इब्री लोकांना १३:१-२५
१३ बांधवांप्रमाणे एकमेकांवर प्रेम करत राहा.
२ पाहुणचार* करण्याचे विसरू नका, कारण त्याद्वारे काहींनी नकळत देवदूतांचे आदरातिथ्य केले.
३ तुरुंगात* असलेल्यांसोबत तुम्हीही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण ठेवा; तसेच, ज्यांचा छळ केला जात आहे, त्यांचीही आठवण ठेवा; कारण तुम्ही स्वतःसुद्धा शरीरात आहात.*
४ विवाहबंधनाचा सर्वांनी आदर करावा, आणि अंथरूण निर्दोष असावे, कारण अनैतिक लैंगिक कृत्ये* आणि व्यभिचार करणाऱ्यांचा देव न्याय करेल.
५ आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा. कारण त्याने म्हटले आहे: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.”
६ म्हणूनच, आपण धैर्याने असे म्हणू शकतो: “यहोवा* मला साहाय्य करतो; मी भिणार नाही. माणूस माझं काय करणार?”
७ जे तुमचे नेतृत्व करत आहेत व ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले आहे, त्यांची आठवण ठेवा आणि त्यांच्या वर्तनाचे चांगले परिणाम पाहून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
८ येशू ख्रिस्त जसा काल होता, तसाच आजही आहे आणि सदासर्वकाळ राहील.
९ वेगवेगळ्या आणि विचित्र शिकवणींच्या मागे लागून भरकटू नका. कारण, खाण्यापिण्यापेक्षा* देवाच्या अपार कृपेने आपले हृदय सुदृढ करणे जास्त चांगले; जे खाण्यापिण्याच्या मागे लागतात त्यांना त्यापासून फायदा होत नाही.
१० आपल्याजवळ अशी एक वेदी आहे जिच्यावरून खाण्याचा अधिकार मंडपात पवित्र सेवा करणाऱ्यांना नाही.
११ कारण, महायाजक पापार्पण म्हणून ज्या प्राण्यांचे रक्त परमपवित्र स्थानात घेऊन जातो, त्या प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर जाळून टाकली जातात.
१२ त्यामुळे लोकांना स्वतःच्या रक्ताद्वारे पवित्र करण्यासाठी येशूनेसुद्धा शहराच्या फाटकाबाहेर दुःख सोसले.
१३ तर मग, त्याने सहन केलेला अपमान आपणही सहन करून छावणीच्या बाहेर त्याच्याकडे जाऊ या.
१४ कारण, इथे आपल्यासाठी कायम टिकणारे शहर नाही, तर जे येणार आहे त्या शहराची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.
१५ तर मग, आपण येशूच्या द्वारे नेहमी देवाला स्तुतीचे बलिदान, म्हणजेच त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्या आपल्या ओठांचे फळ अर्पण करू या.
१६ शिवाय, चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका, कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.
१७ जे तुमचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन राहा, कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचे* रक्षण करत आहेत; यासाठी की त्यांनी हे काम आनंदाने करावे, दुःखाने* नाही; कारण तसे झाल्यास तुमचेच नुकसान होईल.
१८ आमच्यासाठी प्रार्थना करत राहा, कारण आमचा विवेक प्रामाणिक* आहे असा भरवसा आम्हाला आहे आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.
१९ पण, मी तुम्हाला विशेषतः अशी प्रार्थना करण्याची विनंती करतो, की मला आणखीन लवकर तुमच्याकडे येणे शक्य व्हावे.
२० आता आमची हीच प्रार्थना आहे, की ज्या शांतीच्या देवाने सर्वकाळाच्या कराराच्या रक्ताने मेढरांचा महान मेंढपाळ, अर्थात आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून उठवले,
२१ त्याने तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चांगली गोष्ट पुरवावी; आणि ज्यामुळे त्याचे मन आनंदित होईल, असे कार्य करण्यास येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्रवृत्त करावे. त्यालाच सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
२२ बांधवांनो, आता मी तुम्हाला विनंती करतो, की प्रोत्साहनाचे हे शब्द तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत, कारण मी हे पत्र थोडक्यात लिहिले आहे.
२३ मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपला भाऊ तीमथ्य याची सुटका करण्यात आली आहे. तो जर लवकर आला, तर त्याला घेऊन मी तुम्हाला भेटायला येईन.
२४ तुमचे नेतृत्व करत असलेल्या सर्वांना आणि सर्व पवित्र जनांना माझा नमस्कार सांगा. इटलीचे बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात.
२५ देवाची अपार कृपा तुम्हा सर्वांवर असो.
तळटीपा
^ किंवा “अनोळखी लोकांशी प्रेमळपणे वागण्यास.”
^ शब्दशः “बांधलेले; बंधनांत असलेले.”
^ किंवा कदाचित, “जणू तुम्ही त्यांच्यासोबत दुःख सोसत आहात.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ अर्थात, खाणेपिणे याविषयीच्या नियमांपेक्षा.
^ किंवा “तुमच्या जिवांचे.”
^ किंवा “कण्हत.”
^ किंवा “चांगला.”