इब्री लोकांना ८:१-१३
८ तर मग, आम्ही जे काही सांगत आहोत त्याचा मुख्य मुद्दा हा: आपल्याला लाभलेला महायाजक असा आहे आणि तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसला आहे.
२ तो माणसाने नाही, तर यहोवाने* उभारलेल्या खऱ्या मंडपातील परमपवित्र स्थानाचा सेवक* आहे.
३ प्रत्येक महायाजकाला अर्पणे व बलिदाने वाहण्यासाठी नियुक्त केले जाते; त्यामुळे यानेसुद्धा काहीतरी अर्पण करावे हे आवश्यक होते.
४ तो पृथ्वीवर असता तर याजक नसता, कारण नियमशास्त्रानुसार अर्पणे वाहणारी माणसे अगोदरच इथे आहेत.
५ ते करत असलेली पवित्र सेवा ही स्वर्गीय गोष्टींचे प्रतीक व छाया आहे; ज्याप्रमाणे मोशे मंडप उभारणार होता तेव्हा देवाने त्याला अशी आज्ञा दिली: देवाने त्याला म्हटले: “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी बनवण्याची काळजी घे.”
६ पण, आता येशूला याहून श्रेष्ठ अशी सेवा* मिळाली आहे, कारण तो अधिक चांगल्या अभिवचनांवर कायदेशीर रीत्या स्थापित करण्यात आलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थसुद्धा आहे.
७ त्या पहिल्या करारामध्ये काही दोष नसता, तर दुसऱ्या कराराची गरजच पडली नसती.
८ पण, लोकांमध्ये दोष आढळल्यामुळेच त्याने म्हटले: “यहोवा* म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्यासोबत आणि यहूदाच्या घराण्यासोबत एक नवा करार करेन.
९ त्यांच्या वाडवडिलांचा हात धरून मी त्यांना मिसर* देशातून बाहेर आणले त्या दिवशी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसेल; ते माझ्या कराराला विश्वासू राहिले नाहीत, त्यामुळे मी त्यांची काळजी घेण्याचे सोडून दिले,’ असे यहोवा* म्हणतो.
१० “यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करेन. मी माझे नियम त्यांच्या मनात घालेन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.
११ “‘त्यापुढे कोणीही आपल्या सहनागरिकाला किंवा आपल्या बांधवाला, “यहोवाची* ओळख करून घे!” असे म्हणणार नाही; कारण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण मला ओळखतील.
१२ मी दयाळूपणे त्यांच्या अनीतिमान कार्यांची क्षमा करेन आणि त्यांची पापे पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.’”
१३ “नवा करार,” असे म्हणण्याद्वारे त्याने आधीचा करार रद्द केला आहे. आता जो रद्द करण्यात आला आहे आणि जुना होत चालला आहे तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “जनसेवक.”
^ किंवा “जनसेवा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, “इजिप्त.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.