प्रेषितांची कार्ये २०:१-३८

  • मासेदोनिया व ग्रीसमध्ये पौल (१-६)

  • त्रोवसमध्ये युतुखचे पुनरुत्थान (७-१२)

  • त्रोवसहून मिलेताला (१३-१६)

  • पौल इफिसच्या वडिलांची भेट घेतो (१७-३८)

    • घरोघरी जाऊन शिकवणे (२०)

    • “देण्यात जास्त आनंद” (३५)

२०  गोंधळ शांत झाल्यावर पौलने शिष्यांना बोलावून त्यांना प्रोत्साहन दिले. मग त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जायला निघाला. २  त्या प्रदेशांतून जाताना त्याने तिथल्या शिष्यांना बऱ्‍याच गोष्टी सांगून प्रोत्साहन दिले. मग, तो ग्रीसला आला. ३  तिथे तो तीन महिने राहिला. पण, तो जहाजाने सूरियाला जाणार असताना यहुद्यांनी त्याच्याविरुद्ध कट केल्यामुळे त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा विचार केला. ४  त्याच्यासोबत, बिरुया शहराचा पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीकाचे अरिस्तार्ख व सकूंद, दर्बेचा गायस तसेच तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हेदेखील होते. ५  ही माणसे पुढे जाऊन त्रोवस इथे आमची वाट पाहत होती; ६  पण बेखमीर भाकरींच्या सणानंतर, आम्ही फिलिप्पैहून समुद्रमार्गाने निघालो आणि पाच दिवसांत त्रोवसला त्यांच्याकडे आलो. तिथे आम्ही सात दिवस राहिलो. ७  आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही जेवायला एकत्र आलो. दुसऱ्‍या दिवशी पौल जाणार असल्यामुळे, तो जमलेल्या लोकांना उपदेश करू लागला. त्याचे भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबले. ८  त्यामुळे, ज्या माडीवरच्या खोलीत आम्ही जमलो होतो तिथे बरेच दिवे होते. ९  पौल बोलत असताना, खिडकीत बसलेल्या युतुख नावाच्या एका तरुणाला गाढ झोप लागली आणि तो तिसऱ्‍या मजल्यावरून* खाली पडला. त्याला उचलण्यात आले तेव्हा तो मेला होता. १०  पण, पौल खाली गेला आणि त्याने वाकून त्याला मिठी मारली आणि बांधवांना म्हणाला: “गोंधळ घालू नका, कारण आता तो जिवंत आहे.”* ११  मग, वर जाऊन जेवणाला सुरुवात केल्यावर* तो जेवला आणि बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याशी बोलत राहिला व त्यानंतर तिथून निघाला. १२  मग, त्यांनी त्या मुलाला परत नेले आणि तो जिवंत झाल्यामुळे त्यांना अतिशय सांत्वन मिळाले. १३  त्यानंतर, आम्ही पुढे जहाजाने अस्साला जायला निघालो. पौलने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे त्याला आमच्यासोबत जहाजात घेणार होतो. पण, तिथपर्यंत तो स्वतः पायीच येणार होता. १४  अस्सामध्ये तो आम्हाला भेटला, तेव्हा आम्ही त्याला आमच्यासोबत जहाजात घेतले आणि मितुलेना या ठिकाणी गेलो. १५  मग, दुसऱ्‍या दिवशी तिथून जहाजाने निघून आम्ही खिया बेटासमोर आलो; पण, त्यानंतरच्या दिवशी सामा बंदरावर काही वेळ थांबल्यावर दुसऱ्‍या दिवशी आम्ही मिलेताला पोचलो. १६  आशिया प्रांतात थांबायचे नसल्यामुळे, पौलने इफिसमध्ये मुक्काम न करता प्रवास पुढे चालू ठेवायचे ठरवले होते. शक्यतो, पेन्टेकॉस्टच्या सणापर्यंत यरुशलेमला पोहचता यावे म्हणून तो तिथे जायची घाई करत होता. १७  पण, मिलेताहून त्याने इफिसला निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. १८  ते आल्यावर तो त्यांना म्हणाला: “मी आशिया प्रांतात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून तुमच्यामध्ये कसा राहिलो हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. १९  आणि यहुद्यांच्या कटांमुळे ओढवलेल्या परीक्षांना तोंड देत व अश्रू गाळत मी अतिशय नम्रपणे प्रभूची सेवा केली. २०  शिवाय, तुमच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगण्यापासून किंवा जाहीरपणे व घरोघरी शिकवण्यापासून मी माघार घेतली नाही. २१  पण, पश्‍चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी व आपल्या प्रभू येशूवर विश्‍वास ठेवण्याविषयी मी यहुदी आणि ग्रीक लोकांनासुद्धा अगदी पूर्णपणे साक्ष दिली. २२  आणि आता पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार,* मी यरुशलेमला जात आहे. तिथे गेल्यावर माझं काय होईल हे मला माहीत नाही. २३  मला इतकंच माहीत आहे, की तुरुंगवास आणि संकटं माझी वाट पाहत असल्याची साक्ष, पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात देत आहे. २४  तरीसुद्धा, मी स्वतःच्या जिवाची जराही किंमत करत नाही. माझी फक्‍त इतकीच इच्छा आहे, की मी माझी धाव पूर्ण करावी; तसंच, मला प्रभू येशूकडून मिळालेलं सेवाकार्य मी पार पाडावं, म्हणजेच देवाच्या अपार कृपेविषयी असलेल्या आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष द्यावी. २५  आणि आता पाहा! तुमच्यामध्ये मी ज्यांना राज्याचा प्रचार केला त्यांपैकी कोणीही मला पुन्हा पाहणार नाही, हे मला माहीत आहे. २६  म्हणून, आजच्या दिवशी मी तुम्हाला साक्षी मानून सांगतो, की मी सर्व लोकांच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे, २७  कारण देवाच्या संपूर्ण इच्छेविषयी* तुम्हाला सांगण्यापासून मी माघार घेतली नाही. २८  स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या; कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला त्यांच्यावर देखरेख करणारे म्हणून नेमलं आहे, यासाठी की देवाने स्वतःच्या पुत्राच्या रक्‍ताने विकत घेतलेल्या मंडळीचं तुम्ही पालन करावं. २९  मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत. ३०  तुमच्यामधूनच काही माणसे उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील. ३१  म्हणून सावध राहा, आणि हे विसरू नका, की तीन वर्षं रात्रंदिवस अश्रू गाळत, मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सल्ला देण्याचं सोडलं नाही. ३२  आणि आता मी तुम्हाला देवाच्या आणि त्याच्या अपार कृपेच्या वचनाच्या स्वाधीन करतो; हे वचन तुम्हाला बळ देण्यास आणि सर्व पवित्र जनांना मिळणारा वारसा प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. ३३  मी कोणाच्याही चांदीचा, सोन्याचा किंवा कपड्यालत्त्याचा लोभ धरला नाही. ३४  स्वतःच्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्यासाठी मी माझ्या या हातांनी कष्ट केले, हे तुम्हाला माहीत आहे. ३५  मी तुम्हाला सर्व बाबतींत दाखवून दिलं आहे, की तुम्हीही अशा प्रकारे कष्ट करून दुर्बलांना मदत करावी आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावे की, ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’” ३६  या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्यावर त्याने त्या सर्वांसोबत गुडघे टेकून प्रार्थना केली. ३७  तेव्हा, ते सर्व खूप रडू लागले आणि पौलच्या गळ्यात पडून प्रेमाने त्याचे मुके घेऊ लागले, ३८  कारण, तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही, असे जे त्याने म्हटले, ते ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले होते. मग, त्यांनी त्याला जहाजापर्यंत नेऊन सोडले.

तळटीपा

इथे तळमजल्याला पहिला मजला म्हणून मोजण्यात आले आहे.
किंवा “याचा जीव याच्यामध्ये आहे.”
शब्दशः “भाकर मोडल्यावर.”
शब्दशः “आत्म्यात बांधला जाऊन.”
किंवा “संकल्पाविषयी.”