प्रेषितांची कार्ये १७:१-३४

  • थेस्सलनीकामध्ये पौल आणि सीला (१-९)

  • बिरुयामध्ये पौल आणि सीला (१०-१५)

  • अथेन्समध्ये पौल (१६-२२क)

  • अरियपग इथे पौलचे भाषण (२२ख-३४)

१७  नंतर, ते अंफिपुली व अपुल्लोनियातून प्रवास करत थेस्सलनीका इथे आले. तिथे यहुद्यांचे एक सभास्थान होते. २  त्यामुळे, पौल आपल्या रिवाजाप्रमाणे त्यांच्या सभास्थानात गेला आणि तीन शब्बाथ तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला. ३  आणि ख्रिस्ताने दुःख सोसणे व मेलेल्यांतून उठणे आवश्‍यक होते, हे त्याने शास्त्रवचनांच्या आधारे स्पष्ट करून त्यांना पटवून दिले व म्हटले: “ज्या येशूविषयी मी तुम्हाला सांगत आहे, तोच हा ख्रिस्त आहे.” ४  याचा परिणाम असा झाला, की त्यांच्यापैकी काही जणांनी विश्‍वास स्वीकारला आणि ते पौल व सीला यांना येऊन मिळाले; शिवाय, देवाची उपासना करणाऱ्‍या ग्रीक लोकांच्या एका मोठ्या समुदायाने व बऱ्‍याच प्रतिष्ठित स्त्रियांनीही तसेच केले. ५  हे पाहून यहुद्यांचा जळफळाट झाला आणि त्यांनी बाजारातल्या काही रिकामटेकड्या गुंडांना जमा करून, शहरात खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यासोनच्या घरावर हल्ला केला आणि पौल व सीला यांना बाहेर जमावापुढे आणण्याची ते मागणी करू लागले. ६  पण, त्यांना ते सापडले नाहीत तेव्हा त्यांनी यासोनला व काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्‍यांपुढे आणले. ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले: “ज्या माणसांनी सगळ्या जगात उलथापालथ केली* आहे, ते आता इथंही पोचले आहेत; ७  आणि यासोनने त्यांना आपल्या घरात पाहुणे म्हणून ठेवलं आहे. ही सर्व माणसं, ‘येशू नावाचा दुसराच कोणी राजा आहे असं म्हणून’ कैसराच्या* हुकमांचं उल्लंघन करत आहेत.” ८  लोकांनी व शहराच्या अधिकाऱ्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते घाबरले. ९  आणि यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यावर त्यांनी त्यांना सोडून दिले. १०  मग, बांधवांनी रातोरात पौल आणि सीला यांना बिरुयाला पाठवून दिले. तिथे आल्यावर ते यहुद्यांच्या सभास्थानात गेले. ११  बिरुयाचे लोक थेस्सलनीकाच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, कारण त्यांनी अतिशय उत्सुकतेने देवाचे वचन स्वीकारले. शिवाय, आपण ऐकत असलेल्या गोष्टी तशाच आहेत की नाही, याची खातरी करण्यासाठी ते दररोज शास्त्रवचनांचे काळजीपूर्वक परीक्षण करायचे. १२  त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी प्रभूवर विश्‍वास ठेवला. आणि बऱ्‍याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्री-पुरुषांनीसुद्धा असेच केले. १३  पण, पौल बिरुयातही देवाच्या वचनाची घोषणा करत असल्याचे थेस्सलनीकातील यहुद्यांना समजले, तेव्हा लोकांना भडकवण्यासाठी व खळबळ माजवण्यासाठी ते तिथे आले. १४  त्यामुळे, बांधवांनी पौलला लगेच समुद्राकडे पाठवून दिले; पण, सीला व तीमथ्य तिथेच राहिले. १५  पौलसोबत आलेल्या बांधवांनी त्याला अथेन्सपर्यंत आणले; मग, ते तेथून निघाले तेव्हा पौलने त्यांना सीला व तीमथ्य यांना लवकरात लवकर आपल्याकडे पाठवून द्यायला सांगितले. १६  अथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते संपूर्ण शहर मूर्तींनी भरलेले आहे हे पाहून पौलला चीड आली. १७  त्यामुळे, सभास्थानात यहुद्यांशी व देवाची उपासना करणाऱ्‍या इतर लोकांशी; तसेच, बाजारात त्याला दररोज जे कोणी भेटायचे त्यांच्याशी तो शास्त्रवचनांतून तर्क करू लागला. १८  पण, एपिकूर व स्तोयिक पंथातील काही तत्त्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले व म्हणू लागले: “या वटवट्याला नेमकं काय म्हणायचंय?” तर इतर काही जण म्हणाले: “हा कुठल्यातरी परक्या दैवतांचा प्रचारक दिसतोय.” पौल येशूविषयी व पुनरुत्थानाविषयी* आनंदाचा संदेश सांगत असल्यामुळे ते असे म्हणाले. १९  त्यामुळे, ते त्याला घेऊन गेले व अरीयपगच्या* सभेपुढे उभे करून म्हणाले: “तू सांगत असलेली ही नवीन शिकवण नक्की काय आहे? २०  कारण आम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या अशा गोष्टी तू आम्हाला सांगत आहेस; आणि या गोष्टींचा काय अर्थ होतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.” २१  खरेतर, अथेन्सचे सर्व लोक व तिथे येणारे विदेशी नेहमी काहीतरी नवीन सांगण्यात किंवा ऐकण्यात आपला वेळ घालवायचे; एवढाच त्यांचा उद्योग होता. २२  मग, पौल अरीयपगच्या मध्ये उभा राहून म्हणाला: “अथेन्सच्या माणसांनो, तुम्ही सर्व बाबतींत देवीदेवतांचं इतरांपेक्षा अधिक भय मानता,* असं माझ्या पाहण्यात आलं आहे. २३  उदाहरणार्थ, शहरात फिरत असताना आणि तुमच्या पूज्यवस्तूंचं काळजीपूर्वक निरीक्षण करताना मला अशीही एक वेदी दिसली जिच्यावर ‘एका अज्ञात देवाला,’ असं लिहिलं होतं. म्हणून, तुम्ही न जाणता ज्याची उपासना करत आहात त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. २४  ज्या देवाने हे जग आणि त्यातल्या सर्व गोष्टी बनवल्या, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असल्यामुळे हातांनी बनवलेल्या मंदिरांत राहत नाही; २५  तसंच, माणसांच्या हातच्या सेवेची त्याला गरज आहे, असंही नाही; कारण त्याला तर कशाचीच कमी नाही. उलट, तोच सर्वांना जीवन, श्‍वास आणि इतर सर्व गोष्टी देतो. २६  त्याने एका माणसाद्वारे सर्व राष्ट्रे बनवली, यासाठी की त्यांनी सबंध पृथ्वीच्या पाठीवर राहावं; तसंच, त्याने अनेक गोष्टींचे समय नियुक्‍त केले आणि मानव कुठे राहतील याच्या सीमा ठरवल्या, २७  म्हणजे, त्यांनी देवाचा शोध घ्यावा आणि चाचपडत चाचपडत शेवटी त्याला प्राप्त करून घ्यावं. मुळात, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. २८  कारण त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत व चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. खरंतर, तुमच्यापैकी काही कवींनीसुद्धा म्हटलं आहे, की ‘आपण सर्व त्याची मुलं आहोत.’ २९  तर मग, आपण देवाची मुलं असल्यामुळे कधीही असा विचार करू नये, की देव सोने, चांदी किंवा दगड यांसारख्या, किंवा मानवांनी आपल्या कलाकौशल्याने घडवलेल्या एखाद्या वस्तूसारखा आहे. ३०  पूर्वी लोक अज्ञानामुळे असं वागले, पण देवाने त्या काळाकडे दुर्लक्ष केलं आहे. आता तो सर्व लोकांना सांगत आहे, की त्यांनी पश्‍चात्ताप करावा. ३१  कारण त्याने एक दिवस निश्‍चित केला आहे, आणि त्या दिवशी आपण नियुक्‍त केलेल्या एका मनुष्याद्वारे सबंध जगाचा नीतिमत्त्वाने न्यायनिवाडा करण्याचा संकल्प केला आहे; आणि त्याला मेलेल्यांतून उठवून त्याने सर्व लोकांना या गोष्टीची खातरी दिली आहे.” ३२  मेलेल्यांतून उठवण्याविषयी ऐकताच त्यांच्यापैकी काही जण त्याची थट्टा करू लागले, तर इतर जण म्हणाले: “आम्ही याविषयी तुझ्याकडून नंतर कधीतरी ऐकू.” ३३  त्यामुळे पौल तिथून निघून गेला. ३४  पण, त्यांच्यापैकी काही माणसांनी विश्‍वास ठेवला आणि ते त्याला येऊन मिळाले. त्यांच्यात, अरीयपगच्या न्यायालयात न्यायाधीश असलेला दिओनुस्य व दामारी नावाची एक स्त्री, तसेच इतर जणही होते.

तळटीपा

किंवा “खळबळ माजवली.”
किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “इतरांपेक्षा धार्मिक वृत्तीचे आहात.”