इब्री लोकांना ५:१-१४

  • येशू मानवी महायाजकांपेक्षा श्रेष्ठ (१-१०)

    • मलकीसदेकसारखा (१०)

    • सोसलेल्या गोष्टींमधून आज्ञाधारकपणा शिकला ()

    • सर्वकाळाच्या तारणासाठी जबाबदार ()

  • आध्यात्मिक रीतीने लहान मुलांसारखे असण्याविषयी इशारा (११-१४)

 कारण लोकांमधून घेतलेल्या प्रत्येक महायाजकाला त्यांच्या वतीने देवाच्या सेवेसाठी नियुक्‍त केले जाते, यासाठी की त्याने पापांसाठी अर्पणे व बलिदाने द्यावीत. २  अज्ञानामुळे चुका करणाऱ्‍यांशी* तो सहानुभूतीने* व्यवहार करू शकतो, कारण त्याला स्वतःलाही आपल्या दुर्बलतेला तोंड द्यावे लागते.* ३  आणि त्यामुळे लोकांच्या पापांसाठी जशी तो अर्पणे देतो, तशीच स्वतःच्या पापांसाठीही त्याला द्यावी लागतात. ४  कोणताही मनुष्य स्वतःहून हा सन्मान घेत नाही, तर अहरोनप्रमाणे देवाने बोलावल्यावरच त्याला तो मिळतो. ५  त्याच प्रकारे, ख्रिस्तानेही महायाजक बनून स्वतःचा गौरव केला नाही, तर, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे,” असे ज्याने त्याला म्हटले त्याने त्याला गौरवले. ६  जसे की, आणखी एका ठिकाणी तो असेही म्हणतो, “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.” ७  पृथ्वीवर असताना* ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून व अश्रू गाळून याचना व विनंत्या केल्या; आणि त्याने देवाचे भय मानल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. ८  देवाचा पुत्र असूनही, त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला. ९  आणि त्याला परिपूर्ण करण्यात आल्यावर, त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍या सर्वांचे सर्वकाळासाठी तारण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली, १०  कारण देवाने त्याला मलकीसदेकसारखा याजक होण्यासाठी नेमले आहे. ११  त्याच्याविषयी आमच्याजवळ सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण तुम्हाला ते समजावून सांगणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. १२  खरेतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते; पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्‍नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात. १३  जो दूधच पीत राहतो त्याला देवाच्या नीतिमान वचनाचे ज्ञान मिळत नाही, कारण तो लहान मूल आहे. १४  पण जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे, ज्यांनी आपल्या समजशक्‍तीचा उपयोग करण्याद्वारे तिला चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.

तळटीपा

किंवा “बहकलेल्यांशी.”
किंवा “कोमलतेने; सौम्यपणे.”
किंवा “अधीन असतो.”
शब्दशः “देहाच्या दिवसांत.”
शब्दशः “काळाचा विचार करता.”