकारतो त्याला तो फटके मारतो.”*
७ आपल्याला सुधारण्याचा* हा एक मार्ग आहे असे समजून तुम्ही हे सहन करा. देव तुम्हाला आपली मुले समजून तुमच्याशी व्यवहार करतो. कारण, असा कोणता मुलगा आहे ज्याला त्याचे वडील शिक्षा करत नाहीत?
८ पण, जर तुम्हा सर्वांना अशी शिक्षा मिळाली नसेल, तर मुळात तुम्ही खरी मुले नाहीत, तर अनौरस* मुले आहात.
९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपल्याला आध्यात्मिक जीवन देणाऱ्या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिले पाहिजे, यासाठी की आपण जिवंत राहावे?
१० कारण, त्यांनी फक्त काही काळासाठी, त्यांना योग्य वाटले त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा केली; पण, तो तर आपल्या भल्यासाठी आपल्याला शिक्षा करतो, यासाठी की आपण त्याच्यासारखे पवित्र बनावे.
११ हे खरे आहे, की कोणत्याही शिक्षेमुळे सुरुवातीला आनंद होत नाही, उलट वाईटच वाटते;* पण, ज्यांना या शिक्षेमुळे वळण लागते त्यांच्यासाठी ती पुढे नीतिमत्त्वाचे शांतिदायक फळ उत्पन्न करते.
१२ त्यामुळे, गळून गेलेले हात आणि कमजोर झालेले गुडघे बळकट करा,
१३ आणि आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा, यासाठी की लंगड्या पायाचा सांधा निखळू नये, तर तो बरा व्हावा.
१४ सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा आणि पावित्र्य* टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहा, कारण पवित्र असल्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.
१५ देवाची अपार कृपा मिळवण्यास कोणीही चुकणार नाही याकडे विशेष लक्ष द्या; म्हणजे, नुकसान करणारे कोणतेही विषारी मूळ उत्पन्न होऊन अनेक जण दूषित होणार नाहीत;
१६ आणि तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारा किंवा एसावसारखा पवित्र गोष्टींची कदर नसलेला कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या; त्याने केवळ एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क विकून टाकला.
१७ कारण तुम्हाला माहीत आहे, की नंतर जेव्हा त्याने वारसदाराच्या हक्काने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला नाकारण्यात आले; आणि त्याने त्याचे* मन बदलण्यासाठी अश्रू गाळले व खूप गयावया केली तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही.
१८ कारण तुम्ही, स्पर्श करता येण्यासारख्या व आगीने पेटलेल्या पर्वताजवळ; किंवा दाट ढग, घोर अंधार व वादळ यांजवळ आलेला नाहीत;
१९ किंवा मग, तुम्ही कर्ण्याचा नाद आणि कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकत नाहीत; तो ऐकताच, आता आणखी ऐकायला नको अशी लोकांनी विनंती केली होती.
२० कारण, “एखाद्या जनावराने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा,” या आज्ञेमुळे ते अतिशय घाबरले.
२१ शिवाय, ते दृश्य इतके भयानक होते की, “मी भीतीने थरथर कापत आहे,” असे मोशेने म्हटले.
२२ पण तुम्ही तर, सीयोन पर्वत, जिवंत देवाचे शहर, अर्थात स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूतांची महासभा यांजवळ आला आहात;
२३ आणि प्रथमपुत्राची मंडळी, ज्यांची नावे स्वर्गात लिहिण्यात आली आहेत व सर्वांचा न्यायाधीश असलेला देव आणि ज्यांना परिपूर्ण करण्यात आले आहे, ते पवित्र आत्म्याने उत्पन्न झालेले नीतिमान जन यांच्याजवळ तुम्ही आला आहात;
२४ तसेच, एका नव्या कराराचा मध्यस्थ, येशू आणि त्याने आपल्यावर शिंपडलेले रक्त, जे हाबेलच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे बोलते, यांजवळ तुम्ही आला आहात.
२५ जो तुमच्याशी बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करण्याची खबरदारी घ्या.* कारण, ज्याने पृथ्वीवर देवाचा इशारा दिला त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारे जर शिक्षेपासून वाचू शकले नाहीत, तर जो स्वर्गातून बोलतो त्याच्याकडे पाठ फिरवल्यास आपण शिक्षेपासून कसे वाचू?
२६ त्या वेळी, त्याच्या वाणीने पृथ्वी हादरली होती, पण आता त्याने असे वचन दिले आहे: “मी आणखी एकदा पृथ्वीलाच नाही, तर आकाशालाही हालवून टाकेन.”
२७ “आणखी एकदा” असे जे म्हटले आहे त्यावरून दिसून येते, की हालवता येणाऱ्या गोष्टी, अर्थात घडवण्यात आलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील, यासाठी की, ज्या हालवल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी टिकून राहाव्यात.
२८ आपल्याला एक असे राज्य मिळणार आहे जे कधीच हालवले जाऊ शकत नाही; म्हणूनच, आपण नेहमी देवाच्या अपार कृपेचा लाभ घेऊ या, ज्यामुळे आपल्याला देवाचे भय व आदर बाळगून स्वीकारयोग्य पद्धतीने त्याची पवित्र सेवा करता येईल.
२९ कारण, आपला देव भस्म करणारा अग्नी आहे.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “शिक्षा देतो.”
^ किंवा “वळण लावण्याचा.”
^ किंवा “विवाहबाह्य संबंधातून झालेली.”
^ किंवा “दुःखच होते.”
^ किंवा “शुद्धता.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ अर्थात, आपल्या वडिलांचे मन.
^ किंवा “त्याचं ऐकण्यास नकार देऊ नका; त्याला निमित्ते सांगू नका.”