प्रेषितांची कार्ये २३:१-३५

  • पौल न्यायसभेपुढे बोलतो (१-१०)

  • प्रभू पौलला बळ देतो (११)

  • पौलला ठार मारण्याचा कट (१२-२२)

  • पौलला कैसरीयाला नेले जाते (२३-३५)

२३  मग, पौलने न्यायसभेकडे* रोखून पाहिले आणि म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी आजपर्यंत देवासमोर अगदी शुद्ध विवेकाने वागलो आहे.” २  हे ऐकून, महायाजक हनन्या याने जवळ उभ्या असलेल्यांना पौलच्या थोबाडीत मारण्याची आज्ञा दिली. ३  तेव्हा, पौल त्याला म्हणाला: “अरे चुना लावलेल्या भिंती! देव तुला मार देईल. तू नियमशास्त्रानुसार माझा न्याय करायला बसला आहेस आणि स्वतःच नियमशास्त्राविरुद्ध जाऊन मला मारण्याची आज्ञा देतोस का?” ४  हे ऐकून जवळ उभे असलेले त्याला म्हणाले: “तू देवाच्या महायाजकाचा अपमान करतोस?” ५  त्यावर पौल म्हणाला: “बांधवांनो, हा महायाजक आहे हे मला माहीत नव्हतं. कारण असं लिहिलं आहे, की ‘तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्‍याविषयी वाईट बोलू नको.’” ६  त्यांच्यापैकी काही जण सदूकी, तर काही परूशी आहेत हे माहीत असल्यामुळे पौल न्यायसभेत मोठ्याने म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी एक परूशी व परूश्‍यांचा मुलगा आहे. आणि मृतांच्या पुनरुत्थानाविषयी* बाळगत असलेल्या आशेवरून माझी न्यायचौकशी केली जात आहे.” ७  हे ऐकताच, परूशी आणि सदूकी यांच्यात वादविवाद सुरू झाला व न्यायसभेत फूट पडली. ८  कारण मृतांचे पुनरुत्थान, देवदूत किंवा आत्मिक प्राणी असे काहीच नसते, असे सदूकी म्हणतात, तर परूशी लोक या सर्व गोष्टी मानतात.* ९  यामुळे बरीच खळबळ माजली, आणि परूश्‍यांच्या पक्षाचे काही शास्त्री उठून तावातावाने म्हणू लागले: “या माणसात आम्हाला काहीच दोष सापडत नाही, पण एखादा आत्मिक प्राणी किंवा देवदूत त्याच्याशी बोलला असेल तर . . .” १०  भांडण इतके पेटले, की आता ते पौलचा जीव घेतील* अशी सेनापतीला भीती वाटली. तेव्हा, त्याने सैनिकांना खाली जाऊन त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून, सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी आणण्याचा हुकूम दिला. ११  पण, त्या रात्री प्रभू त्याच्याजवळ उभा राहून त्याला म्हणाला: “हिंमत धर! कारण माझ्याविषयी तू जशी यरुशलेममध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेस, तशीच तुला रोममध्येसुद्धा द्यावी लागेल.” १२  दिवस उजाडला तेव्हा यहुद्यांनी एक कट रचून अशी शपथ घेतली,* की जोपर्यंत आपण पौलला ठार मारत नाही, तोपर्यंत आपण काहीही खाणार किंवा पिणार नाही. १३  अशी शपथ घेणारी चाळीसपेक्षा अधिक माणसे होती. १४  ते मुख्य याजकांकडे व वडील जनांकडे गेले आणि म्हणाले: “आम्ही अशी शपथ घेतली आहे, की जोपर्यंत आम्ही पौलला मारून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही खाणार नाही. १५  तर आता, तुम्ही आणि न्यायसभा मिळून सेनापतीला असं कळवा, की तुम्हाला पौलची अधिक बारकाईने चौकशी करता यावी म्हणून त्याने त्याला तुमच्याकडे घेऊन यावं. पण, तो पोचण्याआधीच आम्ही तयार राहू व त्याला ठार मारू.” १६  पण, पौलला मारण्यासाठी ते दबा धरून बसणार असल्याची खबर त्याच्या बहिणीच्या मुलाला लागली, तेव्हा तो सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी गेला आणि त्याने ही गोष्ट पौलच्या कानावर घातली. १७  त्यामुळे पौलने, सैन्याच्या अधिकाऱ्‍यांपैकी एकाला बोलावून त्याला म्हटले: “या तरुणाला सेनापतीला काही सांगायचं आहे, तेव्हा याला त्याच्याकडे घेऊन जा.” १८  म्हणून, तो त्याला घेऊन सेनापतीकडे गेला आणि म्हणाला: “कैदी असलेल्या पौलने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे आणायला सांगितलं, कारण याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.” १९  तेव्हा, सेनापतीने त्याचा हात धरून त्याला बाजूला नेले आणि विचारले: “काय सांगायचं होतं तुला?” २०  तो म्हणाला: “यहुद्यांनी तुमच्याकडे अशी विनंती करण्याचं ठरवलं आहे, की पौलची अधिक बारकाईने चौकशी करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या न्यायसभेपुढे आणण्यात यावं. २१  पण, त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका, कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसं त्याला ठार मारण्यासाठी दबा धरून बसली आहेत; आणि त्याला मारून टाकेपर्यंत अन्‍नपाणी सेवन न करण्याची त्यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी पूर्ण तयारी केली असून फक्‍त तुमच्या परवानगीची ते वाट पाहत आहेत.” २२  त्यामुळे सेनापतीने त्या तरुणाला अशी आज्ञा देऊन पाठवून दिले की, “तू ही गोष्ट मला सांगितली आहे, हे कोणालाही सांगू नकोस.” २३  मग, त्याने सैन्यातील अधिकाऱ्‍यांपैकी दोघांना बोलावून म्हटले: “आज रात्री नऊच्या सुमारास* कैसरीयाला जाण्यासाठी दोनशे सैनिकांना, सत्तर घोडेस्वारांना आणि दोनशे भालेकऱ्‍यांना तयार करा. २४  तसंच, पौलला राज्यपाल फेलिक्सकडे सुखरूप घेऊन जाण्यासाठी घोड्यांची व्यवस्था करा.” २५  त्याने राज्यपालाला एक पत्रही लिहिले, ज्यात म्हटले होते: २६  “क्लौद्य लुसिया याच्याकडून, राज्यपाल फेलिक्स महाराजांना: नमस्कार! २७  यहुद्यांनी या माणसाला धरलं होतं आणि ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण, तो रोमी नागरिक असल्याचं समजताच मी माझ्या सैनिकांना घेऊन तिथे पोचलो आणि त्याला वाचवलं. २८  आणि यहुदी लोक त्याच्यावर दोषारोप का करत होते, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत आणलं. २९  त्यांनी त्याला त्यांच्या नियमशास्त्राच्या प्रश्‍नांवरून दोषी ठरवलं असल्याचं मला दिसून आलं; तरी, मृत्युदंड देण्यासारख्या किंवा तुरुंगात टाकण्यासारख्या कोणत्याही गोष्टीबद्दल तो दोषी नाही. ३०  पण, या माणसाला ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याची बातमी मिळाल्यामुळे मी त्याला लगेच तुमच्याकडे पाठवत आहे आणि त्याच्यावर दोषारोप करणाऱ्‍यांना मी हुकूम दिला आहे, की त्यांनी तुमच्यासमोर येऊन त्याच्यावर आरोप करावेत.” ३१  म्हणून, शिपायांना मिळालेल्या हुकमानुसार ते पौलला घेऊन रात्रीच्या वेळी अंतिपत्रिस इथे आले. ३२  दुसऱ्‍या दिवशी त्यांनी घोडेस्वारांना त्याच्यासोबत पुढे जाण्यास सांगितले; पण, ते मात्र सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी परतले. ३३  कैसरीयात पोचल्यानंतर, घोडेस्वारांनी राज्यपालाला पत्र दिले आणि पौललाही त्याच्या स्वाधीन केले. ३४  पत्र वाचून, पौल कोणत्या प्रांताचा आहे असे राज्यपालाने विचारले. तो किलिकिया प्रांताचा आहे असे समजल्यावर, ३५  तो त्याला म्हणाला: “तुझ्यावर आरोप करणारे आले, म्हणजे मी तुझी बाजू सविस्तर ऐकून घेईन.” मग, त्याने पौलला हेरोदच्या वाड्यात पहाऱ्‍याखाली ठेवण्याचा हुकूम दिला.

तळटीपा

अर्थात, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “उघडपणे घोषित करतात.”
किंवा “पौलचे फाडून तुकडे करतील.”
याचा अर्थ, ही शपथ पूर्ण न केल्यास आपल्याला शाप लागेल, असा त्यांचा विश्‍वास होता.
शब्दशः “रात्रीच्या तिसऱ्‍या तासाला.”