प्रेषितांची कार्ये २६:१-३२

  • पौल अग्रिप्पासमोर आपली बाजू मांडतो (१-११)

  • पौल आपल्या परिवर्तनाचे वर्णन करतो (१२-२३)

  • फेस्त आणि अग्रिप्पा यांची उत्तरे (२४-३२)

२६  मग, अग्रिप्पा पौलला म्हणाला: “तुला तुझी बाजू मांडण्याची परवानगी आहे.” तेव्हा, पौलने हात पुढे करून आपल्या बचावात बोलण्यास सुरुवात केली: २  “हे राजा अग्रिप्पा, यहुद्यांनी माझ्यावर जे सर्व आरोप लावले आहेत, त्यांविषयी आज मला तुमच्यासमोर आपल्या बचावात बोलण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद होतो; ३  कारण, यहुद्यांच्या रीतीरिवाजांचे आणि त्यांच्यातील वादविषयांचे तुम्ही जाणकार आहात. म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो, की माझं धीराने ऐकून घ्यावं. ४  खरंतर, तरुणपणापासून आपल्या लोकांमध्ये* आणि यरुशलेममध्ये माझं जीवन कसं होतं, हे सर्व यहुद्यांना चांगलं माहीत आहे. ५  आणि जे पूर्वी मला ओळखत होते, त्यांची इच्छा असल्यास, ते याची साक्ष देऊ शकतील, की मी आमच्या धर्मातल्या सर्वात कट्टर पंथाचा, म्हणजेच परूश्‍यांच्या पंथाचा होतो. ६  पण, देवाने आमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाच्या आशेमुळे आज माझी न्यायचौकशी होत आहे; ७  याच वचनाची पूर्णता पाहण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश रात्रंदिवस देवाची मोठ्या आवेशाने पवित्र सेवा करत आहेत. आणि हे राजा, याच आशेमुळे यहुद्यांनी माझ्यावर आरोप लावला आहे. ८  देव मेलेल्यांना उठवतो, ही गोष्ट तुम्हाला अविश्‍वसनीय का वाटते? ९  एकेकाळी मलासुद्धा असं वाटत होतं, की नासरेथकर येशूच्या नावाचा सर्व प्रकारे विरोध करणं, हे माझं कर्तव्यच आहे. १०  आणि यरुशलेममध्ये मी अगदी हेच केलं; पवित्र जनांपैकी कित्येकांना मी तुरुंगात डांबलं, कारण मुख्य याजकांकडून मला तो अधिकार देण्यात आला होता; आणि त्यांना मृत्युदंड दिला जात असताना मी याचं समर्थन केलं. ११  त्यांच्या सर्व सभास्थानांत अनेकदा त्यांचा छळ करून मी त्यांना त्यांच्या विश्‍वासाचा त्याग करायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला; इतकंच काय, तर त्यांच्याविरुद्ध रागाने वेडापिसा होऊन मी इतर शहरांमध्येही जाऊन त्यांच्यावर जुलूम केले. १२  एकदा याच उद्देशाने, मी मुख्य याजकांनी दिलेल्या अधिकाराने व परवानगीने दिमिष्कला चाललो होतो. १३  रस्त्याने जात असताना, हे राजा, आकाशातून सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश भर दुपारी माझ्या व माझ्यासोबत प्रवास करणाऱ्‍यांभोवती चमकला. १४  तेव्हा, आम्ही सर्व जमिनीवर पडलो आणि मला एक आवाज ऐकू आला, जो इब्री भाषेत मला म्हणत होता: ‘शौल, शौल, तू मला का छळत आहेस? पराणीवर* लाथा मारून* तू स्वतःला त्रास करून घेत आहेस.’ १५  पण मी म्हणालो: ‘प्रभू, तू कोण?’ तेव्हा प्रभू म्हणाला: ‘मी येशू आहे, ज्याला तू छळत आहेस. १६  तर आता उठून उभा राहा. कारण तुला आपला सेवक आणि साक्षी म्हणून निवडण्याकरता मी तुझ्यासमोर प्रकट झालो; यासाठी, की माझ्यासंबंधी ज्या गोष्टी तू पाहिल्या आहेत आणि ज्या मी तुला दाखवेन, त्यांविषयी तू साक्ष द्यावी. १७  आणि मी तुझी या लोकांपासून आणि इतर राष्ट्रांपासून सुटका करेन. त्यांच्याकडे मी तुला यासाठी पाठवत आहे, १८  की तू त्यांचे डोळे उघडावेत, त्यांना अंधारापासून प्रकाशाकडे आणि सैतानाच्या अधिकारापासून देवाकडे वळायला लावावं; म्हणजे, त्यांना पापांची क्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्‍वासाने पवित्र झालेल्यांमध्ये वारसाही मिळेल.’ १९  त्यामुळे, हे राजा अग्रिप्पा, या स्वर्गीय दृष्टान्तातून मला झालेल्या आज्ञेच्या विरोधात न जाता, २०  मी आधी दिमिष्कात आणि मग यरुशलेममध्ये; तसंच, सबंध यहूदीयाच्या प्रदेशात आणि इतर राष्ट्रांतही लोकांना हा संदेश घोषित करू लागलो, की त्यांनी पश्‍चात्ताप करावा आणि पश्‍चात्तापाला शोभतील अशी कार्ये करून देवाकडे वळावं. २१  आणि याच कारणामुळे यहुद्यांनी मंदिरात मला धरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. २२  पण, देवाकडून मिळणारी मदत अनुभवल्यामुळेच मी आजपर्यंत लहानमोठ्या सर्वांना साक्ष देत आहे; आणि संदेष्ट्यांनी तसंच मोशेने जे घडेल असं सांगितलं होतं, त्यापेक्षा वेगळं काही मी बोललो नाही; २३  ते हेच, की ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल आणि मेलेल्यांतून पुनरुत्थान होणारा पहिला, या नात्याने तो केवळ या लोकांतच नाही, तर इतर राष्ट्रांतही प्रचार करून त्यांना प्रकाश देईल.” २४  पौल या गोष्टी आपल्या बचावात बोलत असताना फेस्त मोठ्याने म्हणाला: “पौल तू वेडा झाला आहेस! जास्त ज्ञानाने तुला वेडं केलं आहे!” २५  पण पौल म्हणाला: “महाराज फेस्त, मी वेडा नाही, तर मी खऱ्‍या आणि ज्यांत तथ्य आहे अशा गोष्टी बोलत आहे. २६  खरंतर, ज्या राजासमोर मी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे, त्याला स्वतःला या गोष्टींविषयी चांगल्या प्रकारे माहीत आहे; यांपैकी एकही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटलेली नाही याची मला खातरी आहे, कारण यांतली कोणतीच गोष्ट एखाद्या कोपऱ्‍यात घडलेली नाही. २७  हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यांच्या लिखाणांवर तुमचा विश्‍वास आहे का? तुमचा विश्‍वास आहे, हे मला माहीत आहे.” २८  पण, अग्रिप्पा पौलला म्हणाला: “थोड्याच वेळात, तू ख्रिस्ती बनण्यासाठी माझं मन वळवशील.” २९  तेव्हा पौल म्हणाला: “थोड्या वेळात असो की जास्त वेळात, माझी तर देवाकडे हीच इच्छा आहे, की केवळ तुम्हीच नाही, तर आज माझं बोलणं ऐकणाऱ्‍या सर्वांनीच माझ्यासारखं व्हावं; इतकंच की, अशा बेड्यांमध्ये तुम्ही असू नये.” ३०  मग, राजा उठला आणि त्याच्यासोबत राज्यपाल, बर्णीका आणि त्यांच्यासोबत बसलेली माणसेही उठली. ३१  पण, निघत असताना ते एकमेकांना म्हणू लागले: “मृत्युदंड देण्यासारखं किंवा तुरुंगात टाकण्यासारखं या माणसाने काहीच केलेलं नाही.” ३२  मग, अग्रिप्पा फेस्तला म्हणाला: “या माणसाने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर याची सुटका करता आली असती.”

तळटीपा

किंवा “देशात.”
गुरांना हाकून नेण्यासाठी वापरली जाणारी टोकदार काठी.
किंवा “अशा प्रकारे प्रतिकार करून.”