प्रकटीकरण ४:१-११
४ यानंतर, पाहा! मला स्वर्गात एक उघडलेला दरवाजा दिसला आणि माझ्याशी बोलत असलेला जो पहिला आवाज मला ऐकू आला, तो एका कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला: “इकडे वर ये, म्हणजे पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन.”
२ यानंतर लगेच मी आत्म्याच्या प्रभावाखाली आलो, आणि पाहा! स्वर्गात एक राजासन होते आणि त्या राजासनावर एक जण बसलेला होता.
३ त्याचे रूप यास्फे* व सार्दी या रत्नांसारखे* होते आणि राजासनाच्या सभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.
४ राजासनाच्या भोवती चोवीस राजासने होती आणि या राजासनांवर मी चोवीस वडिलांना बसलेले पाहिले. त्यांनी पांढरी वस्त्रे घातली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट होते.
५ राजासनातून विजा चमकत होत्या आणि आवाज व ढगांचा गडगडाट ऐकू येत होता; आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात आत्म्यांना सूचित करतात.
६ राजासनासमोर स्फटिकासारखा, जणू काचेचा समुद्र होता.
राजासनाच्या मधोमध* आणि चारही बाजूंना चार जिवंत प्राणी होते, ज्यांच्या अंगावर पुढे व मागे डोळेच डोळे होते.
७ पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा तर दुसरा बैलासारखा होता; तिसऱ्या जिवंत प्राण्याचा चेहरा माणसासारखा होता आणि चौथा जिवंत प्राणी उडणाऱ्या गरुडासारखा होता.
८ चार जिवंत प्राण्यांपैकी प्रत्येकाला सहा पंख होते; त्या पंखांवर सगळीकडे आणि आतल्या बाजूलाही डोळेच डोळे होते. ते रात्रंदिवस सतत अशी घोषणा करत राहतात: “यहोवा* देव, सर्वशक्तिमान, जो होता, जो आहे आणि जो येत आहे, तोच पवित्र, पवित्र, पवित्र!”
९ जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी, राजासनावर जो बसला आहे व जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याचा गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात,
१० तेव्हा तेव्हा चोवीस वडील, राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात, आणि राजासनापुढे आपले मुकुट ठेवून असे म्हणतात:
११ “यहोवा* आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.”
तळटीपा
^ काहींच्या मते हे हिऱ्याला सूचित करते.
^ किंवा “लाल रंगाच्या एका रत्नासारखे.”
^ किंवा “राजासनासोबत मध्यभागी.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.