इब्री लोकांना ३:१-१९

  • येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ (१-६)

    • सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या ()

  • विश्‍वास नसण्याविषयी इशारा (७-१९)

    • “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकली” (१५)

 म्हणून, स्वर्गीय निमंत्रणात* वाटेकरी असलेल्या पवित्र बांधवांनो, ज्या प्रेषिताला व महायाजकाला आपण जाहीर रीत्या कबूल करतो, त्या येशूबद्दल विचार करा. २  ज्याने त्याला नेमले त्याला, अर्थात देवाला तो विश्‍वासू होता; अगदी त्याच प्रकारे, जसा मोशेसुद्धा देवाच्या सबंध घरात विश्‍वासू होता. ३  त्याला* मोशेपेक्षा जास्त गौरवास पात्र समजले जाते, कारण जो घर बांधतो त्याचा घरापेक्षा जास्त सन्मान केला जातो. ४  अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेले असते, पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे. ५  मोशे देवाच्या सबंध घरात सेवक या नात्याने विश्‍वासू राहिला आणि याद्वारे ज्या गोष्टी नंतर सांगितल्या जाणार होत्या त्यांची साक्ष देण्यात आली. ६  पण ख्रिस्त तर देवाच्या घरावर पुत्र या नात्याने विश्‍वासू होता. आणि जर आपण मोकळेपणाने बोलण्याचे धैर्य आणि जिच्याविषयी आपण अभिमान बाळगतो ती आशा शेवटपर्यंत दृढपणे टिकवून ठेवली, तर आपण त्याचे घर आहोत. ७  म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकली, ८  तर ओसाड प्रदेशात तुमच्या पूर्वजांनी संताप आणण्याच्या प्रसंगी, परीक्षेच्या दिवशी केले, तसे आपले हृदय कठोर करू नका. ९  त्यांनी चाळीस वर्षांपर्यंत माझी कार्ये पाहिली होती, तरीसुद्धा त्यांनी तिथे माझी परीक्षा पाहिली. १०  म्हणून मला या पिढीचा तिटकारा आला आणि मी म्हणालो: ‘त्यांचे हृदय नेहमीच भरकटते आणि त्यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाहीत.’ ११  त्यामुळे मी माझ्या रागात अशी शपथ घेतली: ‘ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत.’” १२  बांधवांनो, जिवंत देवापासून स्वतःला दूर केल्यामुळे तुमच्यापैकी कोणामध्येही विश्‍वास नसलेले दुष्ट हृदय उत्पन्‍न होऊ नये म्हणून सांभाळा. १३  पण “आज” म्हटलेला काळ जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत एकमेकांना प्रोत्साहन देत राहा, यासाठी की तुमच्यापैकी कोणीही पापाच्या फसव्या शक्‍तीमुळे कठोर बनू नये. १४  कारण जो विश्‍वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो जर आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला, तरच आपण खऱ्‍या अर्थाने ख्रिस्ताचे वाटेकरी बनू. १५  ज्याप्रमाणे म्हणण्यात आले आहे: “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकली, तर तुमच्या पूर्वजांनी संताप आणण्याच्या प्रसंगी केले, तसे आपले हृदय कठोर करू नका.” १६  कारण ज्यांनी ऐकूनही त्याला संताप आणला, ते कोण होते? मोशेच्या नेतृत्वाखाली मिसरमधून* बाहेर पडलेले सर्वच नव्हते का? १७  आणि चाळीस वर्षांपर्यंत देवाला ज्यांचा तिटकारा आला, ते कोण होते? ज्यांनी पाप केले आणि ज्यांचे मृतदेह ओसाड प्रदेशात पडले, तेच नव्हते का? १८  आणि तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, असे त्याने शपथ घेऊन कोणाला सांगितले? ज्यांनी आज्ञा मोडल्या होत्या, त्यांनाच नाही का? १९  तर आपण पाहू शकतो, की विश्‍वास नसल्यामुळेच त्यांना देवाच्या विसाव्यात येता आले नाही.

तळटीपा

किंवा “बोलावण्यात.”
अर्थात, येशूला
अर्थात, इजिप्त.