प्रकटीकरण २१:१-२७

  • एक नवे आकाश व नवी पृथ्वी (१-८)

    • यापुढे मरण नसेल ()

    • सर्वकाही नवे केले जाते ()

  • नव्या यरुशलेमचे वर्णन (९-२७)

२१  मग, मला एक नवे आकाश आणि नवी पृथ्वी दिसली; कारण, आधीचे आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती, आणि समुद्रही राहिला नाही. २  मग मला पवित्र नगरी, नवी यरुशलेमही दिसली; ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली व ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती. ३  मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला, जो म्हणाला: “पाहा! देवाचा तंबू मानवांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल. ४  आणि तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.” ५  आणि राजासनावर बसलेला म्हणाला: “पाहा! मी सर्व काही नवे करत आहे.” पुढे तो असेही म्हणाला: “लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.” ६  मग, तो मला म्हणाला: “ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा,* म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे. जो कोणी तहानलेला असेल त्याला मी जीवनाच्या झऱ्‍याचे पाणी मोफत* देईन. ७  जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टींचा वारसा मिळेल आणि मी त्याचा देव होईन व तो माझा मुलगा होईल. ८  पण, भितरे, विश्‍वास न ठेवणारे, अशुद्ध व घृणास्पद गोष्टी करणारे, खुनी, अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारे, भूतविद्या करणारे, मूर्तिपूजा करणारे आणि खोटे बोलणारे या सर्वांच्या वाट्याला अग्नी व गंधकाने जळणारे सरोवर येईल. हाच दुसरा मृत्यू आहे.” ९  मग, ज्यांच्याजवळ शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या, त्या सात देवदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला: “ये, मी तुला वधू दाखवतो, कोकऱ्‍याची वधू.” १०  तेव्हा, तो मला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एका मोठ्या, उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने मला यरुशलेम ही पवित्र नगरी दाखवली; ती स्वर्गातून, देवापासून उतरत होती, ११  आणि ती देवाच्या तेजाने प्रकाशित झाली होती आणि तिचे वैभव अतिशय मौल्यवान रत्नासारखे, स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्‍या यास्फे* खड्यासारखे होते. १२  तिच्याभोवती एक उंच व मोठी भिंत होती. तिला बारा फाटके असून त्या फाटकांजवळ बारा देवदूत होते; आणि त्या फाटकांवर इस्राएल पुत्रांच्या बारा वंशांची नावे कोरण्यात आली होती. १३  पूर्वेकडे तीन फाटके, उत्तरेकडे तीन फाटके, दक्षिणेकडे तीन फाटके आणि पश्‍चिमेकडे तीन फाटके होती. १४  नगराच्या भिंतीला बारा दगडांचा पायाही होता आणि त्यांवर कोकऱ्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे लिहिलेली होती. १५  आता माझ्याशी जो बोलत होता त्याच्याकडे नगराचे, त्याच्या फाटकांचे आणि भिंतीचे मोजमाप घेण्यासाठी एक सोन्याचा वेत होता. १६  नगर चौकोनी आहे; त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. त्याने त्या वेताने नगराचे माप घेतले, तेव्हा ते सुमारे २,२२० किलोमीटर* इतके भरले; त्याची लांबी, रुंदी व उंची सारखीच आहे. १७  नंतर, त्याने भिंतीचेही माप घेतले आणि ते माणसाच्या, तसेच देवदूताच्या मापानुसार १४४ हात* इतके भरले. १८  नगराची भिंत यास्फे रत्नापासून बनलेली होती आणि नगर पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचे होते. १९  नगराच्या भिंतीचे पाये हरतऱ्‍हेच्या मौल्यवान रत्नांनी सजलेले होते: पहिला पाया यास्फे रत्नाचा होता; दुसरा नीलमणी, तिसरा मौल्यवान वाळूचा दगड, चौथा पाचू, २०  पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, आणि बारावा पद्‌मराग रत्नाचा होता. २१  तसेच, बारा फाटके बारा मोत्यांची, म्हणजे प्रत्येक फाटक एकेका मोत्याचे होते. आणि नगराचा मुख्य रस्ता पारदर्शक काचेसारखा, शुद्ध सोन्याचा होता. २२  त्या नगरात मला मंदिर दिसले नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा* आणि कोकरा हेच त्याचे मंदिर आहे. २३  त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित होते आणि कोकरा तिचा दीप आहे. २४  आणि राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले ऐश्‍वर्य तिच्यात आणतील. २५  तिची फाटके दिवसा बंद होणारच नाहीत कारण तिथे कधीही रात्र होणार नाही. २६  आणि ते राष्ट्रांचे वैभव आणि प्रतिष्ठा तिच्यात आणतील. २७  पण, कोणतीही दूषित गोष्ट, तसेच कोणत्याही घृणास्पद गोष्टी व कपट करणारा कोणीही त्यात प्रवेश करणार नाही; तर, कोकऱ्‍याच्या जीवनाच्या गुंडाळीत ज्यांची नावे आहेत केवळ तेच त्यात प्रवेश करतील.

तळटीपा

किंवा “भरवशालायक.”
अर्थात, सुरुवात व शेवट. अल्फा व ओमेगा हे ग्रीक वर्णमालेतील पहिले व शेवटचे अक्षर आहे.
किंवा “विनामूल्य.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करते.
शब्दशः “१२,००० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचे रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मीटर (६०६.९५ फूट) इतके होते.
सुमारे ६४ मीटर (२१० फूट). शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.