प्रेषितांची कार्ये २१:१-४०
२१ जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतल्यावर आम्ही समुद्रमार्गाने निघालो. आमचे जहाज वेगाने निघाले व कोस या ठिकाणी पोचले. मग, दुसऱ्या दिवशी आम्ही रुदा इथे आलो आणि तिथून पातरा या ठिकाणी गेलो.
२ तिथे फेनिकेला जाणारे एक जहाज आम्हाला आढळले तेव्हा आम्ही त्यात बसून पुढे निघालो.
३ मग, डावीकडे* कुप्र बेट दिसले, तेव्हा आम्ही ते मागे टाकून पुढे सूरियाच्या दिशेने गेलो व सोर इथे उतरलो, कारण तिथे जहाजातील माल उतरवला जाणार होता.
४ तिथे आम्ही शिष्यांचा शोध घेतला आणि ते भेटल्यावर सात दिवस तिथेच राहिलो. पण, पवित्र आत्म्याने सूचना दिल्यामुळे, पौलने यरुशलेममध्ये पाऊल ठेवू नये, असे शिष्यांनी वारंवार सांगितले.
५ तिथल्या मुक्कामाचे दिवस संपल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तेव्हा सर्व बांधव, स्त्रिया व मुले आम्हाला शहराबाहेर पोचवायला आली. मग, आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गुडघे टेकून प्रार्थना केली,
६ आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही जहाजात चढलो आणि ते सर्व आपल्या घरी गेले.
७ मग, सोरपासूनचा आमचा समुद्रप्रवास संपवून आम्ही पतलमैस या ठिकाणी आलो. तिथल्या बांधवांना भेटून आम्ही एक दिवस त्यांच्याकडे राहिलो.
८ दुसऱ्या दिवशी तिथून निघून आम्ही कैसरीयाला पोचलो, आणि प्रचारक फिलिप्प, जो निवडलेल्या सात पुरुषांपैकी एक होता, त्याच्या घरी जाऊन राहिलो.
९ या मनुष्याला चार अविवाहित मुली* असून त्या भविष्यवाणी करायच्या.
१० पण, आम्ही तिथे बरेच दिवस राहिल्यानंतर, यहूदीयाहून अगब नावाचा एक संदेष्टा आला.
११ आमच्याकडे येऊन त्याने पौलच्या कमरेचा पट्टा घेतला आणि आपले हातपाय बांधून म्हणाला: “पवित्र आत्मा म्हणतो: ‘हा पट्टा ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेमचे यहुदी अशाच प्रकारे बांधून विदेशी लोकांच्या हवाली करतील.’”
१२ हे ऐकल्यावर आम्हीच नाही, तर तिथे असलेले इतर जणही, पौलला वर यरुशलेमला न जाण्याची विनंती करू लागले.
१३ तेव्हा, पौल म्हणाला: “तुम्ही असे रडून माझा निश्चय मोडण्याचा* प्रयत्न का करता? मी तर, प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये फक्त बंधनात जायलाच नाही, तर मरायलाही तयार आहे.”
१४ तो आपला विचार बदलायला तयार नाही, हे पाहून आम्ही त्याला अडवण्याचे सोडून दिले* आणि म्हटले: “यहोवाच्या* इच्छेप्रमाणे घडो.”
१५ त्यानंतर, आम्ही प्रवासाची तयारी केली आणि यरुशलेमला जायला निघालो.
१६ कैसरीयाचे काही शिष्यसुद्धा आमच्यासोबत होते. त्यांनी आम्हाला, सुरुवातीच्या शिष्यांपैकी असलेल्या कुप्रच्या मनासोनकडे नेले, कारण आम्ही त्याच्याच घरी उतरणार होतो.
१७ यरुशलेमला पोचल्यावर बांधवांनी आमचे आनंदाने स्वागत केले.
१८ मग, दुसऱ्या दिवशी पौलने याकोबची भेट घेतली; त्याने आम्हालाही सोबत नेले होते. शिवाय, त्या ठिकाणी सर्व वडीलसुद्धा उपस्थित होते.
१९ त्यांची भेट झाल्यावर, पौलने विदेशी लोकांमध्ये त्याच्या सेवाकार्याद्वारे देवाने ज्या गोष्टी घडवून आणल्या होत्या, त्यांविषयी त्यांना सविस्तर सांगितले.
२० हे ऐकल्यावर ते देवाची स्तुती करू लागले, पण ते त्याला म्हणाले: “बंधू, यहुद्यांमध्ये विश्वास ठेवणारे हजारो लोक असून, ते सर्व नियमशास्त्राविषयी आवेशी आहेत, हे तर तुला माहीतच आहे.
२१ पण, त्यांनी तुझ्याविषयी अशा अफवा ऐकल्या आहेत, की तू सर्व राष्ट्रांतल्या यहुद्यांना मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध जाण्याची* शिकवण देत आहेस; आणि त्यांनी आपल्या मुलांची सुंता करू नये व नेमून दिलेल्या प्रथा पाळू नयेत, असं शिकवत आहेस.
२२ तर आता काय करावं? कारण तू इथे आल्याचं त्यांना नक्कीच कळेल.
२३ म्हणून आम्ही सांगतो तसं कर: आमच्यात चार माणसं आहेत, ज्यांनी नवस केला आहे.
२४ तर आता, या माणसांना सोबत घेऊन जा आणि स्वतःचं व त्यांचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घे. आणि त्यांना मुंडण करता यावं म्हणून त्यांचा खर्च उचल. म्हणजे, तुझ्याविषयी ऐकलेल्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही आणि तू उचितपणे वागतोस व नियमशास्त्राचंही पालन करतोस, हे सर्वांना समजेल.
२५ आणि विदेश्यांपैकी जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्याविषयी बोलायचं, तर आम्ही त्यांना आपला निर्णय लिहून कळवला आहे; तो असा, की मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी,* आणि अनैतिक लैंगिक कृत्ये* यांपासून त्यांनी दूर राहावं.”
२६ दुसऱ्या दिवशी पौल त्या माणसांना घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत त्याने स्वतःचे विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घेतले. मग, विधीपूर्वक शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील आणि त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण केव्हा देण्यात यावे, हे सांगण्यासाठी तो मंदिरात गेला.
२७ मग ते सात दिवस संपत आले, तेव्हा आशियातून आलेल्या यहुद्यांनी पौलला मंदिरात पाहताच, तिथे जमलेल्या सर्व लोकांना भडकवले व त्यांनी त्याला धरले.
२८ ते मोठ्याने ओरडू लागले: “इस्राएलच्या लोकांनो, आमची मदत करा! हाच तो माणूस आहे, जो सगळीकडे जाऊन आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमशास्त्राविरुद्ध आणि या जागेविरुद्ध सर्वांना शिकवतो. इतकंच काय, तर त्याने ग्रीक लोकांना मंदिरात आणून हे पवित्रस्थान दूषित केलं आहे.”
२९ ते असे म्हणाले, कारण त्यांनी आधी इफिसच्या त्रफिमला पौलसोबत शहरात पाहिले होते, आणि त्यांना वाटले की पौलने त्याला मंदिरात आणले असावे.
३० यावरून सबंध शहरात गोंधळ माजला आणि सर्व लोकांनी धावत जाऊन पौलला धरले आणि त्याला मंदिराबाहेर ओढत नेले, आणि लगेच दरवाजे बंद झाले.
३१ ते त्याला ठार मारण्याच्या प्रयत्नात असताना, सैन्याच्या तुकडीच्या सेनापतीला ही बातमी समजली, की सबंध यरुशलेम शहरात खळबळ माजली आहे.
३२ तो लगेच, आपल्या सैनिकांना आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन खाली त्यांच्याकडे धावत गेला. त्यांनी सेनापतीला व सैनिकांना येताना पाहिले, तेव्हा त्यांनी पौलला मारायचे थांबवले.
३३ मग, सेनापतीने येऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याला दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम दिला. त्यानंतर, हा माणूस कोण आहे आणि त्याने काय केले याची तो चौकशी करू लागला.
३४ पण, लोकांमधून कोणी काही, तर कोणी काही ओरडत होते. या गोंधळामुळे, त्याला काहीही स्पष्टपणे कळत नसल्यामुळे त्याने पौलला सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी आणण्याचा हुकूम दिला.
३५ पण, पौल जिन्याजवळ पोचला तेव्हा लोकांचा जमाव इतका हिंसक झाला, की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.
३६ लोक “त्याला मारून टाका!” असे ओरडत त्यांच्या मागेमागे येत होते.
३७ सैनिक त्याला घेऊन आपल्या राहण्याच्या ठिकाणी पोचणार, इतक्यात पौल सेनापतीला म्हणाला: “मी काही बोलू का?” तो त्याला म्हणाला: “तुला ग्रीक बोलता येतं?
३८ मग, ज्याने मागे बंड पुकारून चार हजार मारेकऱ्यांना ओसाड प्रदेशात नेलं होतं, तो मिसरी तू नाहीस का?”
३९ तेव्हा पौल म्हणाला: “मी तर एका महत्त्वाच्या शहराचा, किलिकियातील तार्सचा राहणारा यहुदी आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला लोकांशी बोलण्याची परवानगी द्या.”
४० त्याने परवानगी दिल्यावर पौलने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने इशारा केला. मग, सगळीकडे शांतता पसरली तेव्हा तो इब्री भाषेत त्यांच्याशी बोलू लागला, व म्हणाला:
तळटीपा
^ किंवा “बंदर होते त्या दिशेला.”
^ शब्दशः “कुमारी.”
^ किंवा “माझं मन खचवण्याचा.”
^ शब्दशः “आम्ही शांत राहिलो.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “धर्मत्यागाची.”
^ किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्त नीट वाहू दिलं जात नाही.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.