प्रकटीकरण ८:१-१३

  • सातवा शिक्का उघडला जातो (१-६)

  • पहिल्या चार कर्ण्यांचा नाद (७-१२)

  • तीन विपत्तींविषयी घोषणा (१३)

 कोकऱ्‍याने सातवा शिक्का उघडला तेव्हा स्वर्गात सुमारे अर्धा तास शांतता पसरली. २  आणि देवासमोर उभे राहणारे सात देवदूत मला दिसले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. ३  मग, धूप जाळण्याचे सोन्याचे पात्र हातात घेतलेला एक देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला; त्याला राजासनासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीवर, सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत अर्पण करण्यासाठी भरपूर धूप देण्यात आला. ४  देवदूताच्या हातातील धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत देवासमोर वर चढला. ५  पण, तितक्यात, देवदूताने धूप जाळण्याचे पात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरला आणि तो पृथ्वीवर टाकला. तेव्हा, ढगांचा गडगडाट झाला, गर्जना ऐकू आल्या, विजा चमकल्या आणि भूकंप झाला. ६  आणि सात कर्णे घेतलेले सात देवदूत आपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. ७  पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा रक्‍त मिसळलेल्या गारा व अग्नी उत्पन्‍न होऊन पृथ्वीवर त्यांचा वर्षाव करण्यात आला; यामुळे, पृथ्वीचा एकतृतीयांश भाग जळून गेला; एकतृतीयांश झाडे जळून गेली आणि सर्व हिरव्या वनस्पती जळून गेल्या. ८  दुसऱ्‍या देवदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा आगीने पेटलेल्या मोठ्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात फेकण्यात आले. आणि त्यामुळे, एकतृतीयांश समुद्राचे रक्‍त झाले; ९  आणि समुद्रातील एकतृतीयांश जीव* मरून गेले व एकतृतीयांश जहाजे फुटली. १०  तिसऱ्‍या देवदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा मशालीसारखा जळत असलेला एक मोठा तारा आकाशातून पडला; तो एकतृतीयांश नद्यांवर आणि झऱ्‍यांवर पडला. ११  त्या ताऱ्‍याचे नाव कडूदवणा आहे. त्यामुळे एकतृतीयांश पाण्याचा कडूदवणा झाला आणि त्या पाण्याने बरेच लोक मरण पावले, कारण पाणी कडू झाले होते. १२  चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याच्या एकतृतीयांश भागाला, चंद्राच्या एकतृतीयांश भागाला आणि एकतृतीयांश ताऱ्‍यांना तडाखा बसला, यासाठी की त्यांचा एकतृतीयांश भाग काळवंडून जावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही एकतृतीयांश भागाला प्रकाश मिळू नये. १३  आणि पाहा! आकाशाच्या मध्यभागी मला एक गरूड उडताना दिसला; त्याला मी मोठ्या आवाजात असे म्हणताना ऐकले: “आता आणखी तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत. त्यांच्या कर्ण्यांच्या नादामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍यांवर विपत्ती, विपत्ती, विपत्ती!”

तळटीपा

किंवा “प्राणी.”