प्रेषितांची कार्ये २५:१-२७
२५ त्यामुळे, त्या प्रांतात येऊन कारभार हाती घेतल्यावर, तीन दिवसांनी फेस्त कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला.
२ तेव्हा, मुख्य याजकांनी आणि यहुद्यांतील प्रमुख जनांनी पौलविरुद्ध त्याच्याजवळ तक्रार केली. आणि ते फेस्तला अशी मागणी करू लागले, की
३ त्याने त्यांच्या विनंतीवरून पौलला यरुशलेमला पाठवून द्यावे. पण खरेतर, रस्त्यातच त्याला ठार मारण्यासाठी दबा धरून बसण्याचा त्यांचा कट होता.
४ पण, फेस्तने त्यांना सांगितले, की पौलला कैसरीयातच ठेवण्यात येईल आणि तो स्वतः लवकरच तिथे जात आहे.
५ “त्यामुळे, त्या माणसाने खरंच काही अपराध केला असेल, तर तुमच्यातल्या अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत येऊन त्याच्यावर तसा आरोप करावा,” असे त्याने म्हटले.
६ मग, आठदहा दिवस त्यांच्यात राहिल्यानंतर तो खाली कैसरीयाला गेला आणि दुसऱ्या दिवशी तो न्यायासनावर बसला व पौलला आपल्यासमोर आणण्याचा त्याने हुकूम दिला.
७ तो आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहुदी त्याच्या सभोवती उभे राहून त्याच्यावर अनेक गंभीर दोषारोप लावू लागले. पण, ते हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत.
८ पण, पौलने आपली बाजू मांडत म्हटले: “मी यहुद्यांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध कोणतंही पाप केलं नाही.”
९ यहुद्यांची मर्जी मिळवण्याच्या उद्देशाने फेस्त पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सर्व गोष्टींविषयी माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?”
१० पण, पौल त्याला म्हणाला: “मी कैसराच्या न्यायासनासमोर उभा आहे आणि इथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचं काहीच वाईट केलं नाही आणि ही गोष्ट तुम्हालाही चांगली माहीत आहे.
११ मी खरंच अपराधी असेन आणि मृत्युदंड मिळण्यासारखा काही अपराध केला असेल, तर मी मरण्यापासून मागे हटणार नाही; पण, ही माणसं माझ्यावर लावत असलेल्या आरोपांमध्ये जर काहीच तथ्य नसेल, तर केवळ विनंतीवरून मला त्यांच्या हवाली करण्याचा कोणत्याही माणसाला अधिकार नाही. मी कैसराकडे न्याय मागतो!”
१२ मग, जमलेल्या सल्लागारांशी बोलून फेस्त म्हणाला: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, तर तू कैसराकडे जाशील.”
१३ मग काही दिवसांनंतर अग्रिप्पा राजा आणि बर्णीका, फेस्तची भेट घेण्यासाठी कैसरीयात आले.
१४ ते तिथे बरेच दिवस राहणार असल्यामुळे फेस्तने पौलचे प्रकरण राजासमोर मांडले. त्याने म्हटले:
“फेलिक्सने कैदेत ठेवलेला एक माणूस इथे आहे.
१५ मी यरुशलेममध्ये असताना मुख्य याजकांनी व यहुद्यांच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार करून त्याला मृत्युदंड देण्याची मागणी केली.
१६ पण, मी त्यांना सांगितले, की एखाद्या माणसाला, त्याच्यावर आरोप करणाऱ्यांच्या समोरासमोर येऊन आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय, केवळ त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या हाती सोपवून देणं ही रोमन लोकांची पद्धत नाही.
१७ त्यामुळे, ते इथे आल्यावर मी जास्त वेळ न घालवता, दुसऱ्याच दिवशी न्यायासनावर बसलो आणि त्या माणसाला आत आणण्याचा हुकूम दिला.
१८ त्याच्यावर आरोप करणारे उभे राहिले, तेव्हा ज्या वाईट गोष्टींचा आरोप ते त्याच्यावर लावतील असं मला वाटलं होतं, तसं काहीही त्यांनी केलं नाही.
१९ केवळ त्यांच्या देवाच्या उपासनेवरून* आणि येशू नावाच्या कोणा मनुष्यावरून त्यांच्यात मतभेद होते; कारण तो मेला असूनही जिवंत असल्याचा दावा पौल करत होता.
२० हे प्रकरण कसं हाताळावं हे समजत नसल्यामुळे, या गोष्टींचा न्याय करण्यासाठी यरुशलेमला जाण्याची इच्छा आहे का, असं मी त्याला विचारलं.
२१ पण, महाराजांचा* निर्णय होईपर्यंत आपल्याला कैदेत ठेवावं अशी पौलने मागणी केल्यामुळे, कैसराकडे पाठवेपर्यंत त्याला तिथेच ठेवण्याचा मी हुकूम दिला.”
२२ तेव्हा अग्रिप्पा फेस्तला म्हणाला: “मी स्वतः त्या माणसाकडून ऐकू इच्छितो.” तो त्याला म्हणाला: “तुला उद्या त्याच्याकडून ऐकायला मिळेल.”
२३ त्यामुळे, दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले आणि सेनापती तसंच शहरातील अनेक प्रतिष्ठित माणसांसोबत त्यांनी दरबारात प्रवेश केला. मग, फेस्तने हुकूम दिल्यानुसार पौलला आत आणण्यात आले.
२४ तेव्हा फेस्त म्हणाला: “हे राजा अग्रिप्पा आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनो, ज्या माणसाबद्दल यरुशलेमच्या आणि इथल्या सर्व यहुद्यांनी माझ्याकडे ओरडून अशी विनंती केली, की ‘त्याला ठार मारावं, तो जगण्याच्या लायकीचा नाही,’ तो पौल तुमच्यासमोर आहे.
२५ पण मला दिसून आलं, की त्याने मृत्युदंड देण्यासारखं काहीच केलेलं नाही. त्यामुळे या माणसाने महाराजाकडे न्याय मागण्याची विनंती केली, तेव्हा मी त्याला तिथे पाठवण्याचं ठरवलं.
२६ पण, त्याच्याबद्दल महाराजांना निश्चित असं काहीच लिहिण्यासारखं माझ्याजवळ नाही. त्यामुळे मी याला तुम्हा सर्वांसमोर, आणि खासकरून राजा अग्रिप्पा, तुमच्यासमोर आणलं; म्हणजे, त्याची न्यायचौकशी झाल्यावर मी त्याच्याबद्दल काहीतरी लिहू शकेन.
२७ कारण, एखाद्या कैद्यावरचे आरोप न सांगता त्याला पाठवणं मला योग्य वाटत नाही.”