तीत १:१-१६
१ मी पौल, देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासानुसार व सत्याच्या अचूक ज्ञानानुसार देवाचा दास आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. हे सत्य सुभक्तीशी अनुरूप असून,
२ सर्वकाळाच्या जीवनाच्या त्या आशेवर आधारित आहे, ज्याविषयी देवाने, जो कधीही खोटे बोलू शकत नाही, फार पूर्वीच वचन दिले होते;
३ पण त्याच्या नियुक्त वेळी त्याने त्याचे वचन, मला सोपवण्यात आलेल्या प्रचाराच्या सेवेद्वारे प्रकट केले; ही सेवा मला आपला तारणकर्ता, देव याच्या आज्ञेनुसार सोपवण्यात आली आहे.
४ तर, मी पौल हे पत्र माझा सहविश्वासू व खऱ्या अर्थाने माझे लेकरू असलेला तीत, याला लिहित आहे:
देव जो पिता, आणि आपला तारणकर्ता ख्रिस्त येशू यांच्याकडून तुला अपार कृपा व शांती लाभो.
५ मी तुला क्रेतमध्ये यासाठी सोडून आलो, की तू तिथे घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी* सुधाराव्यात आणि प्रत्येक शहरात वडिलांची नियुक्ती करावी. यासंबंधी मी तुला अशा सूचना दिल्या होत्या की:
६ वडील म्हणून अशा मनुष्याला नेमावे, ज्याच्यावर कोणताही आरोप नाही, ज्याला एकच बायको आहे, ज्याची मुले विश्वासात असून त्यांच्यावर स्वैराचाराचा* किंवा बंडखोरपणाचा आरोप नाही.
७ कारण देवाचा कारभारी या नात्याने, मंडळीची देखरेख करणाऱ्यावर कोणताही आरोप असू नये. तो अडेल वृत्तीचा, तापट स्वभावाचा, दारुडा, हिंसक वृत्तीचा* किंवा बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारा असू नये.
८ तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणाची आवड असणारा, समंजस,* नीतिमान, एकनिष्ठ व संयमी असावा.
९ त्याची शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्वसनीय वचनाला* धरून असावी, ज्यामुळे तो हितकारक शिक्षणाने इतरांना प्रोत्साहन देऊ शकेल* आणि त्यासोबतच जे हे वचन मान्य करत नाहीत, त्यांना ताडनही देऊ शकेल.
१० कारण बंडखोर वृत्तीची, निरर्थक गोष्टींबद्दल बोलणारी आणि फसवणूक करणारी, विशेषतः सुंतेची* प्रथा पाळण्याचा आग्रह धरणारी बरीच माणसे आहेत.
११ यांची तोंडे बंद केली पाहिजेत, कारण हीच माणसे, बेइमानीचे धन मिळवण्याच्या लोभाने नको त्या गोष्टींबद्दल शिकवून सबंध कुटंबांचा विश्वास नष्ट करतात.
१२ त्यांच्याच एका संदेष्ट्याने असे म्हटले आहे: “क्रेतचे लोक सहसा खोटारडे, जनावरांसारखे क्रूर, ऐतखाऊ आणि आधाशी असतात.”
१३ ही साक्ष खरी आहे. म्हणूनच, त्यांचे कडक शब्दांत ताडन करत जा, म्हणजे ते विश्वासात सुदृढ राहू शकतील,
१४ आणि यहुद्यांच्या कथा-कहाण्यांकडे व सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञांकडे लक्ष देणार नाहीत.
१५ जे शुद्ध आहेत, त्यांच्या दृष्टीने सर्व गोष्टी शुद्ध असतात; पण जे अशुद्ध आणि विश्वासहीन आहेत, त्यांच्या दृष्टीने काहीही शुद्ध नसते, कारण त्यांची मने आणि त्यांचे विवेक दूषित झाले आहेत.
१६ चारचौघांत ते देवाला ओळखत असल्याचा दावा तर करतात, पण आपल्या कामांनी ते त्याला नाकारतात, कारण ते आज्ञा मोडणारे किळसवाणे लोक आहेत आणि कोणत्याही चांगल्या कामाच्या लायकीचे नाहीत.
तळटीपा
^ किंवा “उणिवा.”
^ किंवा “बेतालपणाचा.”
^ किंवा “इतरांना शब्दांनी दुखावणारा.”
^ किंवा “चांगल्यावाइटातला फरक ओळखणारा; सुज्ञ.”
^ किंवा “भरवशालायक संदेशाला.”
^ किंवा “आर्जवू शकेल.”
^ शब्दार्थसूची पाहा.