इब्री लोकांना २:१-१८
२ म्हणूनच, ऐकलेल्या गोष्टींकडे आपण नेहमीपेक्षा जास्त लक्ष दिले पाहिजे, म्हणजे आपण कधीही वाहवत जाणार नाही.
२ कारण जर देवदूतांद्वारे बोललेले वचन खातरीलायक ठरले, आणि त्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक अपराधाची आणि उल्लंघनाची शिक्षा न्यायानुसार देण्यात आली,
३ तर मग, इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपण शिक्षा होण्यापासून कसे वाचू? कारण, या तारणाचा संदेश सांगण्याची सुरुवात आपल्या प्रभूने केली आणि ज्यांनी त्याचे ऐकले त्यांनी आपल्याला त्याची खातरी पटवून दिली;
४ शिवाय, देवसुद्धा चिन्हे, चमत्कार आणि वेगवेगळी अद्भुत कार्ये घडवून आणण्याद्वारे, तसेच, त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची* कृपादाने वाटून देण्याद्वारे साक्ष देण्यात सहभागी झाला.
५ कारण ज्या येणाऱ्या जगाबद्दल* आपण बोलत आहोत, ते त्याने देवदूतांच्या स्वाधीन केलेले नाही.
६ पण एका ठिकाणी कोणा एका साक्षीदाराने असे म्हटले आहे: “माणूस काय आहे की तू त्याची आठवण ठेवावी, आणि मनुष्याचा पुत्र कोण की तू त्याची काळजी घ्यावी?
७ तू त्याला देवदूतांपेक्षा काहीसे कमी केले; तू त्याला गौरवाचा व सन्मानाचा मुकुट घातला आणि तुझ्या हातांच्या सर्व कार्यांवर त्याला नेमले.
८ तू सर्व गोष्टी त्याच्या पायांखाली ठेवल्या.” सर्व गोष्टी त्याच्या स्वाधीन करण्याद्वारे, त्याच्या अधीन नाही अशी कोणतीही गोष्ट देवाने ठेवली नाही. अर्थात, सध्याच आपल्याला सर्व गोष्टी त्याच्या स्वाधीन असल्याचे दिसत नाही.
९ पण ज्याला देवदूतांपेक्षा काहीसे कमी करण्यात आले होते, त्या येशूला आता आपण गौरवाचा व सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो, कारण त्याने मरण सोसले आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मरणाचा अनुभव घेतला.
१० सर्व गोष्टी ज्याच्यासाठी आणि ज्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत, त्याने पुष्कळ पुत्रांचा गौरव होण्यासाठी त्यांच्या तारणाच्या मुख्य प्रतिनिधीला दुःख सोसू द्यावे, हे योग्य होते; यासाठी की त्याद्वारे तो परिपूर्ण ठरावा.
११ पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात आले तेदेखील एकाच पित्यापासून आहेत, आणि म्हणूनच त्यांना बांधव म्हणण्याची त्याला लाज वाटत नाही.
१२ उदाहरणार्थ, तो म्हणतो: “मी तुझे नाव माझ्या बांधवांना घोषित करीन; मंडळीत गीत गाऊन मी तुझी स्तुती करीन.”
१३ पुन्हा तो म्हणतो: “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच: “पाहा! मी व यहोवाने* मला दिलेली लहान मुले.”
१४ त्यामुळे ही “लहान मुले” जशी हाडामांसाची आहेत तसाच तोदेखील हाडामांसाचा झाला; यासाठी की, ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे त्याला, म्हणजेच सैतानाला* त्याने आपल्या मरणाद्वारे नाहीसे करावे,
१५ आणि मरणाच्या भीतीने ज्यांना आयुष्यभर दास करून ठेवले होते, त्या सर्वांना त्याने स्वतंत्र करावे.*
१६ कारण खरे पाहता तो देवदूतांचे साहाय्य करत नाही, तर अब्राहामच्या संततीचे* साहाय्य करत आहे.
१७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “बांधवांप्रमाणे” बनावे लागले, यासाठी की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू व विश्वासू महायाजक बनावे आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित्ताचे बलिदान अर्पण करावे.
१८ त्याची परीक्षा होत असताना त्याने स्वतः दुःख सोसले, त्यामुळे ज्यांची परीक्षा होत आहे त्यांचे साहाय्य करायला तो समर्थ आहे.
तळटीपा
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीची.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “मानववस्ती असलेल्या पृथ्वीबद्दल.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.
^ किंवा “सुटका करावी.”
^ शब्दशः “बीजाचे.”