प्रकटीकरण ९:१-२१

  • पाचवा कर्णा (१-११)

  • एक विपत्ती होऊन गेली, आणखी दोन येणार (१२)

  • सहावा कर्णा (१३-२१)

 पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा आकाशातून पृथ्वीवर पडलेला एक तारा मला दिसला; आणि त्याला अथांग डोहाच्या भुयाराची* किल्ली देण्यात आली. २  त्याने अथांग डोहाचे भुयार* उघडले तेव्हा एखाद्या भल्या मोठ्या भट्टीतून निघावा तसा धूर त्यातून निघाला आणि त्या धुरामुळे सूर्य आणि हवासुद्धा काळवंडली. ३  आणि धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि त्यांना शक्‍ती देण्यात आली; पृथ्वीवरील विंचवांकडे आहे तशी शक्‍ती त्यांना देण्यात आली. ४  त्यांनी पृथ्वीवरील वनस्पतीला किंवा कोणत्याही हिरव्या रोपाला किंवा कोणत्याही झाडाला नुकसान पोचवू नये, तर ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही केवळ अशांना हानी करावी, अशी आज्ञा त्यांना देण्यात आली. ५  आणि त्या टोळांना जिवे मारण्याचा नाही, तर लोकांना पाच महिने यातना देण्याचा अधिकार देण्यात आला; एखाद्या विंचवाने मनुष्याला दंश केल्यावर जशा यातना होतात तशा त्या यातना होत्या. ६  त्या दिवसांत लोक मृत्यूचा मार्ग शोधतील, पण त्यांना तो मुळीच सापडणार नाही; आणि ते मरणासाठी आसुसतील, पण मरण त्यांच्यापासून दूर पळेल. ७  टोळांचे स्वरूप, युद्धासाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काहीतरी होते आणि त्यांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्‍यांसारखे होते; ८  पण, त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारखे होते; ९  त्यांचे कवच* लोखंडी कवचांसारखे होते आणि त्यांच्या पंखांचा आवाज, युद्धात वेगाने धावणाऱ्‍या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. १०  तसेच, त्यांना शेपट्या आणि विंचवांसारख्या नांग्या होत्या; लोकांना पाच महिने यातना देण्याची शक्‍ती त्यांच्या शेपट्यांमध्ये होती. ११  अथांग डोहाचा देवदूत हा त्यांचा राजा आहे. इब्री भाषेत त्याचे नाव अबद्दोन,* तर ग्रीक भाषेत अपुल्लोन* असे आहे. १२  पहिली विपत्ती होऊन गेली आहे. पाहा! या गोष्टी घडून गेल्यानंतर आणखी दोन विपत्ती येत आहेत. १३  सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीच्या शिंगांतून मला एक आवाज ऐकू आला. १४  तो कर्णा घेतलेल्या सहाव्या देवदूताला म्हणाला: “महान फरात नदीजवळ बांधून ठेवलेल्या चार देवदूतांना मोकळे कर.” १५  तेव्हा, एकतृतीयांश लोकांना ठार मारण्याकरता ज्या चार देवदूतांना त्या तासासाठी, दिवसासाठी, महिन्यासाठी आणि वर्षासाठी तयार करण्यात आले होते, त्यांना मोकळे करण्यात आले. १६  घोडेस्वारांच्या सैन्याची संख्या वीस कोटी होती; मी त्यांची ही संख्या ऐकली. १७  दृष्टान्तात मला दिसलेले घोडे व त्यांवरील स्वार असे दिसत होते: त्यांचे कवच धगधगत्या आगीसारखे लाल, गडद निळे आणि गंधकासारखे पिवळे होते; आणि घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी असून त्यांच्या तोंडांतून आग, धूर आणि गंधक बाहेर निघाले. १८  या तीन पीडांमुळे, म्हणजे त्यांच्या तोंडांतून निघणारी आग, धूर आणि गंधक यांमुळे एकतृतीयांश लोक ठार मारले गेले. १९  घोड्यांची शक्‍ती ही त्यांच्या तोंडांत व शेपट्यांमध्ये आहे; कारण त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांना डोकी आहेत आणि यांच्या साहाय्याने ते इजा करतात. २०  पण, जे बाकीचे लोक या पीडांमुळे मारले गेले नाहीत, त्यांनी आपल्या कार्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही; त्यांनी दुरात्म्यांची आणि ज्यांना पाहता, ऐकता किंवा चालता येत नाही अशा सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची उपासना करण्याचे सोडले नाही. २१  तसेच, त्यांनी केलेले खून, भूतविद्या, अनैतिक लैंगिक कृत्ये* व चोरी यांबद्दल त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.

तळटीपा

किंवा “खड्ड्याची.”
किंवा “खड्डा.”
छातीचे संरक्षण करणारे साधन. किंवा “उरस्त्राण.”
म्हणजे “विनाश.”
म्हणजे “विनाशक.”
ग्रीक पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.