फिलिप्पैकर ४:१-२३

  • एकता, आनंद, योग्य विचार (१-९)

    • कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका (६, ७)

  • फिलिप्पैकरांनी पाठवलेल्या भेटींबद्दल कदर (१०-२०)

  • निरोपाचे शब्द (२१-२३)

 ज्यांच्यावर माझे प्रेम आहे व ज्यांना भेटण्यास मी आतुर आहे, अशा माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही माझा आनंद व माझा मुकुट आहात; तेव्हा, प्रिय बांधवांनो, प्रभूमध्ये अशाच प्रकारे स्थिर उभे राहा. २  मी युवदीयाला विनंती करतो आणि सुंतुखेलाही विनंती करतो, की प्रभूमध्ये एक मनाचे असा. ३  हो, माझा खरा सहकारी* असलेल्या तुलाही मी विनंती करतो, की या स्त्रियांना मदत करत राहा; कारण, त्यांनी माझ्यासोबत तसेच क्लेमेंतसोबत आणि जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे आहेत त्या माझ्या इतर सहकाऱ्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून खूप मेहनत केली आहे.* ४  प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा! ५  तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून यावा. प्रभू जवळ आहे. ६  कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सर्व गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना व याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा; ७  म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचे व बुद्धीचे* रक्षण करेल. ८  शेवटी बांधवांनो, जे काही खरे, जे काही गांभीर्याने विचार करण्याजोगे, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही सात्त्विक आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार* करत जा. ९  तुम्ही ज्या गोष्टी शिकून घेतल्या व स्वीकारल्या आणि माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या व पाहिल्या त्या पाळत राहा, म्हणजे शांतीचा देव तुमच्यासोबत राहील. १०  प्रभूमध्ये मला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो, की शेवटी तुम्ही पुन्हा माझ्या भल्याचा विचार करू लागला आहात; आधीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटत होती, पण ती दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली नाही. ११  अर्थात, मला कशाची तरी गरज आहे म्हणून मी असे म्हणत नाही; कारण, कोणत्याही परिस्थितीत समाधानी* राहायला मी शिकून घेतले आहे. १२  हलाखीच्या परिस्थितीत कसे राहायचे व समृद्धीत कसे राहायचे हे मला माहीत आहे. सर्व बाबतींत आणि सर्व परिस्थितींत भरल्या पोटी कसे राहायचे व उपाशी कसे राहायचे; तसेच, समृद्धी असताना आणि अडचण असताना कसे राहायचे याचे रहस्य मी शिकलो आहे. १३  जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते. १४  तरीसुद्धा, माझ्या संकटात मला साहाय्य करून तुम्ही चांगलेच केले. १५  खरेतर, तुम्हा फिलिप्पैकरांना हेही माहीत आहे, की तुम्ही पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकल्यानंतर, जेव्हा मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय दुसऱ्‍या कोणत्याच मंडळीने माझ्यासोबत देवाणघेवाण केली नाही; १६  कारण, मी थेस्सलनीकामध्ये असताना माझी गरज भागवण्यासाठी तुम्ही केवळ एकदा नाही, तर दोन वेळा मला काहीतरी पाठवले होते. १७  तुमच्याकडून एखादी भेट मिळण्याची मला अपेक्षा आहे असे नाही, तर तुमच्या हिशोबात जमा होईल अशा फळाची मी अपेक्षा करतो. १८  माझ्याजवळ गरजेच्या सर्व वस्तू आहेत; खरेतर, गरजेपेक्षा जास्त आहेत. आणि आता एपफ्रदीतच्या हातून तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला कसलीच कमी नाही. तुम्ही पाठवलेली ही भेट देवाच्या दृष्टीत एका मोहक सुगंधासारखी व त्याला संतुष्ट करणारे अर्पण आहे. १९  याच्या बदल्यात, माझा देव त्याच्या गौरवाच्या विपुलतेतून ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. २०  आता आपला देव व पिता याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन. २१  ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या प्रत्येक पवित्र जनाला माझा नमस्कार सांगा. माझ्यासोबत असलेले बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात. २२  सर्व पवित्र जन आणि खासकरून जे कैसराच्या* घराण्यातले आहेत, ते तुम्हाला नमस्कार सांगतात. २३  तुम्ही दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे* प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.

तळटीपा

शब्दशः “सोबत जू वाहणारा.”
किंवा “खूप संघर्ष केला आहे.”
किंवा “विचारांचे.”
किंवा “मनन.”
किंवा “संतुष्ट.”
किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आत्म्यामुळे.”