प्रेषितांची कार्ये ९:१-४३

  • दिमिष्काच्या रस्त्यावर शौल (१-९)

  • शौलला मदत करण्यासाठी हनन्याला पाठवले जाते (१०-१९क)

  • शौल दिमिष्कात येशूविषयी प्रचार करतो (१९ख-२५)

  • शौल यरुशलेमला जातो (२६-३१)

  • पेत्र ऐनेयासला बरे करतो (३२-३५)

  • उदार वृत्तीच्या दुर्कसचे पुनरुत्थान करण्यात आले (३६-४३)

 पण शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमकावत होता आणि त्यांची हत्या करण्याच्या ईर्ष्येने पेटला होता. म्हणून, तो महायाजकाकडे गेला २  आणि त्याने त्याच्याकडे दिमिष्कातल्या सभास्थानांना लिहिलेली पत्रे मागितली, यासाठी की ‘प्रभूचा मार्ग’ अनुसरणारे कोणीही, स्त्री अथवा पुरुष त्याला सापडल्यास, त्यांना बांधून यरुशलेमला आणता यावे. ३  मग तो जात असताना दिमिष्काच्या जवळ पोचला, तेव्हा अचानक त्याच्याभोवती आकाशातून प्रकाश चमकला. ४  तो जमिनीवर पडला आणि त्याला एक आवाज ऐकू आला, जो त्याला म्हणाला: “शौल, शौल, तू मला का छळत आहेस?” ५  त्याने विचारले: “प्रभू, तू कोण?” तो म्हणाला: “मी येशू आहे, ज्याला तू छळत आहेस. ६  आता ऊठ आणि शहरात जा आणि पुढे काय करायचं हे तुला सांगितलं जाईल.” ७  त्याच्यासोबत प्रवास करणारी माणसे आश्‍चर्याने स्तब्ध होऊन उभी होती. त्यांना काहीतरी आवाज तर ऐकू आला, पण कोणीही दिसले नाही. ८  मग शौल जमिनीवरून उठला. त्याचे डोळे उघडे असले तरी त्याला काहीही दिसत नव्हते. म्हणून त्यांनी त्याला हाताने धरून दिमिष्कापर्यंत आणले. ९  त्यानंतर तीन दिवस त्याला काहीच दिसत नव्हते आणि त्याने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही. १०  दिमिष्कात हनन्या नावाचा एक शिष्य होता. प्रभूने त्याला एका दृष्टान्तात म्हटले: “हनन्या!” तो म्हणाला: “काय प्रभू?” ११  प्रभू त्याला म्हणाला: “ऊठ, ‘सरळ’ म्हटलेल्या रस्त्यावर जा, आणि तार्स इथल्या शौल नावाच्या माणसाला शोध, जो यहुदाच्या घरात आहे. कारण पाहा! तो प्रार्थना करत आहे, १२  आणि हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्याकडे आला आहे व आपली दृष्टी परत यावी म्हणून त्याने आपल्यावर हात ठेवले आहेत, असं त्याने एका दृष्टान्तात पाहिलं आहे.” १३  पण हनन्याने उत्तर दिले: “प्रभू, मी बऱ्‍याच जणांकडून या मनुष्याबद्दल आणि यरुशलेममध्ये त्याने तुझ्या पवित्र जनांच्या केलेल्या छळाबद्दल ऐकलं आहे. १४  आणि मुख्य याजकांनी तर त्याला तुझं नाव घेणाऱ्‍या सर्वांना अटक करण्याचा* अधिकारही दिला आहे.” १५  पण प्रभूने त्याला म्हटले: “जा! कारण हा मनुष्य माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.* तो विदेश्‍यांना, तसंच राजांना व इस्राएलच्या पुत्रांना माझ्या नावाची घोषणा करेल. १६  माझ्या नावासाठी त्याला कायकाय सोसावं लागेल हे मी त्याला स्पष्टपणे दाखवीन.” १७  मग हनन्या निघाला आणि त्या घरात जाऊन त्याने शौलवर हात ठेवून म्हटले: “शौल माझ्या भावा, तू रस्त्याने येत असताना ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिलं, त्यानेच मला तुझ्याकडे पाठवलं आहे, यासाठी की तुझी दृष्टी तुला परत मिळावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं.” १८  तेव्हा अचानक खपल्यांसारखे काहीतरी त्याच्या डोळ्यांवरून पडले आणि त्याला पुन्हा दिसू लागले. मग, तो उठला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला. १९  त्यानंतर, त्याने जेवण केले व त्याच्या अंगात ताकद आली. मग काही दिवस तो दिमिष्कातच शिष्यांसोबत राहिला. २०  यानंतर, लगेचच त्याने सभास्थानांत असा प्रचार करायला सुरुवात केली, की येशू हाच देवाचा पुत्र आहे. २१  पण ज्यांनी हे ऐकले त्यांना फार आश्‍चर्य वाटले आणि ते म्हणू लागले: “यरुशलेममध्ये हे नाव घेणाऱ्‍यांचा ज्याने क्रूरपणे छळ केला, तो हाच माणूस आहे ना? आणि त्यांना अटक करून मुख्य याजकांकडे नेण्यासाठीच* हा इथे आला होता ना?” २२  पण शौल अधिकाधिक प्रभावशाली होत गेला आणि येशू हाच ख्रिस्त आहे हे तर्काच्या आधारावर सिद्ध करण्याद्वारे तो दिमिष्कात राहणाऱ्‍या यहुद्यांचे तोंड बंद करत होता. २३  बरेच दिवस असे घडल्यानंतर, यहुद्यांनी मिळून त्याला ठार मारण्याचा कट रचला. २४  पण त्यांनी केलेल्या या कटाबद्दल शौलला कळले. त्याला ठार मारण्याच्या हेतूने यहुद्यांनी रात्रंदिवस शहराच्या फाटकांवर पाळत ठेवली होती. २५  म्हणून त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला एका मोठ्या टोपलीत बसवून, शहराच्या भिंतीतील एका खिडकीतून खाली उतरवले. २६  यरुशलेमला आल्यावर, त्याने शिष्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या सर्वांना त्याची भीती वाटत होती आणि तोही एक शिष्य आहे यावर त्यांचा विश्‍वास बसत नव्हता. २७  तेव्हा, बर्णबा त्याला मदत करण्यासाठी पुढे आला. त्याने त्याला प्रेषितांकडे नेले व कशा प्रकारे रस्त्याने जाताना शौलने प्रभूला पाहिले होते आणि प्रभू कसा त्याच्याशी बोलला, तसेच, दिमिष्कात त्याने किती धैर्याने येशूच्या नावाबद्दल घोषणा केली, हे सर्व बर्णबाने प्रेषितांना सविस्तरपणे सांगितले. २८  मग, तो शिष्यांसोबतच राहिला आणि यरुशलेममध्ये उघडपणे वावरू लागला* व प्रभूच्या नावाबद्दल अगदी धैर्याने बोलू लागला. २९  तो ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या यहुद्यांशी बोलायचा व वादविवाद करायचा, पण ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले. ३०  बांधवांना याची खबर लागताच त्यांनी त्याला कैसरीयाला आणले आणि तार्सला पाठवून दिले. ३१  मग सबंध यहूदीया, गालील व शोमरोन इथल्या मंडळीत शांतीचा काळ आला आणि मंडळीची उन्‍नती झाली. बांधव यहोवाचे* भय मानून चालत होते; त्यांना पवित्र आत्म्याचे सांत्वन मिळाले व त्यांची संख्या वाढत गेली. ३२  पेत्र त्या सर्व प्रदेशातून फिरत असताना लोद नावाच्या शहरात राहणाऱ्‍या पवित्र जनांकडेही गेला. ३३  तिथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला जो लकवा मारल्यामुळे आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळला होता. ३४  पेत्र त्याला म्हणाला: “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे. ऊठ आणि आपलं अंथरूण नीट कर.” तेव्हा तो लगेच उठला. ३५  लोद आणि शारोन इथे राहणाऱ्‍यांनी त्याला पाहिले तेव्हा ते प्रभूकडे वळले. ३६  यापोमध्ये एक शिष्या होती जिचे नाव तबीथा, म्हणजेच “दुर्कस”* असे होते. ती इतरांसाठी बरीच चांगली कामे करायची व दानदेखील करायची. ३७  पण त्या दिवसांत, ती आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. म्हणून त्यांनी तिला अंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. ३८  लोद शहर यापोजवळ होते. त्यामुळे शिष्यांना जेव्हा कळले की पेत्र लोद इथे आहे, तेव्हा त्यांनी दोन माणसांना त्याच्याकडे असा निरोप घेऊन पाठवले, की “कृपा करून लवकरात लवकर आमच्याकडे ये.” ३९  तेव्हा पेत्र उठला आणि त्यांच्यासोबत गेला. तो तिथे पोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; तिथे सर्व विधवा त्याच्याजवळ रडू लागल्या आणि दुर्कस त्यांच्यात असताना जे पुष्कळ कपडे व झगे* तिने त्यांच्यासाठी बनवले होते, ते त्याला दाखवू लागल्या. ४०  तेव्हा, पेत्रने सर्वांना बाहेर पाठवले आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृतदेहाकडे वळून त्याने म्हटले: “तबीथा, ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्रला पाहिल्यावर ती उठून बसली. ४१  त्याने तिचा हात धरून तिला उठवले आणि मग पवित्र जनांना आणि विधवांना बोलावून त्याने जिवंत झालेल्या तबीथाला त्यांच्यासमोर नेले. ४२  या घटनेबद्दलची माहिती सबंध यापो शहरात पसरली आणि बरेच जण प्रभूवर विश्‍वास ठेवू लागले. ४३  मग पेत्र बरेच दिवस यापोत, चामड्याचे काम करणाऱ्‍या शिमोन नावाच्या एका मनुष्याकडे राहिला.

तळटीपा

शब्दशः “बांधण्याचा; तुरुंगात टाकण्याचा.”
किंवा “मी या मनुष्याला निवडलं आहे.”
शब्दशः “त्यांना बांधून नेण्यासाठी.”
शब्दशः “ये-जा करू लागला.”
शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक भाषेतील दुर्कस व अॅरामेईक भाषेतील तबीथा या दोन्ही नावांचा “हरिणी” असा अर्थ होतो.
किंवा “बाह्‍य वस्त्रे.”