प्रेषितांची कार्ये ६:१-१५

  • सेवेसाठी सात पुरुषांची निवड (१-७)

  • स्तेफनवर देवाची निंदा करण्याचा आरोप (८-१५)

 त्या दिवसांत, शिष्यांची संख्या वाढत चालली होती. तेव्हा असे झाले की ग्रीक बोलणारे यहुदी, इब्री बोलणाऱ्‍या यहुद्यांच्या विरोधात तक्रार करू लागले; कारण, दररोजच्या वाटपात त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष केले जात होते. २  म्हणून बारा प्रेषितांनी शिष्यांना एकत्र जमवून त्यांना म्हटले: “देवाचं वचन सोडून आम्ही जेवणाचं वाटप करणं योग्य ठरणार नाही. ३  तेव्हा बांधवांनो, तुमच्यामध्ये चांगलं नाव असलेल्या* अशा सात पुरुषांना निवडा जे पवित्र आत्म्याने व बुद्धीने परिपूर्ण आहेत, म्हणजे या आवश्‍यक कामासाठी आपल्याला त्यांची नेमणूक करता येईल. ४  पण, आम्ही मात्र स्वतःला प्रार्थना व देवाच्या वचनाची सेवा यांकरता वाहून घेऊ.” ५  त्यांचे हे बोलणे सर्व शिष्यांना पटले आणि त्यांनी विश्‍वास व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेला स्तेफन, तसेच फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना आणि यहुदी धर्म स्वीकारलेला अंत्युखियाचा नीकलाव यांना निवडले. ६  त्यांनी त्यांना प्रेषितांजवळ आणले आणि प्रार्थना केल्यानंतर प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले. ७  याचा परिणाम असा झाला, की देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली; आणि याजकांपैकीही बऱ्‍याच जणांनी विश्‍वास स्वीकारला. ८  स्तेफन हा देवाची कृपा व सामर्थ्य यांनी परिपूर्ण होऊन लोकांमध्ये बरीच अद्‌भुत कार्ये आणि चिन्हे करत होता. ९  पण “स्वतंत्र माणसांच्या सभास्थानाचे” काही सदस्य, कुरेनेचे व आलेक्सांद्रियाचे काही जण, तसेच किलिकिया व आशिया येथील काही जण पुढे येऊन स्तेफनशी वादविवाद करू लागले. १०  पण तो ज्या बुद्धीने व आत्म्याने बोलत होता त्याच्यापुढे त्यांचे काहीच चालले नाही. ११  तेव्हा त्यांनी गुपचूप काही माणसांना असे म्हणायला चिथावले: “आम्ही याला मोशेची व देवाची निंदा करताना ऐकलं आहे.” १२  मग त्यांनी लोकांना, वडील जनांना आणि शास्त्र्यांना भडकवले आणि त्या सर्वांनी अचानक जाऊन त्याला धरले आणि बळजबरीने न्यायसभेसमोर* नेले. १३  त्यांनी खोट्या साक्षीदारांना उभे केले, जे असे म्हणाले: “हा मनुष्य सतत या पवित्र मंदिराच्या आणि नियमशास्त्राच्या विरोधात बोलत राहतो. १४  उदाहरणार्थ, आम्ही त्याला असं म्हणताना ऐकलं आहे, की नासरेथचा येशू हे मंदिर खाली पाडेल आणि मोशेने आमच्यासाठी लावून दिलेल्या प्रथा बदलून टाकेल.” १५  आणि न्यायसभेत बसलेल्या सर्वांनी त्याच्याकडे निरखून पाहिले, तेव्हा त्याचा चेहरा त्यांना एखाद्या देवदूताच्या चेहऱ्‍यासारखा दिसला.

तळटीपा

किंवा “नावाजलेल्या.”
अर्थात, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.