प्रकटीकरण १८:१-२४

  • “मोठी बाबेल” पडते (१-८)

    • “तिच्यामधून बाहेर या” ()

  • बाबेल पडल्यामुळे शोक (९-१९)

  • बाबेल पडल्यामुळे स्वर्गात आनंद (२०)

  • बाबेलला एका दगडाप्रमाणे समुद्रात फेकून दिले जाईल (२१-२४)

१८  यानंतर, मला आणखी एक देवदूत स्वर्गातून उतरताना दिसला. त्याच्याकडे मोठा अधिकार होता आणि त्याच्या गौरवाच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. २  तो मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल पडली आहे! ती दुरात्म्यांचं निवासस्थान, प्रत्येक अशुद्ध आत्म्याचं* आणि प्रत्येक अशुद्ध व घृणित पक्ष्याचं आश्रयस्थान बनली आहे! ३  कारण, तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायल्यामुळे सर्व राष्ट्रे तिला बळी पडली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्ये केली आणि तिच्या निर्लज्ज ऐशआरामाच्या प्रभावामुळे पृथ्वीवरील व्यापारी* श्रीमंत झाले.” ४  मग, स्वर्गातून आलेला आणखी एक आवाज मी ऐकला, जो म्हणाला: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून तिच्यामधून बाहेर या! ५  कारण तिच्या पापांची रास थेट आकाशापर्यंत पोचली आहे आणि देवाने तिच्या अन्यायी कृत्यांची* आठवण केली आहे. ६  तिने इतरांना जसं वागवलं, तसंच तिच्याशी वागा; हो, तिने जे काही केलं त्याच्या दुप्पट तिला द्या आणि तिने प्याल्यात जे मिसळलं, त्याच्या दुप्पट तिच्यासाठी मिसळा. ७  तिने जितके स्वतःला गौरवले आणि निर्लज्जपणे ऐशआरामात राहिली, तितक्या यातना व दुःख तिला द्या. कारण ती मनातल्या मनात म्हणते: ‘मी तर राणीसारखी बसले आहे. मी काही विधवा नाही आणि माझ्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही.’ ८  म्हणून मरण, दुःख, दुष्काळ या सगळ्या पीडा एकाच दिवशी तिच्यावर येतील; आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकलं जाईल, कारण ज्याने तिचा न्याय केला, तो यहोवा* देव सामर्थ्यशाली आहे. ९  आणि पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्ये* केली आणि जे तिच्यासोबत निर्लज्जपणे ऐशआरामात राहिले ते तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा रडतील व दुःखाने छाती बडवून घेतील. १०  तिच्या यातनेच्या भीतीने ते दूर उभे राहतात आणि म्हणतात: ‘अरेरे बाबेल नगरी! तू किती सामर्थ्यशाली महानगरी होतीस! किती वाईट झालं तुझ्यासोबत! कारण एका घटकेत तुझ्यावर न्यायदंड बजावण्यात आला!’ ११  तसंच, पृथ्वीचे व्यापारीसुद्धा तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा संपूर्ण माल विकत घेणारा आता कोणीही नाही; १२  तो संपूर्ण माल म्हणजे: सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळे कापड, रेशमी आणि लाल कापड; सुगंधी लाकडापासून बनवलेल्या वस्तू आणि हस्तिदंतापासून तयार केलेल्या निरनिराळ्या वस्तू; तसंच, मौल्यवान लाकूड, तांबे, लोखंड आणि संगमरवर यांपासून बनवलेली प्रत्येक वस्तू; १३  शिवाय दालचिनी, मसाले,* धूप, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम आणि मानवी जीव. १४  ज्या उत्तम फळांची तुला आवड होती ती आता तुझ्यापासून गेली आहेत, आणि सर्व स्वादिष्ट पदार्थ व चैनीच्या वस्तू तुझ्यापासून नाहीशा झाल्या आहेत; आणि त्या पुन्हा कधीच मिळणार नाहीत. १५  या गोष्टी विकणारे आणि तिच्यामुळे श्रीमंत झालेले व्यापारी तिच्या यातनेच्या भीतीने दूर उभे राहून रडतील व शोक करतील; १६  आणि म्हणतील: ‘अरेरे! तागाचे तलम कपडे, जांभळे व लाल कपडे घातलेली आणि सोने, चांदी, मौल्यवान रत्ने व मोती यांनी सजलेली महानगरी! किती वाईट झालं तुझ्यासोबत! १७  कारण, एकाच घटकेत तुझी ही अमाप संपत्ती उद्‌ध्वस्त झाली!’ आणि जहाजाचा प्रत्येक चालक, प्रत्येक समुद्रप्रवासी, सर्व खलाशी आणि समुद्रावर उद्योगधंदा करून पोट भरणारे सर्व जण दूर उभे राहिले, १८  आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून आक्रोश करत म्हणाले: ‘या महानगरीसारखी कोणती नगरी आहे?’ १९  त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि आक्रोश करत, रडत व शोक करत ते म्हणाले: ‘अरेरे! या महानगरीचं किती वाईट झालं! समुद्रावर ज्यांची जहाजे होती ते सर्व तिच्या धनसंपत्तीमुळे श्रीमंत झाले होते! पण, एकाच घटकेत ती उद्‌ध्वस्त झाली!’ २०  हे स्वर्गा, तसंच पवित्र जनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो तिच्याबद्दल आनंद करा; कारण, देवाने तुमच्यासाठी तिच्यावर आपला न्यायदंड बजावला आहे!” २१  आणि एका शक्‍तिशाली देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा दगड उचलला आणि तो समुद्रात फेकून म्हणाला: “अशाच प्रकारे महानगरी बाबेलला एका झटक्यात फेकून दिलं जाईल आणि पुन्हा कधीच तिचा पत्ता लागणार नाही. २२  आणि वीणा वाजवणाऱ्‍या गायकांचा, संगीतकारांचा, बासरी वाजवणाऱ्‍यांचा आणि कर्णा वाजवणाऱ्‍यांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. आणि कोणताही कारागीर पुन्हा कधीच तुझ्यात सापडणार नाही; आणि जात्याचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. २३  दिव्याचा प्रकाश पुन्हा कधीच तुझ्यात चमकणार नाही, आणि वधुवरांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही; कारण, तुझे व्यापारी पृथ्वीवरील प्रतिष्ठित लोक होते आणि तुझ्या भूतविद्येमुळे सर्व राष्ट्रांची फसवणूक झाली होती. २४  हो, तिच्यामध्ये संदेष्ट्यांचं, पवित्र जनांचं आणि पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या सर्वांचं रक्‍त आढळलं.”

तळटीपा

किंवा कदाचित, “श्‍वास; उच्छ्‌वास; प्रेरित संदेश.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “क्रोधाचा.”
किंवा “प्रवास करणारे व्यापारी.”
किंवा “तिच्या अपराधांची.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “हिंदुस्तानचा मसाला.”