प्रकटीकरण १०:१-११

  • लहान गुंडाळी घेतलेला शक्‍तिशाली देवदूत (१-७)

    • “आता आणखी उशीर होणार नाही” ()

    • पवित्र रहस्य पूर्ण होईल ()

  • योहान ती लहान गुंडाळी खातो (८-११)

१०  मग मी आणखी एक शक्‍तिशाली देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला; त्याने एक ढग पांघरला होता* आणि त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा आणि त्याचे पाय अग्नीच्या खाबांसारखे होते, २  आणि त्याच्या हातात उघडलेली एक लहान गुंडाळी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रावर, तर डावा पाय पृथ्वीवर ठेवला, ३  आणि सिंहाच्या गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. तो ओरडला तेव्हा ढगांच्या सात गडगडाटांचे आवाज मला ऐकू आले. ४  जेव्हा सात गडगडाटांचे आवाज आले तेव्हा मी लिहिणारच होतो, पण इतक्यात स्वर्गातून एक आवाज मला ऐकू आला, जो म्हणाला: “सात गडगडाटांनी सांगितलेल्या गोष्टी शिक्का मारून बंद कर, त्या लिहू नकोस.” ५  समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा असलेला जो देवदूत मला दिसला त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचावला, ६  आणि जो सदासर्वकाळ जिवंत राहतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व गोष्टी आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी आणि समुद्र व त्यातील सर्व गोष्टी निर्माण केल्या त्याची शपथ घेऊन तो म्हणाला: “आता आणखी उशीर होणार नाही. ७  पण, ज्या दिवसांत सातवा देवदूत आपला कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाचे पवित्र रहस्य खऱ्‍या अर्थाने पूर्ण होईल; हे रहस्य त्याने आनंदाचा संदेश म्हणून आपल्या दासांना अर्थात संदेष्ट्यांना घोषित केले होते.” ८  आणि स्वर्गातून आलेला आवाज पुन्हा माझ्याशी बोलला आणि म्हणाला: “जा, जो देवदूत समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा आहे त्याच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.” ९  मग, मी त्या देवदूताकडे गेलो आणि ती लहान गुंडाळी मला दे असे म्हणालो. तेव्हा तो मला म्हणाला: “ही घे आणि खाऊन टाक; ती खाल्ल्यावर तुझं पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडात मात्र ती मधासारखी गोड लागेल.” १०  मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली तेव्हा तोंडात ती मला मधासारखी गोड लागली, पण ती खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. ११  मग मला असे सांगण्यात आले: “अनेक लोक, राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे, तसेच अनेक राजे यांच्याबद्दल तुला पुन्हा भविष्यवाणी करावी लागेल.”

तळटीपा

किंवा “तो एका ढगाने झाकलेला होता.”