तीत २:१-१५

  • तरुण व वयस्कर यांच्यासाठी सल्ला (१-१५)

    • देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या गोष्टींचा धिक्कार (१२)

    • चांगल्या कामांसाठी आवेशी (१४)

 तू मात्र नेहमी हितकारक शिक्षणाला धरून असलेल्या गोष्टींविषयी सांगत राहा. २  वयस्कर पुरुषांनी मर्यादशील, गंभीर, समंजस आणि विश्‍वास, प्रेम व धीर या बाबतींत सुदृढ असावे. ३  तसेच, वयस्कर स्त्रियांनी पवित्र जनांना शोभेल असे वागावे; त्या चहाडखोर, जास्त प्रमाणात मद्य* घेणाऱ्‍या असू नयेत; तर चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्‍या असाव्यात. ४  यासाठी की, त्यांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्‍यावर व मुलाबाळांवर प्रेम करण्यास, ५  समंजस असण्यास, शुद्ध आचरण ठेवण्यास, आपले घर सांभाळण्यास,* दयाळू असण्यास, तसेच, आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन राहण्यास शिकवावे,* म्हणजे लोक देवाच्या वचनाची निंदा करणार नाहीत. ६  त्याचप्रमाणे, तरुण पुरुषांनाही समंजस असण्याचा आर्जव करत राहा. ७  आणि तू स्वतःदेखील सर्व बाबतींत, चांगली कार्ये करण्याचा आदर्श ठेव. जे शुद्ध* ते गंभीरतेने शिकवत राहा; ८  ज्याची कोणी टीका करू शकणार नाही, अशा हितकारक गोष्टी शिकव, ज्यामुळे विरोधकांना आपल्याविरुद्ध काही नकारात्मक* बोलायला जागाच नसल्यामुळे ते लज्जित होतील. ९  दासांनी सर्व बाबतींत आपल्या मालकांच्या अधीन राहून त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत राहावा; त्यांनी उलट बोलू नये, १०  चोरी करू नये, तर पूर्णपणे भरवशालायक असावे, म्हणजे सर्व बाबतींत ते आपला तारणकर्ता देव याच्या शिक्षणाला शोभा आणू शकतील. ११  कारण देवाची अपार कृपा प्रकट करण्यात आली आहे; आणि या कृपेमुळे सर्व प्रकारच्या लोकांचे तारण होते. १२  ती कृपा आपल्याला असे शिकवते, की आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करावा, या जगाच्या व्यवस्थेत* समंजसपणे, नीतीने आणि सुभक्‍तीने जीवन जगावे, १३  आणि त्या दिवसाची वाट पाहत राहावी जेव्हा आपली आनंददायक आशा पूर्ण होईल व महान देवाचा आणि आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याचा गौरव प्रकट होईल; १४  ज्याने स्वतःला आपल्याकरता यासाठी अर्पण केले, की सर्व प्रकारच्या अनीतीपासून आपल्याला मुक्‍त करून* चांगल्या कामांसाठी आवेशी असे, आपल्या खास मालकीचे लोक स्वतःकरता शुद्ध करावेत. १५  या गोष्टी शिकवून त्यांना प्रोत्साहन देत राहा आणि पूर्ण अधिकाराने त्यांचे ताडन करत राहा. कोणीही तुला तुच्छ लेखू नये.

तळटीपा

किंवा “द्राक्षारस.”
किंवा “घरातली कामे करण्यास.”
किंवा “आठवण करून द्यावी; प्रशिक्षण द्यावे.”
किंवा कदाचित, “शुद्धतेने शिक्षण दे.”
किंवा “वाईट.”
किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “आपल्याकरता खंडणी देऊन; आपली सुटका करून.”