तीत ३:१-१५

  • योग्य अधीनता (१-३)

  • चांगल्या कामांसाठी तयार असा (४-८)

  • मूर्खपणाचे वादविवाद व वेगळ्या शिकवणींचा धिक्कार करा (९-११)

  • वैयक्‍तिक सूचना आणि नमस्कार (१२-१५)

 त्यांना याची आठवण करून देत राहा, की त्यांनी सरकार आणि अधिकारी यांच्या अधीन व आज्ञेत राहावे, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार असावे, २  कोणाचीही बदनामी करू नये, भांडखोर असू नये; तर समजूतदार असावे आणि सर्वांशी सौम्यतेने वागावे. ३  कारण आपणसुद्धा एकेकाळी अविचारी, आज्ञा मोडणारे, बहकलेले, वेगवेगळ्या वासनांच्या व शारीरिक सुखांच्या आहारी गेलेले, दुष्टपणे व ईर्ष्येने वागणारे, तिरस्कार करण्याच्या लायकीचे व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. ४  पण, जेव्हा आपल्या तारणकर्त्या देवाची कृपा आणि मानवजातीसाठी असलेले त्याचे प्रेम प्रकट झाले, ५  तेव्हा आपण केलेल्या नीतिमान कृत्यांमुळे नाही, तर केवळ त्याच्या दयेमुळे, त्याने आपल्याला एक नवीन जीवन देणाऱ्‍या स्नानाद्वारे आणि पवित्र आत्म्याने* एक नवीन व्यक्‍ती बनवण्याद्वारे आपले तारण केले. ६  त्याने आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर या आत्म्याचा उदारपणे* वर्षाव केला आहे, ७  यासाठी, की त्याच्या अपार कृपेमुळे नीतिमान ठरवले गेल्यानंतर आपण आपल्या आशेनुसार सर्वकाळाच्या जीवनाचे वारस बनावे. ८  या गोष्टी विश्‍वसनीय आहेत आणि त्यांवर तू भर देत राहावा अशी माझी इच्छा आहे; म्हणजे, ज्यांनी देवावर विश्‍वास ठेवला आहे, ते आपली मने चांगली कामे करत राहण्यावर केंद्रित करू शकतील. या गोष्टी उत्तम आणि लोकांच्या फायद्याच्या आहेत. ९  पण मूर्खपणाचे वादविवाद, वंशावळ्यांवर चर्चा आणि नियमशास्त्राबद्दल मतभेद व भांडणतंटे यांपासून दूर राहा; कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. १०  एखादा मनुष्य वेगळी शिकवण देत असेल, तर त्याला दोनदा ताकीद द्यावी* आणि तरीसुद्धा त्याने ऐकले नाही, तर त्याच्याशी संबंध तोडून टाकावा. ११  कारण असा मनुष्य योग्य मार्गापासून बहकला असून तो पाप करत आहे. त्याच्या स्वतःच्या वागणुकीनेच त्याला दोषी ठरवले आहे. १२  मी अर्तमा आणि तुखिक यांना तुझ्याकडे पाठवीन तेव्हा माझ्याकडे निकपलिसला येण्याचा होईल तितका प्रयत्न कर, कारण तिथेच हिवाळा घालवण्याचा माझा विचार आहे. १३  नियमशास्त्राचा जाणकार असलेला जेना आणि अपुल्लो यांना प्रवासात काही कमी पडू नये, म्हणून त्यांना लागेल ते सर्व पुरवण्याचा होईल तितका प्रयत्न कर. १४  पण, बांधवांच्या तातडीच्या गरजा पुरवण्यासाठी आपल्या लोकांनीही चांगली कार्ये करण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी, म्हणजे ते त्यांच्या सेवेत निष्फळ ठरणार नाहीत. १५  माझ्यासोबत असलेले सर्व जण तुला नमस्कार सांगतात. आमच्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्व सहविश्‍वासू बांधवांना माझा नमस्कार सांग. देवाची अपार कृपा तुम्हा सर्वांवर असो.

तळटीपा

किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीने.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “समृद्धपणे.”
किंवा “समजवावे.”