प्रकटीकरण १५:१-८

  • सात पीडा घेतलेले सात देवदूत (१-८)

    • मोशेचे व कोकऱ्‍याचे गीत (३, ४)

१५  नंतर, स्वर्गात आणखी एक मोठे व अद्‌भुत असे चिन्ह मला दिसले; मला सात देवदूत दिसले, ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या. या शेवटच्या पीडा आहेत, कारण त्यांद्वारे देवाचा क्रोध समाप्त होतो. २  मग, अग्नी मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मला दिसले; आणि जे जंगली पशूवर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळवतात ते देवाच्या वीणा हातात घेऊन काचेच्या समुद्राजवळ उभे होते. ३  ते देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्‍याचे गीत गाऊन म्हणत होते: “हे सर्वसमर्थ, यहोवा* देवा, तुझी कार्ये महान व अद्‌भुत आहेत. हे अनंतकाळच्या राजा, तुझे मार्ग नीतीचे व सत्याचे आहेत. ४  हे यहोवा* तुझी भीती कोण बाळगणार नाही? तुझा गौरव कोण करणार नाही? कारण, केवळ तूच एकनिष्ठ आहेस. सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे येऊन तुझी उपासना करतील, कारण तुझा न्याय नीतिमान असल्याचे प्रकट झाले आहे.” ५  यानंतर, स्वर्गात मला साक्षीच्या मंडपाचे पवित्र स्थान* उघडलेले दिसले, ६  आणि ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या ते सात देवदूत पवित्र स्थानातून बाहेर आले; त्यांनी शुभ्र, तेजस्वी तागाची वस्त्रे घातली होती आणि छातीला सोन्याचे पट्टे गुंडाळले होते. ७  चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने त्या सात देवदूतांना सात सोन्याच्या वाट्या दिल्या, ज्या सदासर्वकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या होत्या. ८  आणि देवाच्या गौरवापासून व सामर्थ्यापासून निघालेल्या धुराने सबंध पवित्र स्थान भरून गेले; आणि त्या सात देवदूतांकडील सात पीडा संपेपर्यंत कोणीही पवित्र स्थानात जाऊ शकत नव्हते.

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
अर्थात, मंदिराचे परमपवित्र स्थात.