प्रेषितांची कार्ये ७:१-६०
७ पण महायाजक म्हणाला: “या गोष्टी खरोखरच अशा आहेत का?”
२ स्तेफनने उत्तर दिले: “माणसांनो, बांधवांनो आणि वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान इथे राहू लागण्याआधी, तो मेसोपटेम्या इथे राहत असताना गौरवशाली देवाने त्याला दर्शन दिलं,
३ आणि तो त्याला म्हणाला: ‘तू आपला देश आणि आपल्या नातेवाइकांना सोडून, मी दाखवेन त्या देशात चल.’
४ तेव्हा तो खास्द्यांचा देश सोडून हारान इथे राहू लागला. आणि त्याच्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर देवाने त्याला तिथून या देशात राहायला आणलं, जिथे आता तुम्ही राहत आहात.
५ पण, त्याने या देशात त्याला पाऊल ठेवण्याइतकीही जमीन दिली नाही; तर, त्याने हा देश त्याला, आणि त्याच्या वंशजांना* देण्याचं वचन दिलं. खरंतर, अजून त्याला मूलबाळ झालेलं नव्हतं.
६ शिवाय देवाने त्याला सांगितलं की त्याचे वंशज* एका परक्या देशात विदेशी म्हणून राहतील आणि ते लोक त्यांना गुलाम करून चारशे वर्षांपर्यंत छळतील.*
७ देवाने असंही म्हटलं, ‘ज्या देशाची ते गुलामी करतील त्यांचा मी न्याय करेन आणि त्यानंतर ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी पवित्र सेवा करतील.’
८ तसेच, त्याने अब्राहामसोबत सुंतेचा* करार केला. मग, अब्राहामला इसहाक झाला आणि त्याने आठव्या दिवशी त्याची सुंता केली आणि इसहाकला याकोब झाला* आणि याकोबला बारा कुलप्रमुख झाले.
९ ते योसेफचा हेवा करू लागले आणि त्यांनी त्याला मिसरच्या* लोकांना विकून टाकलं. पण देव त्याच्यासोबत होता;
१० त्याने त्याच्या सर्व संकटांतून त्याची सुटका केली व मिसरचा राजा फारो याची कृपा त्याच्यावर होईल असं केलं आणि त्याच्या दृष्टीत त्याला ज्ञानी केलं. पुढे फारोने त्याला मिसरवर व त्याच्या सर्व घराण्यावर अधिकार चालवण्याकरता नेमलं.
११ पण सबंध मिसर देशात व कनानमध्ये दुष्काळ पडून एक फार मोठं संकट आलं आणि आपल्या पूर्वजांची उपासमार होऊ लागली.
१२ पण मिसर देशात अन्नधान्य असल्याचं याकोबच्या कानावर आलं आणि म्हणून त्याने आपल्या पूर्वजांना पहिल्यांदा तिथे पाठवलं.
१३ ते दुसऱ्यांदा मिसरला गेले, तेव्हा योसेफने आपल्या भावांना आपली ओळख दिली आणि फारोला योसेफच्या कुटुंबाबद्दल कळलं.
१४ म्हणून योसेफने निरोप पाठवून आपला पिता याकोब आणि आपल्या सर्व नातेवाइकांना, म्हणजे एकूण ७५ जणांना* तिकडून बोलावून घेतलं.
१५ अशा रीतीने, याकोब मिसरला गेला आणि तिथेच त्याचा व आपल्या पूर्वजांचाही मृत्यू झाला.
१६ त्यांना शखेमला आणण्यात आलं, आणि अब्राहामने शखेम इथे हामोरच्या मुलांकडून चांदीच्या पैशांनी जी कबर विकत घेतली होती, त्या कबरेत ठेवण्यात आलं.
१७ देवाने अब्राहामला दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ जवळ येऊ लागली, तेव्हा मिसरात त्याच्या वंशजांची संख्या वाढू लागली आणि ते बहुगुणित झाले.
१८ पण, त्यानंतर मिसरात एक दुसरा राजा गादीवर आला. त्याला योसेफबद्दल माहीत नव्हतं.
१९ त्याने आपल्या लोकांशी कपटाने व्यवहार केला आणि त्यांची मुलं जगू नयेत म्हणून आपल्या वाडवडिलांना त्यांच्या तान्ह्या मुलांना टाकून द्यायला भाग पाडलं.
२० त्याच वेळी मोशेचा जन्म झाला आणि तो अत्यंत सुंदर* होता. त्याच्या आईने तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात त्याचं पालनपोषण केलं.
२१ पण त्याला टाकून देण्यात आलं तेव्हा फारोच्या मुलीने त्याला घेतलं आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं.
२२ अशा रीतीने, मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचं शिक्षण मिळालं. त्याचं बोलणं आणि त्याची कार्ये अतिशय प्रभावशाली होती.
२३ तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा आपल्या भावांची, म्हणजेच इस्राएलच्या पुत्रांची भेट घेण्याचं* त्याच्या मनात आलं.*
२४ जेव्हा त्यांच्यापैकी एकाशी अन्यायीपणे व्यवहार होताना त्याने पाहिलं, तेव्हा त्याने त्याला वाचवलं आणि त्याला छळणाऱ्या मिसरी मनुष्याला मारून त्याचा सूड घेतला.
२५ देव त्याच्याद्वारे त्याच्या बांधवांची सुटका करत आहे, ही गोष्ट ते ओळखतील असं त्याला वाटलं; पण त्यांनी ते ओळखलं नाही.
२६ दुसऱ्या दिवशी दोन जण भांडत असताना त्याला दिसले, तेव्हा त्याने त्यांच्यात समेट करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणाला ‘तुम्ही भाऊभाऊ आहात. मग तुम्ही एकमेकांशी वाईट का वागता?’
२७ पण जो आपल्या भावाशी वाईट वागत होता, त्याने त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाला: ‘तुला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून कोणी नेमलं?
२८ काल त्या मिसरी माणसाला मारून टाकलंस, तसं आज मलाही मारणार आहेस का?’
२९ हे ऐकून मोशे तिथून पळून गेला आणि मिद्यान देशात विदेशी म्हणून राहू लागला आणि तिथे त्याला दोन मुलं झाली.
३० मग, चाळीस वर्षं लोटल्यावर सीनाय पर्वताच्या ओसाड प्रदेशात, जळणाऱ्या झुडपाच्या ज्वालांमध्ये एका देवदूताने त्याला दर्शन दिलं.
३१ मोशेने ते दृश्य पाहिलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण ते नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी तो त्या झुडपाच्या जवळ जाऊ लागला, तेव्हा त्याला यहोवाचा* आवाज ऐकू आला:
३२ ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.’ हे ऐकून मोशे थरथर कापू लागला आणि पुढे जाऊन पाहण्याचं त्याचं धैर्य झालं नाही.
३३ यहोवा* त्याला म्हणाला: ‘तुझ्या पायांतले जोडे काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती पवित्र जागा आहे.
३४ मी मिसरमध्ये असलेल्या माझ्या लोकांवर होणारा जुलूम नक्कीच पाहिला आहे आणि त्यांचा आक्रोश मी ऐकला आहे आणि मी त्यांची सुटका करण्यासाठी खाली आलो आहे. तर आता चल, मी तुला मिसरला पाठवणार आहे.’
३५ ‘तुला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून कोणी नेमलं?’ असं म्हणून ज्या मोशेला त्यांनी नाकारलं होतं, त्याच मोशेला देवाने झुडपातून दर्शन देणाऱ्या देवदूताद्वारे संदेश देऊन, त्यांच्याकडे अधिकारी आणि तारणकर्ता म्हणून पाठवलं.
३६ याच मनुष्याने त्यांना मिसर देशातून सोडवलं आणि मिसरात, तांबड्या समुद्राजवळ व चाळीस वर्षांपर्यंत ओसाड प्रदेशात त्याने अनेक चमत्कार व चिन्हे केली.
३७ हाच तो मोशे होता, ज्याने इस्राएलच्या पुत्रांना असं म्हटलं: ‘देव तुमच्या बांधवांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्याकरता उभा करेल.’
३८ हाच तो मोशे होता, जो ओसाड प्रदेशात इस्राएल लोकांच्या मंडळीसोबत आणि सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूतासोबत होता. आणि हाच मोशे आपल्या पूर्वजांसोबत होता व आपल्याला देण्याकरता पवित्र वचने त्यालाच सोपवण्यात आली होती.
३९ आपल्या पूर्वजांनी त्याचं ऐकलं नाही, तर त्यांनी त्याचा धिक्कार केला आणि त्यांच्या मनाला मिसरला परतण्याची ओढ लागली.
४० ते अहरोनला म्हणाले: ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी कर. कारण मिसरातून आम्हाला बाहेर आणणाऱ्या त्या मोशेचं काय झालं, ते आम्हाला माहीत नाही.’
४१ म्हणून त्यांनी त्या दिवसांत एक वासरू तयार केलं आणि त्याच्या मूर्तीपुढे त्यांनी अर्पण वाहिलं आणि आपल्या हातांनी तयार केलेल्या त्या मूर्तीसमोर त्यांनी उत्सव साजरा केला.
४२ त्यामुळे, देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशाच्या सैन्याची उपासना करण्यासाठी सोडून दिलं. याविषयी संदेष्ट्यांच्या ग्रंथात असं लिहिलं आहे: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही चाळीस वर्षं ओसाड प्रदेशात असताना जी बलिदाने व अर्पणे वाहिली, ती मला वाहिली नाहीत.
४३ तर तुम्ही मोलखचा तंबू आणि रेफान देवतेच्या ताऱ्याची मूर्ती घेऊन फिरला आणि तुम्ही स्वतः तयार केलेल्या या मूर्तींची उपासना केली. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्याही पलीकडे हद्दपार करेन.’
४४ आपल्या पूर्वजांजवळ ओसाड प्रदेशात साक्षीचा तंबू होता. मोशेला दाखवण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे तो बनवण्याची देवाने त्याला आज्ञा केली होती.
४५ आणि आपल्या पूर्वजांना त्याचा ताबा मिळाला आणि त्यांनी यहोशवासोबत तो विदेशी लोकांच्या अधिकाराखाली असलेल्या देशात आणला, ज्यांना देवाने आपल्या पूर्वजांसमोरून त्या देशातून घालवलं आणि दावीदच्या काळापर्यंत तो तिथेच राहिला.
४६ दावीदवर देवाची कृपा झाली आणि त्याने याकोबच्या देवासाठी एक मंदिर बांधण्याचा बहुमान मिळावा अशी त्याच्याकडे विनंती केली.
४७ पण शेवटी शलमोनने त्याच्याकरता मंदिर बांधलं.
४८ असं असलं तरी सर्वसमर्थ देव हातांनी बनवलेल्या भवनांत राहत नाही. याविषयी संदेष्ट्याने म्हटले आहे:
४९ ‘यहोवा* म्हणतो, स्वर्ग माझं राजासन आणि पृथ्वी माझ्या पायांचं आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं भवन बांधाल? माझं विसाव्याचं स्थान कोणतं?
५० माझ्याच हाताने या सर्व गोष्टी बनवलेल्या नाहीत का?’
५१ अडेल वृत्तीच्या आणि हृदय व कानांची सुंता न झालेल्या माणसांनो, तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याचा प्रतिकार करत आला आहात; तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्हीही करता.
५२ तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? खरोखर, ज्यांनी त्या नीतिमान जनाच्या येण्याविषयी पूर्वीपासून घोषित केलं, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारलं; आणि आता तुम्ही त्या नीतिमान जनाचा विश्वासघात करणारे व त्याची हत्या करणारे ठरला आहात.
५३ तुम्हाला देवदूतांद्वारे नियमशास्त्र मिळालं होतं, पण तुम्ही त्याचं पालन केलं नाही.”
५४ या गोष्टी ऐकल्यावर ते संतापले आणि त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.
५५ पण, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आकाशाकडे पाहत राहिला आणि त्याला देवाचे तेज आणि देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला येशू दिसला.
५६ तेव्हा तो म्हणाला: “पाहा! मला आकाश उघडलेलं आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला दिसत आहे.”
५७ हे ऐकताच त्यांनी मोठ्याने ओरडून आपल्या कानांवर हात ठेवले. ते सर्व त्याच्या अंगावर धावून गेले.
५८ मग त्यांनी त्याला शहराबाहेर ओढत नेले आणि त्याला दगडमार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले.
५९ ते स्तेफनला दगडमार करत असताना त्याने अशी विनवणी केली: “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा* स्वीकार कर.”
६० मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे यहोवा,* या पापाचा दोष त्यांना लावू नकोस.” असे म्हणून त्याने प्राण सोडला.
तळटीपा
^ शब्दशः “बीजाला.”
^ शब्दशः “बीज.”
^ किंवा “त्यांच्याशी दुर्व्यवहार करतील.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “इसहाकने याकोबसोबत तसेच केले.”
^ अर्थात, इजिप्तच्या.
^ किंवा “जिवांना.”
^ किंवा “देवाच्या दृष्टीत सुंदर होता.”
^ किंवा “त्यांचं कसं चाललं आहे हे जाऊन पाहण्याचं.”
^ किंवा “त्याने ठरवलं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.