कलस्सैकर २:१-२३

  • ख्रिस्त, देवाचे पवित्र रहस्य (१-५)

  • फसवणूक करणाऱ्‍यांपासून सांभाळा (६-१५)

  • वास्तविकता ख्रिस्तामध्ये आहे (१६-२३)

 कारण तुमच्यासाठी, लावदिकीयात असलेल्यांसाठी आणि ज्यांनी मला प्रत्यक्ष पाहिलेले नाही अशा सर्वांसाठीही मला किती संघर्ष करावा लागत आहे, याची तुम्हाला जाणीव व्हावी असे मला वाटते. २  हा संघर्ष मी यासाठी करत आहे, की त्यांच्या मनाला दिलासा मिळावा आणि ते प्रेमाने एकमेकांशी ऐक्यात जोडले जावेत; तसेच, सत्याबद्दलची आपली समज खरी असल्याची पूर्ण खातरी झाल्यामुळे त्यांना विपुल आशीर्वाद* प्राप्त व्हावेत, म्हणजे देवाचे पवित्र रहस्य, अर्थात ख्रिस्त याच्याविषयी त्यांना अचूक ज्ञान मिळावे. ३  त्याच्यामध्येच सर्व बुद्धीचा व ज्ञानाचा खजिना गुप्त ठेवण्यात आला आहे. ४  कोणीही तुम्हाला मन वळवणारे तर्क करून बहकवू नये, म्हणून मी हे सांगत आहे. ५  शरीराने जरी मी तुमच्यापासून दूर असलो, तरी मनाने तुमच्यासोबतच आहे. तसेच, तुमचा सुव्यवस्थितपणा आणि ख्रिस्तावर असलेला तुमचा दृढ विश्‍वास पाहून मला आनंद होतो. ६  म्हणूनच, जसे तुम्ही प्रभू, ख्रिस्त येशू याला स्वीकारले, तसेच त्याच्यासोबत ऐक्यात राहून पुढेही चालत राहा, ७  ज्याप्रमाणे तुम्हाला शिकवण्यात आले, त्याप्रमाणे त्याच्यात मुळावलेले असे व्हा आणि वाढत जा, तसेच विश्‍वासात स्थिर व्हा आणि नेहमी देवाची उपकारस्तुती करत जा. ८  ख्रिस्तानुसार नसलेले, तर मानवी परंपरांनुसार व जगाच्या प्राथमिक गोष्टींनुसार असलेले तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये,* म्हणून सांभाळा. ९  कारण देवपणाची सर्व पूर्णता ख्रिस्तामध्येच आकार घेते. १०  त्यामुळे, जो सर्व शासनाचा व अधिकाराचा मुख्य आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला पूर्णता लाभली आहे. ११  त्याच्यासोबत तुमचे नाते असल्यामुळे, ख्रिस्ताच्या सेवकांची जशी सुंता* झाली पाहिजे तशी तुमची झाली आहे. ती हातांनी केलेली नसून, पापी शरीर काढून टाकण्याद्वारे केलेली सुंता आहे. १२  तुम्हाला त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये त्याच्यासोबत पुरण्यात आले आणि त्याच्याशी तुमचे नाते असल्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत उठवण्यातही आले; कारण ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून जिवंत केले त्याच्या या सामर्थ्यशाली कृत्यावर तुम्ही विश्‍वास ठेवला. १३  शिवाय, तुम्ही तुमच्या अपराधांमुळे आणि तुमच्या शरीराच्या सुंता न झालेल्या स्थितीमुळे मेलेले असे होता. पण, देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जिवंत केले. त्याने दयाळूपणे आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. १४  ज्यात अनेक नियम होते व जे आपल्याविरुद्ध लिहिण्यात आले होते, त्या हातांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर त्याने खोडून टाकला.* त्याने ते पत्र वधस्तंभाला* खिळून रद्द केले आहे. १५  त्याच्याद्वारे त्याने शासनांना व अधिकारांना विवस्त्र* केले आहे व पराजित कैद्यांप्रमाणे त्यांचे उघड प्रदर्शन करून, विजयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना आपल्यामागे चालायला लावले आहे. १६  म्हणून, खाणे-पिणे किंवा एखादा सण पाळणे, अमावस्या किंवा शब्बाथ पाळणे या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. १७  या सर्व येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत, पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे. १८  नम्रतेचे ढोंग आणि देवदूतांची उपासना ज्याला आवडते, आणि जो स्वतः पाहिलेल्या गोष्टींबाबत “ठामपणे उभा राहतो,”* अशा कोणत्याही मनुष्यामुळे आपले बक्षीस गमावू नका. असा मनुष्य खरेतर कोणतेही कारण नसताना आपल्या शारीरिक विचारसरणीमुळे फुगलेला आहे, १९  आणि शरीराचे मस्तक, ज्याच्याद्वारे संपूर्ण शरीराला पुरवठा होतो आणि त्याचे सांधे व अस्थिबंधने एकमेकांशी जोडली जाऊन ते देवाकडून होणाऱ्‍या वाढीमुळे वाढत जाते, त्या मस्तकाला तो जडून राहत नाही. २०  जगाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी जर तुम्ही ख्रिस्तासोबत मेला आहात, तर मग अजूनही जगाचा भाग असल्याप्रमाणे तुम्ही अशा आज्ञांचे पालन का करता, जसे की, २१  “हातात घेऊ नका, चाखू नका, स्पर्श करू नका?” २२  या आज्ञा अशा गोष्टींशी संबंधित आहेत, ज्या वापरून नष्ट होतात आणि त्या मानवांच्या आदेशांवर व शिकवणींवर आधारित आहेत. २३  या आज्ञांनुसार मनाप्रमाणे उपासना करणे, नम्रतेचे ढोंग करणे आणि शरीराला यातना देणे या गोष्टी जरी वरवर बुद्धीच्या गोष्टी वाटत असल्या, तरी शरीराच्या वासनांचा प्रतिकार करण्यात त्यांचा काहीही उपयोग होत नाही.

तळटीपा

किंवा “संपत्ती.”
किंवा “शिकार बनवू नये.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पुसून टाकला.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “नग्न.”
हे शब्द खोट्या धर्मांशी संबंधित गूढ (दीक्षेच्या) प्रथांवरून आले आहेत.