प्रकटीकरण ६:१-१७
-
कोकरा पहिले सहा शिक्के उघडतो (१-१७)
६ मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक उघडला तेव्हा मी पाहिले, आणि मला त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एकाचा आवाज ऐकू आला, जो ढगांच्या गडगडाटासारखा होता. तो म्हणाला: “ये!”
२ आणि पाहा! मला एक पांढरा घोडा दिसला. त्यावर बसलेल्या स्वाराजवळ एक धनुष्य होते आणि त्याला एक मुकुट देण्यात आला, आणि तो शत्रूंचा पराभव करत आपला विजय पूर्ण करण्यासाठी निघून गेला.
३ त्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मला दुसऱ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “ये!”
४ तेव्हा अग्नीच्या रंगाचा आणखी एक घोडा बाहेर निघाला. त्यावर बसलेल्या स्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार देण्यात आला, यासाठी की लोकांनी एकमेकांची कत्तल करावी. आणि त्याला एक मोठी तलवार देण्यात आली.
५ त्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मला तिसऱ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “ये!” आणि पाहा! मला एक काळा घोडा दिसला आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराच्या हातात एक तराजू होता.
६ मग, मला चार जिवंत प्राण्यांच्या मधून एक आवाज ऐकू आला, जो म्हणाला: “एका दिनाराला* एक माप* गहू आणि एका दिनाराला तीन मापे जव; आणि जैतुनाचे तेल व द्राक्षारस यांची नासाडी करू नको.”
७ त्याने चौथा शिक्का उघडला, तेव्हा मला चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “ये!”
८ आणि पाहा! मला फिक्कट रंगाचा एक घोडा दिसला आणि त्याच्यावर जो स्वार बसलेला होता, त्याचे नाव मृत्यू होते. शिवाय, कबर* त्याच्या पाठोपाठ चालत होती. आणि त्यांना लांब तलवार, दुष्काळ, जीवघेणे रोग आणि पृथ्वीवरील जंगली पशू यांच्याद्वारे लोकांना ठार मारण्यासाठी पृथ्वीच्या चौथ्या भागावर अधिकार देण्यात आला.
९ त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मला वेदीच्या खाली अशा लोकांचे जीव* दिसले, ज्यांना देवाच्या वचनामुळे आणि त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते.
१० ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे सर्वोच्च प्रभू, जो पवित्र आणि खरा आहे, तू न्याय करण्यासाठी आणि पृथ्वीवर राहणाऱ्यांकडून आमच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी कुठपर्यंत थांबशील?”
११ तेव्हा त्या प्रत्येकाला एक पांढरा झगा देण्यात आला आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या ज्या सोबतीच्या दासांना व भावांना लवकरच ठार मारले जाणार होते, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, त्यांना आणखी थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगण्यात आले.
१२ मग त्याने सहावा शिक्का उघडला तेव्हा मी पाहिले आणि एक मोठा भूकंप झाला; आणि सूर्य केसांपासून* बनवलेल्या गोणपाटासारखा काळा झाला आणि संपूर्ण चंद्र रक्तासारखा झाला,
१३ आणि जोराच्या वाऱ्याने हेलकावणाऱ्या अंजिराच्या झाडावरून कच्ची अंजिरे पडावीत, तसे आकाशातले तारे पृथ्वीवर पडले.
१४ एखादी गुंडाळी जशी गुंडाळली जाते, तसे आकाश निघून गेले, आणि प्रत्येक पर्वत आणि प्रत्येक बेट त्याच्या जागेवरून काढून टाकण्यात आले.
१५ तेव्हा पृथ्वीवरचे राजे, वरिष्ठ अधिकारी, सेनापती, श्रीमंत व प्रभावशाली माणसे, प्रत्येक गुलाम, आणि प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती गुहांमध्ये आणि पर्वतांच्या खडकांमध्ये लपली.
१६ आणि ते पर्वतांना आणि खडकांना म्हणू लागले: “आमच्यावर पडा आणि जो राजासनावर बसलेला आहे त्याच्यापासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा,
१७ कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्याचा सामना कोण करू शकतो?”
तळटीपा
^ एक दिनार ही एका दिवसाची मजुरी होती. शब्दार्थसूची पाहा.
^ सैनिकाला पुरवल्या जाणाऱ्या एका दिवसापुरत्या खाद्यसामग्रीत एक माप (ग्रीक, खोइनिक्स, सुमारे ०.७ किलो) गहू दिले जायचे.
^ किंवा “हेडीस.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जिथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
^ हे वेदीवर ओतलेल्या त्यांच्या रक्ताला सूचित करते. शब्दार्थसूची पाहा.
^ कदाचित बकरीच्या केसांपासून.