प्रकटीकरण २२:१-२१

  • जीवनाच्या पाण्याची नदी (१-५)

  • समाप्ती (६-२१)

    • ‘ये! जीवनाचे पाणी मोफत घे’ (१७)

    • “प्रभू येशू, ये” (२०)

२२  मग, त्याने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली; ती स्फटिकासारखी नितळ असून देवाच्या आणि कोकऱ्‍याच्या राजासनातून वाहत होती; २  ती नगराच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनाची झाडे होती, जी वर्षातून बारा वेळा, म्हणजे दर महिन्याला फळ द्यायची; आणि झाडांची पाने ही राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी होती. ३  आणि यापुढे तिथे कोणताही शाप असणार नाही. तर, देवाचे आणि कोकऱ्‍याचे राजासन त्या नगरात असेल, आणि देवाचे दास त्याची पवित्र सेवा करतील; ४  ते त्याचे मुख पाहतील आणि त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर लिहिलेले असेल. ५  शिवाय, पुन्हा कधीच रात्र होणार नाही, आणि त्यांना दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाची गरज पडणार नाही, कारण यहोवा* देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल, आणि ते राजे म्हणून सदासर्वकाळ राज्य करतील. ६  मग, देवदूत मला म्हणाला: “ही वचनं विश्‍वसनीय* व खरी आहेत; आणि संदेष्ट्यांना प्रेरित करणारा देव, यहोवा,* याने ज्या गोष्टी लवकरच घडून येणार आहेत त्या आपल्या दासांना दाखवण्यासाठी आपला देवदूत पाठवला आहे. ७  पाहा! मी लवकरच येत आहे. जो कोणी या गुंडाळीतील भविष्यवाणीचे शब्द पाळतो तो सुखी आहे.” ८  तर, मी योहान या गोष्टी ऐकत व पाहत होतो. मी त्या ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा ज्या देवदूताने मला या गोष्टी दाखवल्या होत्या त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. ९  पण, तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि तुझ्या बांधवांसारखाच अर्थात संदेष्ट्यांसारखाच, तसेच जे या गुंडाळीतले शब्द पाळतात त्यांच्यासारखाच केवळ एक दास आहे. देवाची उपासना कर!” १०  तो मला असेही म्हणाला: “या गुंडाळीतील भविष्यवाणीचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण नियुक्‍त वेळ जवळ आली आहे. ११  जो अनीतिमान आहे, तो अनीतीने वागत राहो, आणि जो अशुद्ध आहे, तो अशुद्धपणा करत राहो; पण जो नीतिमान आहे, त्याने नीतीने वागत राहावं आणि जो पवित्र आहे, त्याने पवित्रतेत चालत राहावं. १२  ‘पाहा! मी लवकरच येत आहे, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ प्रतिफळ आहे. १३  मी अल्फा आणि ओमेगा,* म्हणजे पहिला आणि शेवटला, सुरुवात आणि अंत आहे. १४  आपल्याला जीवनाच्या झाडांजवळ जाण्याचा अधिकार मिळावा आणि त्या नगरीच्या फाटकांतून प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे धुतात ते सुखी आहेत. १५  पण कुत्रे,* भूतविद्या करणारे, अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारे, खुनी, मूर्तिपूजा करणारे; तसंच, खोटेपणावर प्रेम करणारे व खोटं बोलणारे सर्व जण बाहेरच राहतील.’ १६  ‘मंडळ्यांच्या हिताकरता मी, येशूने, या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्यासाठी माझ्या देवदूताला पाठवलं. मी दाविदचे मूळ व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.’” १७  आणि पवित्र आत्मा व वधू असे म्हणतात: “ये!” आणि जो ऐकतो तो म्हणो, “ये!” आणि जो तहानलेला आहे त्याने यावे; आणि ज्या कोणाला जीवनाचे पाणी हवे आहे, त्याने ते मोफत घ्यावे. १८  “जो कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द ऐकतो त्या प्रत्येकाला मी ही साक्ष देत आहे: जर कोणी या गोष्टींत भर घातली, तर या गुंडाळीत लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणेल; १९  आणि जर कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीच्या शब्दांतून काही काढून टाकले, तर या गुंडाळीत सांगितलेल्या गोष्टींतून, अर्थात जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरीतून देव त्याचा वाटा काढून घेईल. २०  या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, ‘हो, मी लवकरच येत आहे.’” “आमेन! प्रभू येशू, ये.” २१  प्रभू येशूची अपार कृपा पवित्र जनांसोबत असो.

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
किंवा “भरवशालायक.”
शब्दार्थसूची पाहा.
अर्थात, सुरुवात व शेवट. अल्फा व ओमेगा हे ग्रीक वर्णमालेतील पहिले व शेवटचे अक्षर आहे.
अर्थात, ज्यांची कामे देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहेत.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.