इब्री लोकांना ६:१-२०

  • प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट (१-३)

  • जे पडले ते पुत्राला पुन्हा वधस्तंभाला खिळतात (४-८)

  • आपली आशा दृढ करा (९-१२)

  • देवाच्या अभिवचनाची पूर्णता निश्‍चित (१३-२०)

    • देवाचे अभिवचन आणि शपथ अटळ आहे (१७, १८)

 आता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे आपण प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट करू या. आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो, जसे की निरर्थक* कामांबद्दल पश्‍चात्ताप, देवावर विश्‍वास, २  बाप्तिस्मा,* हात ठेवणे, मेलेल्यांचे पुनरुत्थान* आणि सर्वकाळाचा न्याय यांविषयीची शिकवण. ३  आणि देवाने घडू दिल्यास आपण नक्कीच प्रौढतेपर्यंत पोचू. ४  कारण ज्यांना एकदा ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय कृपादान चाखले, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, ५  आणि ज्यांनी देवाचे उत्तम वचन आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेच्या* सामर्थ्यशाली गोष्टी चाखल्या, ६  पण तरीसुद्धा जे पडले, त्यांना परत आणून पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करणे अशक्य आहे. कारण, ते स्वतःच देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभाला* खिळतात आणि सर्वांसमोर त्याला लज्जित करतात. ७  देवाच्या आशीर्वादाने वारंवार पाऊस पडतो, तेव्हा जमीन पावसाचे पाणी पिऊन, तिची मशागत करणाऱ्‍यांसाठी पीक उत्पन्‍न करते. ८  पण, तिने काटेकुसळे उत्पन्‍न केल्यास, ती निरुपयोगी ठरते. तिला लवकरच शाप देऊन, शेवटी जाळून टाकले जाईल. ९  प्रिय बांधवांनो, आम्ही अशा प्रकारे बोलत असलो, तरी आम्हाला खातरी आहे, की तुम्ही यापेक्षा चांगल्या स्थितीत आहात, अर्थात तुम्ही तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालत आहात. १०  तुम्ही पवित्र जनांची सेवा केली, आणि अजूनही करत आहात. आणि तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी* नाही. ११  पण, शेवटपर्यंत तुमची आशा दृढपणे टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाने अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवावी, अशी आमची इच्छा आहे. १२  म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही, तर विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारसदार होतात, त्यांचे अनुकरण करणारे व्हाल. १३  देवाने अब्राहामला अभिवचन दिले, तेव्हा शपथ घेण्यासाठी आपल्यापेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे देवाने स्वतःचीच शपथ घेऊन म्हटले: १४  “मी तुला निश्‍चितच आशीर्वाद देईन आणि तुझा वंश निश्‍चितच वाढवीन.” १५  अब्राहामने धीर धरल्यानंतर त्याला हे अभिवचन मिळाले. १६  कारण लोक सहसा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीची शपथ घेतात; आणि त्यांच्या शपथेने प्रत्येक वाद मिटतो, कारण ती एक कायदेशीर हमी असते. १७  त्याच प्रकारे, आपला संकल्प* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवण्याचे ठरवले, तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.* १८  यासाठी की, आपण जे धावून देवाच्या आश्रयाला आलो आहोत त्या आपल्याला अशा दोन अटळ गोष्टींद्वारे, ज्यांविषयी देव कधीही खोटे बोलू शकत नाही, आपल्यासमोर ठेवलेली आशा पक्की धरून ठेवण्याचे जोरदार प्रोत्साहन मिळावे. १९  ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्या जीवासाठी* एखाद्या नांगरासारखी आहे आणि ती पडद्याच्या पलीकडे आत जाते, २०  तिथे, मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी महायाजक बनलेला येशू, आपल्याकरता मार्ग तयार करण्यासाठी आपल्या पुढे गेला आहे.

तळटीपा

शब्दशः “निर्जीव.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “येणाऱ्‍या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अनीतिमान.”
किंवा “इच्छा.”
किंवा “साहाय्याला आला.” शब्दशः “मध्यस्थी केली.”
किंवा “जीवनासाठी.”