कलस्सैकर ४:१-१८
४ मालकांनो, स्वर्गात तुमचाही एक मालक आहे हे लक्षात ठेवून आपल्या दासांशी नीतीने आणि न्यायाने वागा.
२ नेहमी प्रार्थना करत राहा; या बाबतीत जागृत राहा आणि उपकारस्तुती करा.
३ त्याच वेळी, आमच्यासाठीही प्रार्थना करा, यासाठी की वचनाचा प्रचार करण्याकरता, अर्थात ख्रिस्ताविषयीचे पवित्र रहस्य घोषित करण्याकरता देवाने आमच्यासाठी संधीचे दार उघडावे; याच पवित्र रहस्यासाठी मी कैदेत आहे.
४ तसेच अशीही प्रार्थना करा, की मी ते जितक्या स्पष्टपणे घोषित केले पाहिजे, तितक्या स्पष्टपणे मला ते करता यावे.
५ वेळेचा सर्वात चांगला उपयोग करून* बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागा.
६ तुमचे बोलणे नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्याप्रमाणे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल.
७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्वासू सेवक व माझा सोबतीचा दास, तुखिक तुम्हाला माझ्याविषयी सगळी माहिती देईल.
८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे.
९ तुमच्यातलाच एक असलेला माझा विश्वासू व प्रिय भाऊ अनेसिम याच्यासोबत तो येत आहे; इथे घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी ते तुम्हाला कळवतील.
१० माझ्यासोबत कैदेत असलेला अरिस्तार्ख तुम्हाला नमस्कार सांगतो; तसेच, बर्णबाचा नातेवाईक मार्क (ज्याच्याबद्दल तुम्हाला सूचना मिळाल्या होत्या, की तो आल्यास तुम्ही त्याचे स्वागत करावे),
११ आणि युस्त म्हटलेला येशू हेदेखील तुम्हाला नमस्कार सांगतात. हे सुंता झालेल्यांपैकी असून देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन दिले आहे.*
१२ तुमच्यापैकीच असलेला ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास तुम्हाला नमस्कार सांगतो. तो नेहमी तुमच्यासाठी जीव तोडून प्रार्थना करत असतो, यासाठी की तुम्ही शेवटपर्यंत प्रौढांप्रमाणे आणि देवाच्या इच्छेविषयी पक्की खातरी असलेल्यांप्रमाणे स्थिर उभे राहावे.
१३ तुमच्यासाठी तसेच लावदिकीया व हेरापली इथल्या सर्वांसाठी तो किती मेहनत घेतो, याची मी स्वतः साक्ष देतो.
१४ आपल्या सर्वांचा लाडका वैद्य लूक, आणि देमास हेही तुम्हाला नमस्कार सांगतात.
१५ लावदिकीयातील बांधवांना, तसेच नुंफा व तिच्या घरी जमणाऱ्या मंडळीला माझा नमस्कार सांगा.
१६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यानंतर ते लावदिकीयातील मंडळीतही वाचण्याची आणि त्यांना पाठवलेले पत्र तुमच्या इथे वाचण्याची व्यवस्था करावी.
१७ तसेच, अर्खिप्प याला सांगा: “प्रभूमध्ये तू स्वीकारलेली सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”
१८ आणि आता मी पौल, स्वतःच्या अक्षरांत लिहून तुम्हाला माझा नमस्कार सांगतो. माझी तुरुंगवासातील बंधने आठवणीत असू द्या. देवाची अपार कृपा तुमच्यावर असो.
तळटीपा
^ शब्दशः “नियुक्त वेळ विकत घेऊन.”
^ किंवा “कृपायुक्त.”
^ किंवा “ते मला धीर देणारे साहाय्यक आहेत.”