प्रेषितांची कार्ये १४:१-२८
१४ इकुन्याला आल्यावर ते यहुद्यांच्या सभास्थानात गेले आणि तिथे ते इतक्या प्रभावशाली पद्धतीने बोलले, की पुष्कळ यहुदी व ग्रीक लोकांनी विश्वासाचा स्वीकार केला.
२ पण विश्वास न ठेवलेल्या यहुद्यांनी विदेशी लोकांना भडकवले आणि बांधवांविरुद्ध त्यांची मने दूषित केली.
३ म्हणून ते बराच काळ तिथे राहिले आणि यहोवाने* दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने त्याच्या अपार कृपेचा संदेश सांगत राहिले. आणि देवाने त्यांच्या हातून अनेक चिन्हे व चमत्कार घडवून आणण्याद्वारे, हा संदेश खरा असल्याची साक्ष दिली.
४ पण शहरातल्या लोकांमध्ये फूट पडली होती; काहींनी यहुद्यांची बाजू घेतली तर काहींनी प्रेषितांची.
५ विदेशी लोकांसोबत यहुदी लोक व त्यांच्या अधिकाऱ्यांनी मिळून त्यांचा छळ करण्याचे व त्यांना दगडमार करण्याचे ठरवले,
६ तेव्हा त्यांना याची खबर मिळाली आणि त्यामुळे ते तिथून पळ काढून, लुकवनियाच्या लुस्त्र आणि दर्बे शहरांकडे व त्यांच्या आसपासच्या गावांकडे निघून गेले.
७ तिथे गेल्यावर ते आनंदाचा संदेश सांगत राहिले.
८ लुस्त्र इथे एक लंगडा माणूस बसलेला होता. तो जन्मापासूनच पांगळा होता आणि कधीच चालला-फिरला नव्हता.
९ पौल बोलत असताना हा माणूस ऐकत होता. तेव्हा पौलने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि आपण बरे होऊ, असा त्या माणसाला विश्वास असल्याचे त्याच्या लक्षात आले.
१० म्हणून तो त्याला मोठ्याने म्हणाला: “आपल्या पायांवर उभा राहा.” तेव्हा तो माणूस लगेच उठून उभा राहिला आणि चालू लागला.
११ पौलने केलेले हे कार्य लोकांनी पाहिले, तेव्हा ते लुकवनिया भाषेत ओरडून म्हणाले: “देव माणसांचं रूप घेऊन खाली आपल्याकडे आले आहेत!”
१२ ते बर्णबाला झ्यूस देवता, तर पौलला हर्मेस देवता म्हणू लागले; कारण लोकांशी बोलण्यात पौलच पुढाकार घेत होता.
१३ शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झ्यूस देवतेच्या मंदिरातला पुजारी, लोकांसोबत मिळून बलिदाने करण्याच्या इच्छेने, बैल व फुलांचे हार* घेऊन फाटकांजवळ आला.
१४ पण, प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले आणि गर्दीत धावत जाऊन मोठ्याने ओरडून म्हणाले:
१५ “लोकांनो, तुम्ही हे सर्व का करत आहात? आम्हीही तुमच्यासारख्याच दुर्बलता असलेली माणसं आहोत. आणि तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतल्या सर्व गोष्टी बनवल्या त्या जिवंत देवाकडे वळावं, म्हणून आम्ही तुम्हाला एक आनंदाचा संदेश सांगत आहोत.
१६ पूर्वीच्या काळात देवाने सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालत राहण्याची परवानगी दिली होती.
१७ अर्थात, त्याने स्वतःविषयी साक्ष देण्याचे सोडले नाही. उलट, आकाशातून पाऊस व फलदायी ऋतू देऊन, अन्नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मने आनंदाने भरून तो तुमच्याकरता चांगल्या गोष्टी करत राहिला.”
१८ पण इतके सांगूनसुद्धा लोक ऐकायला तयार नव्हते; शेवटी, मोठ्या मुश्किलीने त्यांनी बलिदाने अर्पण करण्यापासून त्यांना थांबवले.
१९ मग अंत्युखिया व इकुन्या इथून यहुदी आले आणि त्यांनी लोकांची मने वळवली. त्यांनी पौलला दगडमार केला आणि तो मेला आहे, असे समजून त्याला फरफटत शहराबाहेर नेले.
२० पण शिष्य येऊन त्याच्याभोवती जमले, तेव्हा तो उठला आणि शहरात गेला. दुसऱ्या दिवशी तो बर्णबासोबत दर्बेला गेला.
२१ त्या शहरात आनंदाचा संदेश घोषित केल्यावर आणि पुष्कळ शिष्य केल्यावर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखियाला परतले.
२२ तिथे त्यांनी शिष्यांना* धीर दिला आणि त्यांना विश्वासात टिकून राहण्याचे प्रोत्साहन दिले व म्हटले: “आपल्याला अनेक संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”
२३ शिवाय, त्यांनी प्रत्येक मंडळीत त्यांच्यासाठी वडील नियुक्त केले, उपवास व प्रार्थना केली आणि त्यांना यहोवाच्या,* म्हणजे ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्या हाती सोपवून दिले.
२४ मग ते पिसिदियातून पंफुल्याला आले,
२५ आणि पिर्गा इथे वचन घोषित केल्यानंतर ते खाली अत्तलियाला गेले.
२६ तिथून ते जहाजाने अंत्युखियाला निघून गेले. याच शहरात देवाने त्याच्या अपार कृपेने त्यांच्यावर आपले कार्य सोपवले होते. ते कार्य आता त्यांनी पूर्ण केले होते.
२७ तिथे येऊन मंडळीला एकत्र केल्यानंतर त्यांनी देवाने आपल्याद्वारे केलेल्या अनेक गोष्टींबद्दल आणि कशा प्रकारे त्याने विदेश्यांकरताही विश्वासाचे दार उघडले होते, याबद्दल त्यांना सांगितले.
२८ मग ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.