इब्री लोकांना ९:१-२८
९ पहिल्या करारात पवित्र सेवेसंबंधी नियम आणि पृथ्वीवर उपासनेचा एक मंडपही होता.
२ या मंडपाचा जो पहिला भाग तयार करण्यात आला होता, त्यात एक दीपस्तंभ, मेज आणि समर्पित भाकरी* ठेवलेल्या होत्या; या भागाला पवित्र स्थान म्हटले आहे.
३ पण, दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला भाग होता.
४ इथे धूप जाळण्याचे सोन्याचे पात्र आणि पूर्णपणे सोन्याने मढवलेला कराराचा कोश होता; आणि त्यात मान्ना ठेवलेले एक सोन्याचे पात्र, कळ्या आलेली अहरोनची काठी आणि कराराच्या पाट्या होत्या.
५ तसेच, कोशाच्या प्रायश्चित्ताच्या झाकणावर* पाखर घालणारे वैभवशाली करूब होते. अर्थात, या गोष्टींविषयी सविस्तर सांगण्याची ही वेळ नाही.
६ अशा रीतीने या सर्व गोष्टी तयार झाल्यावर, याजक नियमितपणे मंडपाच्या पहिल्या भागात पवित्र सेवा करण्यासाठी जाऊ लागले;
७ पण, दुसऱ्या भागात मात्र महायाजक एकटाच वर्षातून एकदा जायचा; पण, रक्ताशिवाय तो आत जात नव्हता; हे रक्त तो स्वतःसाठी आणि लोकांनी नकळत केलेल्या पापांसाठी अर्पण करण्याकरता जायचा.
८ अशा रीतीने, पवित्र आत्मा अगदी स्पष्टपणे दाखवून देतो, की पहिला मंडप* उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात* जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.
९ हा मंडप सध्याच्या काळासाठी एक उदाहरण* आहे आणि या व्यवस्थेनुसार अर्पणे व बलिदाने वाहिली जातात. पण, ही अर्पणे व बलिदाने पवित्र सेवा करणाऱ्या मनुष्याचा विवेक पूर्णपणे शुद्ध करू शकत नाहीत.
१० ती केवळ खाण्यापिण्यासंबंधी व शुद्धीकरणाच्या विधींसंबंधी* आहेत. शारीरिक गोष्टींसंबंधी असलेले हे नियम, सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याच्या नियुक्त काळापर्यंत लावून देण्यात आले होते.
११ पण, ख्रिस्त हा आधीच घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक या नात्याने आला, तेव्हा तो अधिक श्रेष्ठ व अधिक परिपूर्ण अशा मंडपात गेला; हा मंडप हातांनी बांधलेला नाही, म्हणजे निर्माण केलेल्या गोष्टींपैकी नाही.
१२ तो बकऱ्यांचे किंवा वासरांचे* रक्त नाही, तर स्वतःचे रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्या सर्वांसाठी सर्वकाळाची सुटका मिळवली.*
१३ कारण, बकऱ्यांचे व वासरांचे रक्त आणि अशुद्ध झालेल्यांवर कालवडीची* राख शिंपडल्यामुळे त्यांचे शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होते;
१४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या आत्म्याद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून किती जास्त शुद्ध करू शकते; यासाठी की, आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी?
१५ म्हणूनच, तो एका नव्या कराराचा मध्यस्थ आहे, यासाठी की ज्यांना बोलावण्यात आले आहे त्यांना सर्वकाळाच्या वारशाचे अभिवचन मिळावे; पहिल्या कराराच्या अधीन असताना केलेल्या पापांपासून ज्याने त्यांची खंडणी देऊन सुटका केली, त्याच्या मृत्यूमुळे हे सर्व शक्य झाले.
१६ कारण, जिथे करार आहे, तिथे करार करणाऱ्या मनुष्याचा मृत्यू होणे आवश्यक आहे;
१७ कारण, मृत्यू झाल्यावरच करार अंमलात येतो; करार करणारा मनुष्य जिवंत असेपर्यंत तो अंमलात येत नाही.
१८ त्याचप्रमाणे, पहिला करारसुद्धा रक्ताशिवाय अंमलात आला नाही.*
१९ कारण नियमशास्त्रातली प्रत्येक आज्ञा सांगितल्यावर मोशेने पाणी, लाल लोकर आणि एजोब* झुडूप यांसोबत वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन ते ग्रंथावर* व सर्व लोकांवर शिंपडले,
२० आणि म्हटले: “देवाने तुम्हाला जो करार पाळायला सांगितला त्या कराराचे हे रक्त आहे.”
२१ तसेच, मंडपावर आणि पवित्र सेवेच्या* सर्व भांड्यांवरही त्याने ते रक्त शिंपडले.
२२ हो, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात; आणि रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा मिळणे शक्य नाही.
२३ त्यामुळे, स्वर्गातील गोष्टींच्या प्रतिकांचे अशा प्रकारे शुद्धीकरण होणे आवश्यक होते; पण, स्वर्गातील गोष्टींसाठी याहून श्रेष्ठ बलिदानांची गरज आहे.
२४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचे केवळ प्रतिरूप असलेल्या ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही, तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.
२५ आणि महायाजक जसा दर वर्षी, स्वतःचे नाही, तर प्राण्यांचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो वारंवार स्वतःला अर्पण करण्यासाठी गेला नाही.
२६ कारण तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता, स्वतःचे बलिदान देऊन पाप नाहीसे करण्यासाठी त्याने जगाच्या व्यवस्थांच्या* शेवटी एकदाच सर्वकाळासाठी स्वतःला प्रकट केले आहे.
२७ आणि ज्याप्रमाणे, माणसांचे एकदाच मरणे आणि त्यानंतर न्याय होणे ठरलेले असते,
२८ त्याचप्रमाणे अनेकांच्या पापांचा भार वाहून नेण्यासाठी ख्रिस्ताला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण करण्यात आले; आणि तो दुसऱ्यांदा, पाप नाहीसे करण्यासाठी येणार नाही,* तर तारणासाठी आतुरतेने त्याची वाट पाहणाऱ्यांना तो दिसेल.
तळटीपा
^ किंवा “समक्षतेच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “प्रायश्चित्ताच्या स्थानावर.”
^ पृथ्वीवरील मंडप.
^ हे स्वर्गाला सूचित करते.
^ किंवा “दृष्टान्त.”
^ शब्दशः “वेगवेगळ्या बाप्तिस्म्यांसंबंधी.”
^ शब्दशः “खंडणी दिली; मुक्तता मिळवली.”
^ किंवा “गोऱ्ह्यांचे.”
^ किंवा “गाईची.”
^ शब्दशः “स्थापित झाला नाही.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “गुंडाळीवर.”
^ किंवा “जनसेवेच्या.”
^ शब्दशः “देवाच्या मुखासमोर.”
^ किंवा “काळांच्या.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “पापांसाठी नाही.”