प्रकटीकरण २०:१-१५

  • सैतानाला हजार वर्षांसाठी बांधले जाते (१-३)

  • ख्रिस्तासोबत हजार वर्षे राज्य करणारे राजे (४-६)

  • सैतानाला मुक्‍त करणे, त्यानंतर त्याचा नाश (७-१०)

  • पांढऱ्‍या राजासनासमोर मृतांचा न्याय (११-१५)

२०  मग, स्वर्गातून एक देवदूत उतरताना मला दिसला; त्याच्या हातात अथांग डोहाची किल्ली आणि एक मोठा साखळदंड होता. २  त्याने, दियाबल आणि सैतान म्हटलेल्या अजगराला, म्हणजे त्या जुन्या सापाला धरले आणि त्याला हजार वर्षांसाठी बांधून ठेवले. ३  आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना बहकवू नये म्हणून त्याने त्याला अथांग डोहात टाकून दिले आणि अथांग डोह बंद करून त्यावर शिक्का मारला. यानंतर, थोड्या वेळासाठी त्याला सोडले जाईल. ४  आणि मला राजासने दिसली, आणि त्यांवर बसलेल्यांना न्याय करण्याचा अधिकार देण्यात आला. मग, ज्यांना येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल आणि देवाविषयी सांगत असल्याबद्दल मृत्युदंड देण्यात आला होता;* तसेच, ज्यांनी जंगली पशूची किंवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती, त्यांचे जीव* मला दिसले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत हजार वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केले. ५  (पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत मेलेल्यांपैकी बाकीचे पुन्हा जिवंत झाले नाहीत.) हे पहिले पुनरुत्थान* आहे. ६  जो कोणी पहिल्या पुनरुत्थानाचा वाटेकरी होतो तो सुखी व पवित्र आहे; यांच्यावर दुसऱ्‍या मृत्यूचा काहीही अधिकार नाही. तर, ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्यासोबत हजार वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य करतील. ७  ती हजार वर्षे पूर्ण होताच सैतानाला कैदेतून मुक्‍त केले जाईल, ८  आणि तो पृथ्वीच्या चार दिशांना पसरलेल्या राष्ट्रांना, म्हणजे गोग आणि मागोगला बहकवण्यासाठी आणि त्यांना युद्धाकरता एकत्र करण्यासाठी जाईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. ९  ते संपूर्ण पृथ्वीवर वाटचाल करत गेले आणि त्यांनी पवित्र जनांच्या छावणीला व परमप्रिय नगरीला वेढा घातला. पण, स्वर्गातून अग्नीचा वर्षाव झाला व त्या अग्नीने त्यांना भस्म केले. १०  आणि त्यांना बहकवणाऱ्‍या दियाबलाला अग्नी व गंधकाच्या सरोवरात फेकून देण्यात आले, जिथे जंगली पशू आणि खोटा संदेष्टा हे दोघे आधीपासूनच होते; आणि त्यांना रात्रंदिवस सदासर्वकाळ यातना* दिल्या जातील. ११  आणि एक मोठे पांढरे राजासन आणि त्यावर जो बसला होता तो मला दिसला. पृथ्वी आणि आकाश त्याच्यासमोरून पळून गेले, आणि त्यांच्यासाठी कोणतेही ठिकाण सापडले नाही. १२  मग, मरण पावलेले लहानमोठे राजासनासमोर उभे असलेले मला दिसले आणि गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पण, आणखी एक गुंडाळी उघडण्यात आली; ती जीवनाची गुंडाळी* आहे. गुंडाळ्यांमध्ये ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला. १३  आणि समुद्राने त्याच्यातील मृतांना बाहेर सोडले; तसेच, मृत्यूने आणि कबरेनेसुद्धा* त्यांच्यातील मृतांना बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. १४  मृत्यू आणि कबर* यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. हे अग्नीचे सरोवर म्हणजे दुसरा मृत्यू. १५  तसेच, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.

तळटीपा

शब्दशः “कुऱ्‍हाडीने ठार मारण्यात आले होते.”
शब्दार्थसूची पाहा. तसेच, प्रक ६:९ तळटीप पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कैद केले जाईल.”
किंवा “जीवनाचे पुस्तक.”
किंवा “हेडीस.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जेथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “हेडीस.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जेथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.