कलस्सैकर १:१-२९
१ देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल, व आपला भाऊ तीमथ्य यांच्याकडून,
२ कलस्सै इथे ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांना व विश्वासू बांधवांना:
देव जो आपला पिता याच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा व शांती लाभो.
३ आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा देवाचे, अर्थात आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे आभार मानतो,
४ कारण आम्ही ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्वासाबद्दल आणि सर्व पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकले आहे.
५ ही मनोवृत्ती, स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे तुम्ही दाखवता. या आशेबद्दल तुम्ही पूर्वी त्या वेळी ऐकले, जेव्हा आनंदाच्या संदेशाविषयीचे सत्यवचन
६ तुमच्यापर्यंत पोचवण्यात आले. ज्याप्रमाणे हा आनंदाचा संदेश सबंध जगात फलदायी होत आहे व वाढत आहे, त्याचप्रमाणे ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या अपार कृपेबद्दल खऱ्या अर्थाने ऐकले व अचूकपणे जाणून घेतले, त्या दिवसापासून हा संदेश तुमच्यामध्येही फलदायी होऊन वाढत चालला आहे.
७ आमचा प्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही हेच शिकून घेतले आहे. तो आमच्या वतीने कार्य करणारा ख्रिस्ताचा एक विश्वासू सेवक आहे.
८ तुम्ही देवाच्या आत्म्याच्या* साहाय्याने* उत्पन्न केलेल्या प्रेमाबद्दल त्यानेच आम्हाला सांगितले.
९ याच कारणामुळे, ज्या दिवसापासून आम्ही हे ऐकले त्या दिवसापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे सोडले नाही. आम्ही देवाला हीच विनंती करत आहोत, की तुम्हाला त्याच्या इच्छेविषयीचे अचूक ज्ञान आणि सर्व बुद्धी व आध्यात्मिक समज भरपूर प्रमाणात मिळावी.
१० यासाठी की, तुम्ही यहोवाच्या* सेवकांना शोभेल असे वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट करावे आणि प्रत्येक चांगल्या कार्याचे फळ उत्पन्न करत राहावे व देवाच्या अचूक ज्ञानात वाढत जावे;
११ त्याच प्रकारे, त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्तीने तुम्हाला ताकद मिळावी, जेणेकरून तुम्ही सहनशक्ती दाखवून आनंदाने धीर धरावा;
१२ तसेच, ज्याने तुम्हाला प्रकाशात पवित्र जनांच्या वारशाचे भागीदार होण्यास योग्य केले, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.
१३ त्याने अंधाराच्या अधिकारातून आपली सुटका करून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आपल्याला आणले,
१४ ज्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे, म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली आहे.
१५ तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आणि निर्माण केलेल्या सर्व गोष्टींत प्रथम जन्मलेला आहे;
१६ कारण त्याच्याचद्वारे स्वर्गात व पृथ्वीवर, इतर सर्व दृश्य व अदृश्य गोष्टी निर्माण करण्यात आल्या; मग ती सिंहासने, अधिपती, सरकारे किंवा अधिकार असोत, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आल्या.
१७ तसेच, तो इतर सर्व गोष्टींच्या आधीचा आहे, आणि त्याच्याचद्वारे इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या;
१८ तो शरीराचे, अर्थात मंडळीचे मस्तक आहे. तो सुरुवात आहे, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आहे, यासाठी की त्याने सर्व गोष्टींत प्रथम ठरावे;
१९ कारण देवाला हे योग्य वाटले की ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता असावी,
२० आणि त्याने वधस्तंभावर* वाहिलेल्या रक्ताद्वारे शांती स्थापित करून इतर सर्व गोष्टींचा, मग त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत किंवा स्वर्गातील, त्यांचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करावा.
२१ खरे पाहता, एकेकाळी तुम्ही देवापासून दुरावलेले आणि त्याचे शत्रू होता, कारण तुमची मने दुष्ट कामांकडे लागलेली होती,
२२ पण, ख्रिस्ताने आपले मानवी शरीर अर्पण केल्यामुळे, त्याच्या मरणाद्वारे देवाने तुमच्यासोबत समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे स्वतःपुढे सादर करावे.
२३ पण यासाठी हे आवश्यक आहे, की तुम्ही विश्वासात टिकून राहावे व इमारतीच्या पायावर स्थापित केलेले व स्थिर असे राहावे; आणि जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला व ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली, त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. याच आनंदाच्या संदेशाचा मी पौल, सेवक झालो आहे.
२४ आता, तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे. ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहण्यास मी तयार आहे. कारण माझे हे दुःख सहन करणे ख्रिस्ताच्या शरीरासाठी, अर्थात मंडळीसाठी हिताचे ठरेल.
२५ देवाने माझ्यावर जो कारभार सोपवला आहे, त्यानुसार मी तुमच्यासाठी या मंडळीचा सेवक बनलो, यासाठी की मी देवाच्या वचनाची पूर्णपणे घोषणा करावी.
२६ हे पवित्र रहस्य पूर्वीच्या जगाच्या व्यवस्थांपासून* व पूर्वीच्या पिढ्यांपासून गुप्त ठेवण्यात आले होते. पण आता ते देवाच्या पवित्र जनांना प्रकट करण्यात आले आहे.
२७ हे गौरवी व मौल्यवान पवित्र रहस्य विदेश्यांमध्ये घोषित करणे देवाला योग्य वाटले. ते रहस्य म्हणजे, तुमच्यासोबत ऐक्यात असलेला ख्रिस्त, ज्याच्या गौरवात सहभागी होण्याची तुम्हाला आशा आहे.
२८ त्याच्याचविषयी आम्ही घोषणा करत आहोत आणि सर्वांना समजावून सांगत आहोत व सर्व सुबुद्धीचे शिक्षण देत आहोत, यासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला व प्रौढ,* असे देवापुढे सादर करावे.
२९ यासाठीच मी कठोर परिश्रम करत आहे आणि माझ्यामध्ये शक्तिशाली रीतीने कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याने झटत आहे.
तळटीपा
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीच्या.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “आत्म्यात.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “पूर्वीच्या काळांत.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “पूर्ण.”